स्वात्मसौख्य

स्वात्मसौख्य – प्रस्तावना

श्री स्वात्मसौख्य हा एक ग्रंथ अद्भुत ग्रंथ आहे.

स्वात्मसौख्य = स्व + आत्मा + सौख्य ‘ स्व ‘ म्हणजे ‘ उ ‘ आणि ‘ अ ‘ यांच्या पलीकडील ‘ जीव ” कित्येक संस्कृत शब्दांत असा ‘ स ‘ न अर्थी असतो. उ० ‘ स्मृ ‘ मूळ ‘ ऋ ‘ धातू गत्यर्थ आहे. मनुष्याची सारी वाणी उच्चारली जाते ती कंठापासून तो ओठापर्यतच्या भागांत. ‘ म ‘ काराचा उच्चार करतांना ओठ मिटले जातात आणि वाणीची समाप्ति होते म्हणून ‘ म ‘ शब्द समाप्ति किंवा शेवट यांचा द्योतक आहे. मृत्यूने सर्व हालचाल बंद होते, म्हणून ‘ मृ ‘ शब्दाला संस्कृतमध्ये ‘ मरणे ‘ असा अर्थ आहे. त्याच्यामागे नञर्थ ‘ स ‘ लागला म्हणजे अर्थातच जिवंत होणें, असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे ‘ म ‘ त्याचप्रमाणे ‘ उ ‘ हा स्वरहि ओठाच्या साह्यानेच उच्चारला जातो, म्हणून ‘ अ ‘ आणि ‘ उ ‘ या दोन स्वरांत सारी वाणी आली. तिच्या पलीकडचा जो मूलतत्त्वाचा अंश त्याचें नांव ‘ स्व ‘. ‘ आत्मा ‘ म्हणजे सर्वत्र व्यापून असलेला याचा कांही अंश सगुणरुपाने प्रगट होतो म्हणून ‘ स्व ‘ म्हणजे सगुण असा जीव. ‘ आत्मा ‘ म्हणजे त्यालाहि व्यापून असणारा ‘ परमात्मा ‘ अथवा ‘ सदाशिव ‘ आणि सौख्य म्हणजे शरीर. या ग्रंथांत ‘ सुख ‘ हा शब्द ‘ इंद्रिय ‘ अशा अर्थाने वापरला आहे. सुख म्हणून जें समजलें जातें तें केवळ स्वसंवेद्य आहे. वाणीने त्याचें वर्णन करावयाचें म्हटलें तर तें त्याच्या परिणामावरुन करावें लागतें. ‘ ख ‘ शब्दाचे संस्कृतांत अनेक अर्थ आहेत. त्यांपैकीच ‘ ख ‘ म्हणजे ‘ इंद्रिय ‘ हाहि आहे. इंद्रियें प्रकृतिस्थ असलीं व आपले व्यापार पूर्ण जोमदारपणाने करीत असलीं तर जो अनुभव येतो, त्यांचे नांव ‘ सुख ‘. अशीं प्रकृतिस्थ इंद्रियें ज्यांत आहेत तें शरीर म्हणजे ‘ सौख्य.’ म्हणून जीव अर्थात् त्याचें शरीर पिंड आणि त्या जीवात्म्यापलीकडे जो सदाशिव ‘ परमात्मा ‘ त्याचे शरीर ब्रह्मांड. म्हणून, आत्मा, परमात्मा आणि पिंडब्रह्मांडरुप शरीर यांच्याविषयी जें शास्त्र तें ‘ स्वात्मसौख्य. ‘ सांप्रदायिक माहिती व पूर्वपीठिका

हा ग्रंथ अनादि कालचा, मूळ संस्कृतांत विशिष्ट सांप्रदायकार्य करण्याकरितांच प्रगट केला जातो. आजपावेतों निरनिराळ्या रीतीने तो १५ वेळा प्रगट झाला व प्रस्तुत प्रसंगी सोळाव्या वेळीं, श्रीसदगुरुनरसिंव्ह सरस्वती या स्वयंभू अवताराने तो करंज ग्रामी नारायणस्वामीस महाराष्ट्र भाषेच्या द्वारें प्रगट केला. म्हणून याची मूळ मंत्रमयता तशीच जागृत आहे. हा मराठींत प्रगट झाला, हें तिचें परमभाग्य. हा संबंध एक मंत्र आहे. मंत्राचें सर्व नियम यास लागू आहेत. याचें पुरश्चरण व हवन होऊं शकते. मंत्राप्रमाणेच हा गुप्त ठेविला पाहिजे. केवळ सांप्रदायिक रीत्याच दिला पाहिजे. बाहेरच्या माणसाने निदान गुरुचरित्राची पारायणें तरी केली असलीं पाहिजे. श्रीमहाराजांच्या ‘ जयदेवा गुरुमूर्ती । ‘ या आरतीखेरीज याची सांगता होत नाही. ( कोणत्याहि प्रासादिक ग्रंथ आरतीशिवाय पुरा होत नाहीं, असें शास्त्र आहे. )

परंपरा

‘ श्रीनरसिंव्ह सरस्वती यति नामीं । नारायणासी बोधिला ॥ ‘ हे नारायण म्हणजे धुळ्याचेच; पण या जन्मीचें नव्हत. मागचे जन्मीहि त्यांचे नांव नारायणच व पुढील जन्म जो, ते धर्मशास्त्राची अव्यवस्था मोडून शास्त्र व आचार यांची घडी बसवून देण्याकरिता घेणार आहेत, त्या जन्मीहि त्यांचे नांव नारायणच राहणार आहे. त्यांना हा ग्रंथ स्वतः देवाने सांगितला. त्यावर ते कारंजाहून नरसोवाचे वाडीस जाऊन तप करीत राहिले. प्रगट न होतां गुप्त राहण्याचा त्यांचा फार कटाक्ष होता. अतिवृद्ध असतां एका महारोगी सेवकांस दृष्टांत झाला की, त्यांचे पादोदक घ्यावें. त्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली. परंतु त्यांनी उडवून दिलें. तेवढ्यावर निराश न होतां त्याने प्रयत्न चालूंच ठेवला. वृद्धपणाने हे नदींत न उतरतां, कांठावर बसून कमंडलूने स्नान करीत. एकदा त्याने मुकाट्याने मागे येऊन अंगावरुन आलेल्या ओघळाचें पाणीच प्राशन केलें व सर्व अंगावरुन घेतलें. त्याने त्याचा रोग बरा झाला. पण या रीतीने आता आपण प्रगट होतों, असें पाहून नारायणांनी देह ठेविला. तेच पुनः रुद्र घराण्यांत नारायण नांवाने जन्मास आले.

स्वात्मसुखाचे विशेष

एकंदर मराठी वाड्मयांत ‘ स्वात्मसौख्य ‘ हा अपूर्व ग्रंथ आहे. त्याची अपूर्वता अनेक प्रकारांनी लक्षांत येते. अगदी प्रथम जी गोष्ट लक्षांत येते ती ही की, त्याचे दोन अर्ध असून त्यांची रचना एकजात अशी नाही. पहिल्या अर्धात कर्म व उपासना हीं दोन कांडें असून, त्यांची ओवी ही मोठी म्हणजे एकनाथी भागवताची ओवी आहे. याच्या उलट दुसरें अर्ध ज्ञानकांडाचे आहे व त्याची ओवी ज्ञानेश्वरी वळणाची असून त्यांत पुष्कळ ठिकाणी ‘ माला – अलंकार ‘ साधला आहे. असा ओव्यांत फरक असल्यामुळेच, हे दोन विभाग वेगळॊए आहेतसें वाटतें, व ते दोन्हीहि एकाच्या हातचे नाहीत की काय, अशी अर्वाचीन संशोधकबुद्धीस शंका येते; परंतु त्यांची रचना श्रीमहाराजांनीच केलेली आहे. ओव्यांत फरक पडण्याचे कारण असें समजते कीं, ज्ञानकांड सांगितले त्या वेळेला कांही कारणामुळे श्रीमहाराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनांत गढून गेले होते. त्यामुळे साहजिकच, ज्ञानेश्वरी वळणाचीच ओवी त्यांच्या तोंडून बाहेर पडली. पंतांच्या ‘ निरोष्ठरामायणा ‘ सारखाच तो प्रकार आहे. त्याप्रमाणेच, या ग्रंथामध्ये कृष्णानंद, कृष्णचैतन्य, व्यंकटेश इ० कित्येक शब्द विशेष पारिभाषिक अर्थाने वापरले आहेत. ते अर्थ जर लक्षांत न आले तर पुष्कळ गैरसमज होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे, पंचदशीची रचना ज्याप्रमाणे उपनिषदांतील प्रतीकवाक्यें घेऊन केली आहे, त्याप्रमाणे ज्ञानकांडांतील रचना पुष्कळशी उपनिषदवाक्यें घेऊन केलेली आहे. मधून मधून कांही ओव्यांना स्वतंत्र अशी मंत्रमयताहि असावी. उ० ज्ञानकांडांतील ‘ त्रिपद गायत्री ब्राह्मणा । चतुष्पाद ओंकार जाणा । प्रत्यगात्मा आणोनि ध्याना । शापमोचन पैं कीजे ॥ ‘ या ओवींत ब्रह्मास्त्र आहे असें श्रीअण्णासाहेब म्हणत असत एकंदर ५१५ ओव्यांत कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी आपण सूत्ररुपाने दाखविल्या आहेत व प्रत्येक ठिकाणी मूळ मुद्दयाकडे लक्ष दिलें आहे, असें श्रीमहाराजांनी स्वतः च म्हटले आहे. ( अनंत वेद अनंत शास्त्रे । स्वतः बोललों मूळ सूत्रें । ) या तीनहि कांडांच्या रचनेचा एक विशेष असा आहे की, प्रत्येक कांड स्वतः च्या ठिकाणी परिपूर्ण असून साधकास शेवटच्या मुक्कामास नेऊन पोचवितें. अथवा एकाच विशाल साधन – मार्गाच्या त्या पाययाहि होऊं शकतात. तसाच या ग्रंथाचा आणखी एक विशेष आहे आणि तो म्हणजे यामध्ये ‘ तांत्रिक साधनांचा ‘ हि समावेश केलेला आहे. तंत्रमार्गाचा अनाधिकारी लोकांनी दुरुपयोग केल्यामुळे महाराष्ट्रांतील सर्व संतांनी, सामान्यतः त्याची निदांच केली आहे. परंतु कांही झालें तरी तो एक सशास्त्र मार्ग आहे. अनाधिकारी लोकांनी केलेल्या दुरुपयोगामुळे त्याची किंमत कांही कमी होऊं शकत नाही, हें लक्षांत घेऊन त्याचीहि योग्य ती संभावना येथे केली आहे. कुळार्णवाचा स्पष्ट उल्लेखच आहे. ‘ त्या कवळाचे महिमान । कुळार्वण बोले आपण । वदता झाला गौरीरमण । जेणें दूषण न बाधीं ॥ ‘ ( उ० कां० . ) याच्या एकूण ओव्या ५१५ आहेत. परंतु सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जशी आपली एक ओवी लिहिलेली आहे तशीच यालाहि, ज्यांना हा मूळ ग्रंथ सांगितला गेला त्या नारायणांनी आपली एक ओवी जोडली आहे. ‘ पूर्ण झाला करंजग्रामी । विदर्भ देशामाजीं स्वामी । नरसिंव्ह सरस्वती यति नामीं । नारायणासी बोलिला ॥’ ( ‘ बोधिला ‘ असाहि पाठ आहे. ) म्हणून आज याच्या एकंदर ओव्या ५१६ आहेत.

स्वात्मसौख्य – कर्मकांड

॥ श्रीगजानन प्रसन्न ॥
॥ श्रीनरसिंव्हसरस्वतीसदगुरुभ्योनमः ॥
॥ श्रीगणेशायनमः ॥
ॐ नमो सदगुरु जगदीशा । कृष्णचैतन्य आदिपुरुषा ॥
मंगलमूर्ति व्यंकटेशा । स्वानंदवंशा प्रकटसी ॥१॥
दक्षिण दिशा दक्षिणाम्नाय । शृंगेरी मठ अभिप्राय ॥
भूरवार सांप्रदाय । ज्यासी अपाय नातळे ॥२॥
सरस्वती भारती पुरी । पद रामेश्वर नगरी ॥
आदिवराह देवता खरी । सुरा असुरा वंद्य जे ॥३॥
कामाक्षा देवी श्रृंगऋषी । पृथ्वीधराचार्य परियेसी ॥
चैतन्य ब्रह्मचारी ततदेशी । तुंगभद्रेसी तीर्थमहिमा ॥४॥
सांप्रदाय शुद्ध भक्ति । संत सज्जन मानिती ॥
वेदांतहि प्रतिपादिती । कृपा करिती समत्वें ॥५॥
स्वानंद चैतन्य सदगुरु । आदिमायेचा अवतारु ॥
तुर्यारुप साक्षात्कारु । निजनिर्धारु सर्व साक्षी ॥६॥
तीतें अवलोकुनी नयनीं । अलिप्त भासली त्रिगुणी ॥
योगधारणा जेवीं उन्मनी ॥ महाकारणी पक्कदशा ॥७॥
भास भासला सुनीळ । नीळिमा न दिसेचि अळुमाळ ॥
महदाकाश जेवीं निर्मळ । त्यातें मळ स्पर्शेना ॥८॥
ऐशी ऐका जनकजननी । सकळ ऐश्वर्याची स्वामिनी ॥
परमानंदें मौळी चरणीं । ठेवितां मनीं सुख झालें ॥९॥
स्तवन करुं जातां सखोल । अंगिकारिजे बोबडे बोल ॥
जड दृश्यातें करुनि फोल । निज तंदुल स्वीकारी ॥१०॥

प्रेमें करोनि भक्तिवाद । स्वात्म सुखाचे सुस्वाद ॥
माते बोधिला जो बोध । तोचि प्रसिद्ध बोलिजे ॥११॥
तुझी कृपा पूर्ण माते । वर वोपिला वरद हस्तें ॥
सहजी सहज पूर्णत्वाते । तत्त्वाववेत्ते उमजती ॥१२॥
अहो जी सच्चें सद्भाविक । ग्रंथश्रवणें पावती सुख ॥
महद्दोषिया स्वर्गलोक । निज विवेक प्रकटवी ॥१३॥
कर्मठ जनाते कर्मी गति । उपासका निर्विकल्प भक्ति ॥
ज्ञानियातें ज्ञानप्राप्ति । ऐशी स्फूर्ति वदविजे ॥१४॥
निष्काम कामनायुक्त वचन । आग्रह परमार्थसाधन ॥
अवश्य म्हणोन वरदान । ग्रंथ निधान निर्मिजे ॥१५॥
वरदवाक्याची पुष्टता । स्फूर्तीसी झाली आधिक्यता ॥
इच्छामात्रें सायुज्यता । तात्काळता पाविजे ॥१६॥
श्रवण करिता श्रवण घडे । अन्वयार्थे मनन आतुडे ॥
निदिध्यासे भक्ति वाढे । साक्षित्व जोडे सहजेची ॥१७॥
ॐ कार बीज वेदमाता । तेथुनि त्रिकांडी प्रसिद्धता ॥
अकार, उकार, मकारता । सुलीनता प्रसवली ॥१८॥
हेचि दशा धरुनि मनीं । अवधान द्यावें श्रोतेजनी ॥
ऐक्यभाव दृढ धरोनि । श्रद्धें करुनी परिसिजे ॥१९॥
येथें चातुर्य गांभीर्य । अनुभवावे सच्चवीर्य ॥
शुद्धसत्त्वे पाविजे धैर्य । हेंचि कार्य साधका ॥२०॥

प्रथम कर्मभोग गहन । हे तव देहाचें लक्षण ॥
देह रुपें ब्रह्म आपण । सहज साधन पैं त्याचें ॥२१॥
तोचि कर्म प्रतिपादिता । त्याचे स्वरुपीं सकळसत्ता ॥
तेथें कर्मत्याग करिता । होय सर्वथा अविवेक ॥२२॥
कर्माधार स्वाधिष्ठान । जेथोनि सृजले सकलजन ॥
जगदीश ऐसे अभिधान । ब्रह्मा आपण पावला ॥२३॥
सलोकता मुक्ति विद्यमान । मुख्य जागृतीचें स्फुरण ॥
या नांवें गा ब्रह्मसदन । कर्मे जाण भोगावीं ॥२४॥
कनकावेगळी कांति नोहे । भानव प्रभेचि दीप्ति होये ॥
रजनी अंधकार साहे । कर्म पाहे या रीती ॥२५॥
मेघापासाव वर्षे घन । घने विद्युल्लता दर्शन ॥
वायुरुपें संभाषण । शुद्ध व्याख्यान गर्जति ॥२६॥
शब्दासरिसा तर्क झाला । ओंकार त्रिगुणरुपें नटला ॥
त्रिविध विस्तार पावला । वृक्ष ठेला मूळ बीजे ॥२७॥
वृक्षीं पत्र पुष्पीं फळ । शरीर कर्माचें अनुकूळ ॥
अनुकूल तेथें प्रतिकूळ । कर्म प्रांजळ जाणिजे ॥२८॥
कर्मे होय स्वरुपप्राप्ति । कर्मत्यागें कवण गति ॥
जै देहेंद्रिय विषय सुटती । तैच त्यजिजे कर्मातें ॥२९॥
ब्रह्मा जरी सिद्ध झाला । कर्में ब्रह्मत्व पावला ॥
वेद साक्षात् निर्मिला । प्रचीत बोला मानिजे ॥३०॥

समीपता मुक्ति वैकुंठ । लिंगदेह म्हणती कंठ ॥
जो अवतारी बलिष्ठ । कर्मश्रेष्ठ तो करी ॥३१॥
अनेक असुरातें निवटिलें । मग देवपण अंगा आलें ॥
भक्तवत्सल म्हणविलें । कर्म केलें म्हणवोनी ॥३२॥
बोलतां वाढेल विस्तार । रामचंद्रादि अवतार ॥
सर्वे घेऊनि वानर । लंकाद्वार लक्षिलें ॥३३॥
समुद्रीं बांधला विवेकसेत । रामनामें पाषाण मुक्त ॥
भवार्णवीं साधुसंत । तरले समर्थ यन्न्यायें ॥३४॥
रावणइंद्रजित मारला । कुंभकर्णाचा वध केला ॥
राक्षसकुळ आटिता झाला । भक्त स्थापिला बिभीषणु ॥३५॥
सीता सोडविली जानकी । प्रताप झाला तिही लोकीं ॥
मारुति, अंगद, सुग्रीवादिकीं । कर्मे मैत्रीकी लाधलें ॥३६॥
ऐसें निजकर्मे उद्धार । प्रकट झाला शारंगधर ॥
बंधनमुक्त केले पितर । कर्म थोर पै त्याचें ॥३७॥
लीलाचरित्र खेळला । सर्प काळिया नाथिला ॥
आणी गोवर्धन उचलीला । व्रजा झाला आल्हादु ॥३८॥
कंस चाणूर पूर्व वैरी । मातुळ उभयातें संहारी ॥
द्वारका वसविली स्तंभावरी । समुद्रामाझारी असुरभेणें ॥३९॥
धर्माधरीं सेवक झाला । सर्वदा भक्तीने बांधला ॥
देव प्रेमाचा भुकेला । त्याची कळा तोचि जाणे ॥४०॥

पंडुकमरातें रक्षिलें । कौरवकुळाचें हनन केलें ॥
गीतावाक्य उपदेशिलें । सारथी झाले ततसमयीं ॥४१॥
अर्जुन मायेने वेष्टिला । तेव्हां कर्माधार बोधिला ॥
क्षेत्रीं शूरत्व पावला । श्लाघ्य झाला नरदेहीं ॥४२॥
भागवतामाजी एकादशु । उद्धवासी केला उपदेशु ॥
चुकवोनि त्याचा पपाशु । ज्ञानसारांशु प्रेरिला ॥४३॥
धर्म स्थापिला राज्यासनीं । धर्मजिज्ञासा श्रुति म्हणोनी ॥
ऐशी कर्माची कहाणी । सज्जनजनीं ग्राहिजे ॥४४॥
नेत्रीं स्वरुप पाहिजे । कर्णद्वारें श्रवण कीजे ॥
घ्राणें सुवास घेईजे । मुखें बोलिजे संतचर्चा ॥४५॥
गुह्यें मूत्र विसर्ग वीर्य । गुदीं मळपतनाचें कार्य ॥
या नांव षट्कर्म धैर्य । श्रेष्ठ आचार्य बोलती ॥४६॥
जोंवरि देह पाशें बांधिला । तोंवरि कर्म न चुके वहिला ॥
देह त्यागें विटाळला । अर्थ केला कर्मठें ॥४७॥
जित्या हातीं कर्म करिती । मेल्या कर्मभावना नुठती ॥
दशा झालिया स्वीकारिती । होय उपरति कर्मातें ॥४८॥
श्रीसदगुरुचा असा महिमा । भरोनि उरला असे कर्मा ॥
त्यातें त्यागोनि विशेष महिमा । काय आम्हां होइजे ॥४९॥
ऐसें कर्मकांड गहन । जें वेदाचें प्रथम स्थान ॥
प्रत्यक्ष भासे समसमान । त्यातें कोण न मानिती ॥५०॥

प्रत्यक्षास काय प्रमाण । आशंका मानिती अधमजन ॥
जे मंदमती आळशी जन । ते कर्मठपण त्यागिती ॥५१॥
देखिल्यावाचोनि दृष्टी न पडे । ऐकिल्यावाचोनि साक्ष न घडे ॥
प्रणवाविरहित संध्या नातुडे । कर्म धडफुडे यापरी ॥५२॥
वाणीविना शब्द न फुटे । गुह्यावेगळा विचार न वठे ॥
गुदद्वारें श्रद्धा नटे । कर्म वाटें लाविजे ॥५३॥
माझे मराठाया बाल । झणीं तुम्ही मानाल फोल ॥
जस धर्मशास्त्रीचें डोल । प्राचीन चाल कर्माची ॥५४॥
अमृताअंगीं कर्म कैसें । किंचित् सेविल्या मृत्यु निरसे ॥
विषप्रलयें देह नासे । मृत्यु अनायासे ठेविला ॥५५॥
सृष्टि कर्मारंभें झाली । कर्मयोगें सिद्धता आली ॥
प्रजापाळें निर्माण केलीं । कर्मबळी बळीवंत ॥५६॥
पशुपतीसी कर्म जडलें । कारणदेहातें स्वीकारिलें ॥
सरुपता मुक्तिसी वरिलें । कर्म झालें तामस ॥५७॥
त्रिगुणगुण तो त्रिपुरासुर । संहारिला अति दुर्धर ॥
निर्गुण माया गौरीहर । कर्मविचार त्यालागीं ॥५८॥
प्राज्ञ तो झाला अभिमानी । ज्वाला निघती तृतीय नयनीं ।
जैसा सूर्य लक्ष योजनी । पृथ्वीपासोनि मूळसंख्या ॥५९॥
यापरी स्वरुप शिवाचें । ध्यान ओंकार तयाचें ॥
जैसे गतायुष्य निशीचे । बालार्काचें फळ लाभे ॥६०॥

रेखा नुल्लंघिती कर्माची । प्राज्ञ तेचि निजमाया ॥६१॥
ओंकार मायेपासाव सर्व । ब्रह्मा विष्णु महादेव ॥
ऋषी आणि गणगंधर्व । प्रिय सदैव मायेचे ॥६२॥
महामाया सर्व साक्षिणी । सायुज्यता पीठनिवासिनी ॥
अवस्थात्रयातें देखणी । कर्माचरणी ते रिघे ॥६३॥
तुर्या उन्मनीते लाहे । तेव्हां कर्म सांग होये ॥
या कर्माचें फळ काये । मुख्य पाय सदगुरुचे ॥६४॥
सदगुरुचरणीं परमामृत । जें अमरातें करी तृप्त ॥
तेथें मानवभूतजात । कैसेनि अतृप्त राहती ॥६५॥
यालागीं सदगुरुसेवन । पूजाअर्चनादि वंदन ॥
श्रद्धायुक्त करोनि मन । उपदेश पूर्ण परिसावा ॥६६॥
कर्मी कर्माची कडसणी । कर्मे होती राजधानी ॥
एक बैसले भोजनीं । समाधानी आंचवले ॥६७॥
एकीं विडे घेतले त्वरित । स्वकार्यासी चंचल होत ॥
आंपुले धुंडिती निजहित । कर्मपंथ वळंधिले ॥६८॥
धरोनि षट्कर्मी ऐक्यता । सत्त्वर रिघाले भक्तिपंथा ॥
कर्मवंचकु अधः पाता । जाता वेळ न लगेची ॥६९॥
एकचि कर्म झाले त्रिविध । जाणत्या पुरुषा त्रिविध शुद्ध ॥
नसतां अर्थार्थ संबंध । चैतन्य विविध वर्ण झाला ॥७०॥

सोंगें बहुरुपी घेतसे । आपुला आपण ठाऊक असे ॥
असोनि गुप्त दावितसे । कर्मासरिसे वेष धरी ॥७१॥
पाहतां निर्गुण तेंचि सगुण । साक्षी आपुला आपण ॥
तेथें कर्मत्यागी कवण । दुसरेंपण विकल्पें ॥७२॥
विकल्प संकल्प कर्मजात । ज्याचा न दिसे आदिअंत ॥
ठायींचे ठायीं आकळित । कर्म अल्प पैं माझें ॥७३॥
माझे आप्तासी निंदिती । त्यासी कैची उत्तम गती ॥
उत्तम उत्तमातें जाणती । ऐसी स्थिती गुरुकृपा ॥७४॥
प्रथमाश्रम ब्रह्मचर्य । गृहस्थ वानप्रस्थ निर्णय ॥
संन्यास परमहंस धैर्य । हेही आश्रम कर्माचें ॥७५॥
एकमेवाद्वितीयं ब्रह्मेति । ऐसी बोलली सिद्धान्त श्रुति ॥
तोचि कर्म कळावयाप्रति । द्वितीयं खं श्रुति यदर्थे ॥७६॥
ब्रह्मार्पण कर्म करणें । गीता बोले व्यासवचनें ॥
कर्मसमाधि आचरणें । साक्षेप करणें ययाचा ॥७७॥
जयाचें कर्मी रतलें मन । सलोकता मुक्ति त्याआधीन ॥
प्राप्त होये ब्रह्मसदन । ब्रह्मा आपण संतोषे ॥७८॥
ब्रह्मलोकप्राप्तिरस्तु । कर्म आशीर्वाद हेतु ॥
स्वकर्मामाजि भगवंतु । असे तिष्ठतु त्यापासी ॥७९॥
एक कर्म त्रिविध झालें । पूर्व ओवीसी निरोपिलें ॥
झणीं मानाल तें चुकलें । भय मानिलें कर्माचें ॥८०॥

कर्म अकर्म वृद्धाचार । हा विविध त्रिप्रकार ॥
ययाचें रुप करुं साचार । सारासार जाणता ॥८१॥
स्वकर्में होय उत्तम गती । अकर्मे घोर नरकप्राप्ती ॥
वृद्धाचार बुध कथिती । त्रिविध जन्मती एकमेका ॥८२॥
एकीं अनेक उपजले । अनेकीं एक भरोनि उरलें ॥
हेंचि पाहिजे पाहिलें । सदैव संचले चिरकाळ ॥८३॥
चिरकाळ ना अकाळ ज्यासी । आब्रह्मस्तंभ परियेसी ॥
अंतर्बाह्य सावकाशी । कर्म काशीक्षेत्र हें ॥८४॥
काशीक्षेत्र पुण्यभूमी । जान्हवी तोय पवित्र नामीं ॥
विश्वनाथ स्थावर जंगमीं । काळऊर्मी भैरव ॥८५॥
त्रिवेणी संगम प्रयाग । स्त्रानमात्रें पुण्य चांग ॥
या नांव सत्कर्मभोग । कर्मयोग साधिती ॥८६॥
अक्षयवटाचें दर्शन । अज्ञान जडमूढ पावन ॥
विष्णुपदीं पिंडदान । कर्माचरण मुख्यत्वें ॥८७॥
फल्गुश्राद्धविधीचा नेम । पितर पावती वैकुंठधाम ॥
गया माया आधारकर्म । आचरण उत्तम या नावें ॥८८॥
शम दम तितिक्षा उपरति । श्रद्धा समाधान वृत्ति ॥
याची सांगेन उपपत्ति । हेहि स्थिति परियेसा ॥८९॥
षट्कर्मे तीं त्रिविध झालीं । शमदमदशा एकवटली ॥
तितिक्षा उपरतीसी आली । श्रद्धा पावली समाधान ॥९०॥

त्रिविध कर्म एक झालें । सगुण स्वरुपीं साकारिलें ॥
चैतन्य ओंकार भासलें । साक्ष राहिलें म्हणोनी ॥९१॥
साक्ष उत्तम कर्म करिती । असाक्ष अलिप्तत भाविती ॥
यया उभयतातें जाणती । शुद्ध विरक्ती कर्म चाले ॥९२॥
दशा झालिया विरक्त । ब्रह्मनिष्ठ जन्मले भक्त ॥
तेंहि कर्म स्वतंत्र सूक्त । कर्म अयुक्त न म्हणिजे ॥९३॥
कर्म निजाचा जिव्हाळा । जेणें संस्कार दाविले सोळा ॥
सत्रावी ते कर्मशाळा । ब्रह्मगोळा तेचि ते ॥९४॥
सर्वांगा शिर प्रमाण । ब्रह्मीं कर्म तत्समान ॥
यदर्थीं द्यावया दूषण । श्रुति आपण न बोले ॥९५॥
वृद्धाचार कर्च टाकिलें । तरी हातासी काय आलें ॥
जगामाजि निंद्य झालें । कुयोग बोले मानिती ॥९६॥
त्रिविध जनाची लाज धरुं । तरी कर्मे कैसी करुं ॥
ययाचें पाहिजे उत्तरुं । जो उद्गारु स्वात्मसुखीं ॥९७॥
उत्तम मध्यम कनिष्ठ । या तिन्हींचा परिपाठ ॥
राजस तामस सत्त्व ज्येष्ठ । कुष्ट पिष्ट न बोले ॥९८॥
कुष्टपिष्टाची राहटी । बोलतां स्तुत निंदा उठी ॥
जें, जें, नेमिलें श्रेष्ठश्रेष्ठीं । त्या त्या गोष्टी प्रसिद्ध ॥९९॥
प्रसिद्धाची कडसणी । स्तवितां शिणली वेदवाणी ॥
शेष तोहि सहस्त्रवदनी । स्तब्ध होवोनि पैं ठेला ॥१००॥

तेथें कायसा मी धडफुडा । कर्मसाह्य तो सवंगडा ॥
जयाचे धर्मशब्द तोंडा । कर्मधेंडा नाचवी ॥१०१॥
जेविल्या ढेंकर देती द्विधा । गुदद्वारें होतसे श्रद्धा ॥
एक पोटीं त्रिविध बाधा । साक्ष त्रिशुद्धा तोचि तो ॥१०२॥
आपुलें स्वरुपीं निमग्न । रक्त, श्वेत आणि कृष्ण ॥
जाणीव ते नीलवर्ण । वर्णरहित तोचि तो ॥१०३॥
वर्ण नसतां कर्माचरण । चौथा देह मसुरप्रमाण ॥
पाहूं न शके त्रिगुणगुण । कर्म उन्मन तोचि तो ॥१०४॥
पिंड ब्रह्मांडाचा सांधा । येथे सांधिला रे प्रबुद्धा ॥
हेंचि घडलें जरासंधा । कृष्णद्वंद्वा तोचि तो ॥१०५॥
जैसे बाळ तरुण वृद्ध । निभोनि वाचले ते त्रिविध ॥
तोचि पूर्ण कर्मावबोध । बोधी बोध तोचि तो ॥१०६॥
ऐसी बोधाचि प्रवृत्ती । कर्मे आपुले आप होती ॥
तेव्हांचि ते रुप पावती । कळलें म्हणती तोचि तो ॥१०७॥
एक चाळिती स्वकर्मातें । एक धरिती अकर्मातें ॥
यया दोघा उभयतातें । जाणे यथार्थ तोचि तो ॥१०८॥
आकाश तेजानें व्यापिलें । अंधः कार आइते आले ॥
तेथें स्थूळ जें पाहिलें । कर्म चांगले तोचि तो ॥१०९॥
अथवा साक्षात्कार झाला । डोळा प्रतीतीने पाहिला ॥
कर्मआंधळा तोचि तो भ्रमला । त्रिविध नाथिला तोचि तो ॥११०॥

गर्भाधासी पाहूं जातां । कर्म नाढळे तत्त्वता ॥
श्रवणद्वारें भक्तिपंथा । रिघे सर्वथा तोचि तो ॥१११॥
दश इंद्रियांचें चिन्ह । श्रवणद्वारें करी श्रवण ॥
तोंचि तयाचें समाधान । जाणे खूण तोचि तो ॥११२॥
सुवास दुर्वास वासना । घ्राणें घेतसे अवधाना ॥
तेथें प्रकटली वेधना । आप आपण तोचि तो ॥११३॥
शब्द सोलीव बहुत कुशळ । गोड, तीक्ष्ण, कडू, रसाळ ॥
द्विदळ टाळे होये घोळ । जिव्हा परिमळ तोचि तो ॥११४॥
गुह्य गुह्यार्थे दाविती । गुह्या वेगळी न चले युक्ति ॥
कर्मभूमिका त्यासी म्हणती । प्रजापती तोचि तो ॥११५॥
आधार दुर्गधीतें टाकी । नीच म्हणती दुर्विवेकी ।
विवेक न करतां घातकी । महत्पातकी तोचि तो ॥११६॥
एवं कर्माचें स्फुरणे । सकळ समाधीचीं लक्षणें ॥
षट्कर्मातें साक्ष होणें । कर्म जाणे तोचि तो ॥११७॥
कर्मलाभें सिद्ध झाला । सिद्ध कर्मारंभ ठेला ॥
स्वानंद चैतन्य पावला । सिद्धान्त केला कर्माचा ॥११८॥
स्वानंदाचें आनंदपण । गुह्य वस्तूचें आकर्षण ॥
सर्वाग देखणें परिपूर्ण । कर्म सौजन्य करावें ॥११९॥
कर्मावेगळी गति न पावे । कर्मावेगळा शुचि नव्हे ॥
कर्मे वासनाक्षय होये । मनोजय कर्माचा ॥१२०॥

ग्रंथीं धरावा विश्वास ।कर्मकांडीचा हा कोश ॥
कोटी कर्माची विशेष । श्रोते सारांश जाणती ॥१२१॥
कृष्णचैतन्य आदिपुरुष । वदता झाला तोचि अंश ॥
कर्मशोभा त्याची ज्यास । स्वानंदभास कर्माचा ॥१२२॥
कर्मकर्ता तोचि भोक्ता । वक्ता श्रोता समानता ॥
आनंदवरदायिनी माता । सदगुरुपिता व्यंकटेश ॥१२३॥
त्याचे पोटीं बाळ सानें । कृष्णचैतन्य उदरा येणें ॥
ग्रंथ निर्माण केला तेणें । सज्जनजनें परिसीजे ॥१२४॥
फळाशा इच्छिजे मानसीं । निष्काम पठण ग्रंथासी ॥
करितां ऋद्धिसिद्धि दासी । वरदवाक्यासी जाणिजे ॥१२५॥
व्याख्यानकर्मकांड निपुण । ग्रंथीं करील अवलोकन ॥
त्याचें संतुष्ट होईल मन । सायोज्य सदन पावती ॥१२६॥
यजन, याजन, अध्ययन । अध्यापन आणि दान ॥
प्रतिग्रहाचें भूषण । कर्मषट् कोण ब्राह्मणा ॥१२७॥
हे कर्मयोग धारणा । संत मानितील या वचना ॥
इतरास हे विवंचना । अगम्य जाणा सर्वथा ॥१२८॥
सदगुरुसी शरण रिघाले । तापत्रयातें निमाले ॥
आपआपणा उमजले । सूचित झाले कर्माविषयीं ॥१२९॥
संपूर्ण झाली कर्मरचना । पुढा सांगिजे उपासना ॥
भक्तिमार्गे करुनि श्रवणा । विकल्प दूषणा निवटीजे ॥१३०॥
स्वानंद चैतन्य ग्रंथवक्ता । कृष्णानंद लेखनकर्ता ॥
स्वात्मसुखाची निजवार्ता । संतसमर्था अर्पिजे ॥१३१॥
इति श्रीनरसिंव्हसरस्वतीस्वामिमहाराजकृते श्रीस्वात्मसौख्ये ग्रंथेकर्मकांडं संपूर्णमस्तु ॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।

स्वात्मसौख्य – उपासनाकांड

॥ श्रीगजानन प्रसन्न ॥
॥ श्रीनरसिंव्हसरस्वतीसदगुरुभ्योनमः ॥
॥ श्रीगणेशायनमः ॥
जय जय सदगुरु परमगुरु । व्यंकटेश चैतन्य सागरु ॥
तुझे कृपेचा दिनकरु । स्वानंदतरु उगवला ॥१॥
स्वानंदाचेनि आनंदे । आल्हाद झाला तुझेनि बोधे ॥
चंद्रामृते चकोरवृंदे । तृप्त विविधे पैं जैसी ॥२॥
कूर्मदृष्टि अवलोकन । तेणें बालका समाधान ॥
तेंचि तयाचे पयः पान । कणव समान करिसी कीं ॥३॥
मतिमंद परि तुझा दास । आळसी दुर्जन मी सर्वास ॥
माझे अंगिकारिसी दोष । केवढें यश तुजलागीं ॥४॥
यश अपयश तुज न लगे । माझी बुद्धि बरळूं लागे ॥
वृथा न बोलतां ग्रंथवेगें । सवेग वेगें करिशी कीं ॥५॥
तुझी जिव्हा सरस्वती । अलभ्य लाभें फळली मती ॥
मत्रिभ्रंशामाजि स्फूर्ती । कृपामूर्ती तव सत्ता ॥६॥
तुझे कृपेचा विस्तारु । वृद्धि पावला विवेक मेरु ॥
जन्मांधासी दिनकरु । भासला साचारु तत्प्रायें ॥७॥
वृक्ष बीजाचा अंकुरु । बीज होये वृक्षाकारु ॥
बीज वृक्ष उभय तरु । अद्वय साचारु भिन्नत्वें ॥८॥
गुरु अद्वयानंदरुपा । तव कृपेचा मार्ग सोपा ॥
अंतर्गृहीं लाविल्या दीपा । प्रकाश घे पां गृहभरी ॥९॥
किंवा दिनमणी प्रकाशे । स्वयंप्रकाश अविद्या भासे ॥
तमतेज तेथें समूळ नसे । साक्ष अनायासें सदगुरु ॥१०॥

सदगुरु जी जगदगुरु । नाममात्रें वर्णोच्चारु ॥
प्रत्यगात्मा तो ईश्वरु । जेणें जठरु तृप्तता ॥११॥
जठराग्नि याग संपन्न । सर्वभूतीं विराजमान ॥
तेथें यज्ञ होय हवन । पूजा हवन करिसी कीं ॥१२॥
मी कोण ऐसें नेणता । अंगा आणूं शके सकळ सत्ता ॥
अज्ञान परि भक्तिपंथा । मज लेखितां तूंचि कीं ॥१३॥
प्राप्त झालिया चिंतामणी । चित्तीं चिंता दुरभिमानी ॥
वळख न पुरे तो कहाणी । काष्ठ स्मरणी धरिसी कीं ॥१४॥
अनंत ब्रह्मांड कलेवरे । अंगीं ल्यालासी एकसरे ॥
तेथें कोण मी दुसरे । निवड अवसरें करिसी कीं ॥१५॥
भक्ता अभक्तांचा मेळा । तुझें ठायीं प्रकट डोळा ॥
पाहोनि समान कळवळा । प्रेमागळा होसी कीं ॥१६॥
किंवा शर्करेची गोडी । वेगळी काढोनि बांधी जो पुडी ॥
द्वैत न जोडतां आवडी । अद्वय परवडी वदसी कीं ॥१७॥
वाग्विलासें वरदाता । प्रसन्न झाली कुलदेवता ॥
मूळपीठीची मूळमाता । तीतें स्मरतां तूंच कीं ॥१८॥
कोटी बालार्काचा वर्ण । यन्न्यायें भासती चरण ॥
सौंदर्य पावले भूषण । स्वरुपीं कृपण नव्हें कीं ॥१९॥
स्वरुपप्राप्तीची कृपणता । झणीं वदशील तूं वक्ता ॥
अवधान देऊनी ग्रंथा । अर्थश्रोता होसी कीं ॥२०॥

उपासनाकांड झालें प्रथम । आतां उपासकाचा काम ॥
पूर्णकर्ता सर्वोत्तम । विधिचा नेम नेमिला ॥२१॥
शक्ति अर्चन तपोधन । जनक जननी हे प्रमाण ॥
तेथें निंदास्तुति दूषण । ब्रह्मा आपण न बोले ॥२२॥
मृत्तिकेपासुनी घट झाला । यथाकाळें जरी भंगला ॥
स्वरुपीं न मिळतां राहिला । व्यर्थ केला सायास ॥२३॥
स्वातिबिंदु अवचित पडे । मुक्त शुक्तिकेवेगळे न घडे ॥
कठिणत्वाचा दंभ जडे । जैसे खडे पाषाण ॥२४॥
समुद्रामाजील पाषाण । तेचि श्रीमंताचें भूषण ॥
शिवशक्तीचा योग जाण । विद्वज्जन जाणती ॥२५॥
शिवशक्तीचा अपार पार । अवसान आलें स्वरुपावर ॥
जन्ममृत्यूचा प्रकार । विधिचा व्यापार जाणिजे ॥२६॥
उपासक पितामह वरिष्ठ । तेणें कर्म केलें श्रेष्ठ ॥
जगबुद्धि झाली भ्रष्ट । तैसें अदृष्ट ओढवें ॥२७॥
पूर्वाध्यायीं कर्मविधि । बोले द्वितीयकांड समाधि ॥
अद्वैत वाक्य धरोनि संधि । पैल अपराधी मी नव्हे ॥२८॥
अपराध सर्वासी लागला । पुरुष स्वस्त्रिये जी मीनला ॥
तो काय शासनातें पावला । स्पर्श झाला म्हणोनी ॥२९॥
आपले वित्त संग्रह करितां । अन्यत्र इच्छा न इच्छितां ॥
त्यासी पापरुपी म्हणतां । नव्हे तत्त्वता तो बद्ध ॥३०॥

विशाल ग्रामातें वसविलें । आपुले स्वबुद्धि पालन केलें ॥
काय अधमत्व प्राप्त झालें । योग्य केलें म्हणोनी ॥३१॥
औदार्य अतर्काचा उदधी । स्वतः पावला मंदबुद्धी ।
मंदबुद्धी तेजोनिधी । बाह्य उपाधि विधिबाह्य ॥३२॥
मंत्रशास्त्र विवंचना । प्रगट झाली उपासना ॥
गुह्य वस्तूची वेधना । विकल्प मना न बाधी ॥३३॥
मनापरती गुह्य वस्तु । जेथे मनपवनासी अस्तु ॥
तेथीचा बोलिजे वृत्तान्तु । सकळ स्वार्थु कल्पिला ॥३४॥
अज्ञानज्ञानाची मिश्रता । तेथे होईल ऐक्य चित्ता ॥
सुहद आत्म्यापरी श्रोता । जैसा भ्राता सौमित्रा ॥३५॥
पद्मपुष्पीं भ्रमर लुब्ध । सदैव सेविताहे सुगंध ॥
मुमुक्षा लाहे तरी बोध । वेदशुद्ध बोलणें ॥३६॥
श्रवण भाविकाची गोडी । अपेक्षित पदार्थ आवडी ॥
मागुनी घेतां लज्जा सोडी । तैसी परवडी मुमुक्षा ॥३७॥
त्रिकांड ब्रह्मविद्या गहन । कर्म उपासना आणि ज्ञान ॥
विशाल नेत्रीचें अंजन । तेथुनि त्रिगुण प्रगटती ॥३८॥
उपासना विष्णुमूर्ती । सत्त्वें प्रकाशला त्रिजगतीं ॥
धारणा धरिली कारणपंथीं । अनुभवयुक्ती सज्जना ॥३९॥
कारण कारणातें प्राशी । प्रथमा म्हणावें तयासी ।
लक्षितां पंचमकारासी । विकल्पतेसी नातळे ॥४०॥

द्वितीया रजोगुणसिद्धि । वराहअवतार समाधि ॥
मंत्र तृतीयेची बुद्धि । स्पष्टार्थ विधि बोलिला ॥४१॥
चतुर्थी अन्नब्रह्म पूर्ण । पंचमीं कैवल्य निधान ॥
सदगुरु आचार्य संपन्न । श्रीचक्रपूजन जो कर्ता ॥४२॥
सदाशिव कारणीं निमग्न । तेंचि तयाचें विषप्राशन ॥
म्हणोनि वसविलें स्मशान । तृतीय नयन तयाचा ॥४३॥
नीळकंठ भोळा चक्रवर्ती । प्रकाश विष्णु हदयस्थिती ॥
निशीं वसवी सोमदीप्ती । किंवा कांती तरणीची ॥४४॥
अवस्थात्रयातें साक्षिणी । माया तूर्या अपरोक्षिणी ॥
लागली उपासनेचे व्यसनीं । उन्मनी मनीं अवतरे ॥४५॥
उपासना किंनिमित्त । याची कायसी फलश्रुत ॥
श्रोती एकाग्र करोनि चित्त । स्वकार्यवृत्त परिसीजे ॥४६॥
कर्म इहजन्मीं करावें । जन्मजन्मांतरीं फळ भोगावें ॥
हाचि विकल्प मानिला जीवें । सध्या न पवे म्हणोनी ॥४७॥
पुढे जन्म देखिला कवणें । बोलतां वाटे लाजिरवाणें ॥
ऐसें म्हणो तरी शहाणे । विचार करणें ययाचा ॥४८॥
विचार करितां कांही न दिसे । अविद्याभ्रममात्रचि भासे ॥
भ्रमें करोनि लागलें पिसें । भूतें अनायासें वर्तती ॥४९॥
पंचभूतें भिन्न भिन्न । एकत्र मीनलीं अभिन्न ॥
गुणानुवादें परिच्छिन्न । प्रगट वर्ण जयाचा ॥५०॥

पृथ्वी आप तेज वायो । आकाश पोकळी समुदायो ॥
याचा कायसा अभिप्रायो । हाचि उपायो वाऊगा ॥५१॥
जैसें शरीर नाशवंत । तैसीं पंचतत्त्वे अयुक्त ॥
कर्म केल्या कोणासी प्राप्त । काय अर्थ होतसे ॥५२॥
अर्थ अनर्थाचें मूळ । भ्रांतालागी त्रिकुट पडळ ॥
वाचे न व्हावा विटाळ । कर्म चांडाळ लौकिकी ॥५३॥
लौकिकार्थ कर्म करिती । आणि लक्ष्मीस वांछिती ।
या नांव व्यभिचारभक्ती । भोगूं म्हणती परस्त्री ॥५४॥
हें मूर्खाचे मूर्खपण । कर्म केवळ अज्ञानधर्म ॥
निष्काम कर्माचें आख्यान । पूर्वाध्यायी बोलिलें ॥५५॥
अनन्यभावें सदगुरुसी शरण । रिघोनि कीजे विकल्पहरण ॥
जेणें होइजे निर्बेधहरण । स्वस्थता मन पाविजे ॥५६॥
मनाची चपळता मोठी । सदगुरुकृपें आकळे दृष्टी ॥
तरीच बुद्धि होये उफराटी । चमत्कार पेटी उघडिजे ॥५७॥
चमत्कार ते उपासना । नुठवी कर्माकर्म भावना ॥
सर्वखल्विदं ब्रह्म जाणा । श्रुतिवचना मानिजे ॥५८॥
हा तव अद्वैताचा लाटा । चतुर्वर्णाचा एकवटा ॥
स्वरुपीं लक्षितां निजनिष्ठा । सदभाव गोमटा धरोनी ॥५९॥
सदभावाचें रुप कैसे । आतां सांगेन अनायासें ।
काया वाचा आणि मानसें । सुखसंतोषें डुल्लती ॥६०॥

निजसुखीं सुखाचा सुकाळू । स्पर्शास्पर्श कैचा विटाळू ॥
जेथे द्वैताचा दुकाळू । स्वानंद कवळू भूतमात्रीं ॥६१॥
त्या कवळाचें महिमान । कुलार्णव बोले आपण ॥
वदत झाला गौरीरमण । जेणें दूषण न बाधी ॥६२॥
दूषण देती अज्ञान जग । ज्यासी ठाऊक नाही मार्ग ॥
गुह्य ज्ञान विचार सांग । करिती वेग स्वहिताचा ॥६३॥
श्रेष्ठ श्रेष्ठांचे आचरण । प्रारंभीं मुख्य गजानन ॥
उपासना भगवदभजन । करिता पूर्ण तो झाला ॥६४॥
चौदा विद्या चौसष्ट कळा । श्रीमंत आरक्त शारदा बाळा ॥
अर्धचंद्र शोभा कपाळा । साक्ष घननीळा पैं जैसा ॥६५॥
सकळ विघ्नातें नाशिलें । वेदें मस्तकीं नाम धरिलें ॥
युगानुयुगी प्रख्यात झालें । त्रिगुणीं संचलें स्वरुप ॥६६॥
मुख्य गुरु श्रीशंकर । अविगत पावला अधिकार ॥
गुह्य उपासना प्रकार । बोधिला साचार गुरुत्वें ॥६७॥
अविगतें स्थापिला विरिंची । शक्तिबळेम सृष्टीसी रची ॥
महिमा वाढविली स्थूळाची । कर्मविधीची भावना ॥६८॥
स्वयं ब्रह्मा प्रसन्न झाला । मार्कडेयासी बोध केला ॥
आयुष्य चिरकाळ पावला । मृत्यु ज्याला नातळे ॥६९॥
मार्कडेयाचा सौरस । रोमऋषीसी अभ्यास ॥
दावोनि आपुला चिद्विलास । कर्मपाश छेदिला ॥७०॥

रोमऋषीचें अवलोकन । धर्मऋषीसी झालें जाण ॥
तेणें सकळार्थ पावन । अनुसंधान चालिले ॥७१॥
धर्मऋषीचे संगतीं । विमल अखिया पावला गती ॥
तया सदव्रुत्तीची निजवृत्ती । दत्तात्रेय मूर्ति जगदगुरु ॥७२॥
जो समर्थ त्रैलोक्य दाता । पराशरासी झाला वक्ता ॥
पुरवोनि त्याचिया मनोरथा । सबाह्य समता अद्वयत्वें ॥७३॥
पराशराची बुद्धि प्रौढ । भरद्वाजासी उपदेश गूढ ॥
तारावया जडमूढ । उपाय दृढ करविले ॥७४॥
उपायाचा निजांकुर । केला गौतमाची उपकार ॥
जेणें जगासी उद्धार । गौतमी साचार आणिली ॥७५॥
गौतमें गर्गातें निवेदिलें । गर्गे जनकासी विदेह केलें ॥
राज्यासनीं बैसविलें । द्वैत हरविलें समूळेसी ॥७६॥
जनके शुकाचा पूर्ण हेत । सिद्धि पावलिला समस्त ॥
शुक्रे शिष्य केला श्वेत । श्वेतें केत उद्धरिला ॥७७॥
केतालागी रिघाला शरण । दुर्वास ऋषि तपोधन ॥
साठी खंड्याचें प्रमाण । पंचप्राण प्राणाहुती ॥७८॥
दुर्वास ऋषी प्रसन्न झाला । रोहिण्यास दर्शवी वहिला ॥
गुरु संप्रदाय वाढविला । उपाय केला सकळासी ॥७९॥
रोहिण्य आपुली स्वसत्ता । देता झाला जडभरता ॥
जडत्व विसरे निमग्नत । कृतकृत्यता ते झाली ॥८०॥

त्या निमग्नतेमाझारीं । वामदेवासी कृपा करी ॥
ऐशी परंपरा अवधारी । सूचित करी मानस ॥८१॥
वामदेवाचा उद्धारु । लाधला कपिल मुनेश्वरु ॥
उपासना विवेक सागरु । निजनिर्धारु आदरी ॥८२॥
आदरे आदरु ऋषीमुनी । प्रासादिक वरदवाणी ॥
तेचि देवमुनीचे श्रवणीं । पडतां मनीं उमजला ॥८३॥
देवमुनिने आपुलें गुज । शिवाचार्यासी प्रेरिलें सहज ॥
सन्मुखाचार्य मानोनि चोज । प्रेमें निज वळंघले ॥८४॥
सन्मुखाचार्य सदबुद्धि कोंभ । गौडाचार्यासी झाला लाभ ॥
बाळगोविंदाचार्य स्वयंभ । उपासकीं शुभ दोनी ॥८५॥
बाळगोविंदाचार्याप्रती । शंकराचार्य शिष्य होती ॥
कृपा संपादोनी पुरती । अवतार स्थिती गुरुरुप ॥८६॥
शंकराचार्यें आपुले मत । स्थापावयालागीं समस्त ।
शिष्य चत्वारी गुणवंत । ते निजभक्त प्रतापी ॥८७॥
विश्वरुपाचार्य प्रथम । पद्माचार्य द्वितीय नाम ॥
त्रोटकाचार्य तृतीय नेम । शिष्य उत्तम परिसावे ॥८८॥
पृथ्वीधराचार्य चौथा । अधिकर वोपिल समस्त ॥
चतुर्दिशा चतुश्पंथा । शासनार्था स्थापिले ॥८९॥
पश्चिम दिशा शारदामठ । संप्रदाय कीटवार प्रगट ॥
तीर्थ आश्रम संन्यासपट । द्वारका सुभट क्षेत्र जें ॥९०॥

परिसता आचार्यपदवी । भ्रम निरसवी चित्ताचा ॥९१॥
ब्रह्मस्वरुपाचार्य । गोमतीतीर्थ परमालय ॥
स्वरुप ब्रह्मचारी अपरसूर्य । सकळ कार्य जाणता ॥९२॥
सामवेदवाक्य पठण । तत्त्वमस्यादि विवरण ॥
जेथे मुमुक्षाचें मन । आत्मसाधन पूर्णत्वें ॥९३॥
जोशी मठ उत्तराम्नाय । आनंदानंदी सांप्रदाय ॥
गिरी पर्वत सागर त्रय । संन्यास होय या नांवे ॥९४॥
पद बदरिकाश्रम क्षेत्र । नारायण देवता विचित्र ॥
देवी पूर्ण गिरी पवित्र । मंत्रशास्त्र जाणती ॥९५॥
नर त्रोटकाचार्य सज्जन । अलकानंद तीर्थ पावन ॥
आनंद ब्रह्मचारी सधन । जो निजखूण लक्षिता ॥९६॥
अथर्वण वेदवाक्य पठण । जें पूर्णाचें पूर्णपण ॥
सकळविषयीं समाधान । अरि दुर्जन दंडिले ॥९७॥
पूर्व दिशा पूर्वाम्नाय । भोगवर्धन मठ अभिप्राय ॥
भोगावरी संप्रदाय । वन अरण्य संन्यासी ॥९८॥
पद पाहतां पुरुषोत्तम । क्षेत्र जगन्नाथ परम ॥
विमलादेवीचें निजधम । सुख विश्राम पावली ॥९९॥
बळिभद्र पद्माचार्या । प्रकाश ब्रह्म गुरुवर्या ॥
महोदधि तीर्थी जी स्वामिया । स्त्रानें अपाया नासिजे ॥१००॥

ऋग्वेदवाक्य पठण भावें । करिती प्रज्ञान वैभवें ॥
वेदान्त महावाक्य गौरवें । शुद्ध अवयवे शोभती ॥१०१॥
पूर्वाध्यायीं प्रारंभ । दक्षिणाम्नाय केला स्तंभ ॥
परि हा आनंदाचा कोंभ । निजारंभ वोपिला ॥१०२॥
हें स्वानंदाचे वैभव । गुरुपरंपरा लाघब ॥
भक्तिमात्रें सुखार्णव । महानुभाव जाणती ॥१०३॥
प्रेमें गुरुची गुरुभक्ती । प्रेमें विकल्पातीत होती ।
प्रेमें सच्छिष्य सेवा करिती । विश्रांति पावती निजबोधें ॥१०४॥
गुरुविणें देव न दिसे । गुरुविणें कांही न भासे ॥
गुरु अंतर्बाह्य वसे । रिता ठाव नसे गुरुविणें ॥१०५॥
तैसा माझा पूर्ण गुरु । प्रगट झाला सर्वेश्वरु ॥
आतां करीन उपचारु । विश्वास धरुं दर्शनाचा ॥१०६॥
दर्शनें तात्काळ मुक्तता । नातळे तयासी बद्धता ॥
बद्धमुक्ततेची चिंता । नसे सर्वथा सेवकातें ॥१०७॥
जे सदगुरुचरणी रत । ते सहजची जीवन्मुक्त ॥
जीवन्मुक्त तेचि संत । न बाधित ज्यालागीं ॥१०८॥
जे चिरंजीव सुखरुप । ज्यासी नातळे त्रिविध ताप ।
त्यासी कैचा अहंकंप । तपती तप तपस्वी ॥१०९॥
तरी काय वांछिती कामना । कामना नरकाची वासना ॥
समस्त भ्रममात्र रचना । भ्रमणा कोणा नातळे ॥११०॥

कोणास कोणी नोळखे । आपुलें स्वरुप आपण देखे ॥
प्रतिबिंबाचेनि हरिखे । स्वसुख चोखें मानले ॥१११॥
स्वयंसुखाचा सुखोपचार । जैसे रज्जू सर्पाकार ॥
भासला परी विवेकसार । रज्जु आकार जाणती ॥११२॥
विवेक निर्विकार सज्जन । कां वर्णिता दोषगुण ॥
दिसे ना दिसे अनुमान । तेथें स्तवन काईसें ॥११३॥
स्तवनें वाकसिद्धिसी पावे । ओंकार गुणागुण वर्णावे ॥
उत्तम गुण निवडोनि घ्यावे । दुर्गुण त्यजावे म्हणताती ॥११४॥
दुर्गुण आणि उत्तम गुण । गुरुचरणीं तत्समान ॥
ओंकाराचें नसे भान । ब्रह्म आपण स्वरुपीं ॥११५॥
ब्रह्मीं ब्रह्मत्व समूळ नसे । आनंदमात्रचि विलसे ॥
अर्धमात्रा गुरु समरसे । उपाधिवेषें जडधारी ॥११६॥
तरी तो काय जड म्हणावा । शुद्ध चैतन्य ओळखावा ॥
उघड भेद परी लोपावा । कल्पना जीवा नसावी ॥११७॥
कल्पना वोळवुनी आपली । जरी वृत्ति सुर्चित झाली ॥
तेव्हा दशा म्हणों बाणली । प्राप्ति झाली सुखाची ॥११८॥
तेचि दश दशावतार । गुरुलीलामृत सागर ॥
दश इंद्रियांचा प्रकार । सहज विकार लागले ॥११९॥
यातेंही टाकोनि मागे । गुरुपदासी लाग वेगें ॥
जें भासें तें समस्त सोंगे । देखोनि उगे असावे ॥१२०॥

उगे राहतां अकार कैचा । उकार शब्दें वेदवाचा ॥
काम पुरवी मकाराचा । साक्ष त्याचा पाहिजे ॥१२१॥
साक्ष न घडे द्वैतावीण । म्हणोनि गुरुशिष्याचरण ॥
परंपरामालिका जाण । विधीची खूण अद्वैती ॥१२२॥
विधियुक्त विचार करणें । ऐसी बोलली श्रुतिवचनें ॥
बोल बोललों तत्प्रमाणें । आधिक्य उणें नव्हेची ॥१२३॥
नसतां शास्त्रीं व्युत्पन्नता । शब्दमात्र सदगुरुसत्ता ॥
बोलतां मूळाधार वार्ता । संशय चित्ता न बाधी ॥१२४॥
जे रेणुका महाकाळी । कामधेनु त्रैलोक्य पाळी ॥
जीचे गोरसाची नव्हाळी । सर्व काळीं घेईजे ॥१२५॥
त्या गोरसचें तांडव । हें उपासनेचें वैभव ॥
सर्वत्र मायेचें लाघव । गोडी अपूर्व तेथीची ॥१२६॥
गोडी घेतं सौख्य वाटे । कामना अबाधित प्रगटे ॥
संतोष पावती आत्मनिष्ठे । येर भ्रमिष्ठे भ्रमताती ॥१२७॥
आत्मनिष्ठावेगळा पाही । सौख्यभोग कोण्हासी नाही ॥
अमृताचे पडतां डोहीं । अपाय पाही विषयांचा ॥१२८॥
म्हणोनि अमृताचा त्याग । तैसाचि विषयाचा प्रसंग ॥
परमामृत तें ज्ञानयोग । साधिती चांग चांगलें ॥१२९॥
अपायाचा योग घडला । तेथें भक्तिप्रसंग राहिला ॥
अपाय तोचि उपाय केला । धर्म स्थापिला सर्वस्वें ॥१३०॥

स्वधर्म चांगले जें ज्ञान । शुद्ध स्फटिक अंतः करण ॥
पर्वप्रमाण पुरुष जाण । प्रकाश पूर्ण नयनाचा ॥१३१॥
विष्णु मायेचा प्रकाशक । हिरण्यगर्भ वैकुंठ लोक ॥
इच्छाशक्तीचे चालक । ज्ञानविवेक जे करी ॥१३२॥
विवेकज्ञान अनुभवसार । विश्वकुटुंबी परिवार ॥
स्वात्मसुखाचे उद्गार । निजनिर्धार आवडी ॥१३३॥
आवडी धरोनि ग्रंथी । उपासना शुद्ध भावार्थी ॥
अभावभावें नव्हेचि प्राप्ती । प्रतीति चित्तीं असावी ॥१३४॥
असावें तें स्वस्थ आहे । भगवत्कृपा लाधली पाहे ॥
मूर्तिमंत दिसताहे । कल्याण विषय विश्वासाचा ॥१३५॥
इक्षुदंडाचा मध्यभाग । रसाळ गोडी अपूर्व चांग ॥
आनंदमात्र स्वसौख्यभोग । प्रसन्न योग योजिला ॥१३६॥
उपासनाकाण्ड महिमा । अन्यत्र नसेचि उपमा ॥
श्रवण करितां देवी रमा । सकल कामा पुरवी ॥१३७॥
पूर्ण करोनि मनोरथ । ज्ञानकाण्डाचा भावार्थ ॥
बोल पाहे अनुभवार्थ । जो चरितार्थ वेदान्ती ॥१३८॥
वेदान्तविद्या सुशील कर्म । पूर्ण कर्ता पुरुषोत्तम ।
पंचदशी यंत्रनेम । हा स्वधर्म गुरुपदीं ॥१३९॥
कृष्णचैतन्य कृपासिंधू । व्यंकटेशासी केला बोधू ॥
स्वानंदसत्ता ते अगाधू । कृष्णानंदू लाधला ॥१४०॥

स्वात्मसौख्य – ज्ञानकांड

॥ श्रीगजानन प्रसन्न ॥
॥ श्रीनरसिंव्हसरस्वतीसदगुरुभ्योनमः ॥
॥ श्रीगणेशायनमः ॥
जय जय सदगुरु गणाधीशा । जय जय सदगुरु व्यंकटेशा ॥
जय जय स्वानंद परेशा । परब्रह्मरुपा ॥१॥
जय जय सदगुरु व्यंकटरमणा । सकळ ऐश्वर्य ज्ञानघना ॥
स्वरुपसुखाची वेधना । तुजची ठावी ॥२॥
ठावी प्रत्यक्ष असावी । स्वानंदाचे कृपार्णवीं ॥
भारती शक्तीचे निजवैभवीं । सुचलें मातें ॥३॥
तरी हे कय शारदा । यदर्थी वेदमर्यादा ॥
सकल विद्येची संपदा । जीचे अंगीं ॥४॥
अंगनारुपें प्रगटली । स्वरुपाची साउली ॥
जैशी चिन्मात्र बाहुली । त्रिगुणातीत ॥५॥
त्रिगुणातीत बैसली । ईशत्वपद पावली ॥
अपूर्ण पूर्ण जाहली । गुरुकृपेने ॥६॥
ते गुरुकृपा कैसी । चैतन्य आणिलें ध्यानासी ॥
मग सकळ सौख्यासी । सत्पात्र हे ॥७॥
स्पर्शमात्रें आनंद । कृष्णचैतन्य कृष्णानंद ॥
निरंजनाचा पूर्ण बोध । वदता झालों ॥८॥
निरंजन स्वरुप । वामसव्य उभयदीप ॥
देखनें मात्र एक । प्रकृति भिन्न ॥९॥
प्रकृतिस्तव बोलणें । तारुण्याचे कटाक्षबाणें ॥
विंधिलों परी अमृतपानें । तृप्त झालों ॥१०॥

इहजन्मीं आश्वलायन । जन्मांतरी माध्यंदिन ॥
तदनंतरें सामपठण । तृतीयवेदीं ॥११॥
अथर्वण चतुर्थवेद । शुद्धयादिक माझा भेद ॥
पंचम तैं कैवल्यपद । वामांग जें ॥१२॥
सूक्ष्म वेद तो वामांग । अणुप्रमाण ज्याचें अंग ॥
ज्ञानकांडाची लगबग । झाली माते ॥१३॥
वाचें हातीं बोलविता । ऐसी लाघविका सत्ता ॥
जैसा उगवला सविता । प्रकाशरुप ॥१४॥
सूर्याचा प्रकाश झाला । अन्यत्र काय घेऊन आला ॥
शब्दी शब्द प्रकटला । प्रगटाकृती ॥!५॥
मुख्य पाहतां कारण । तेंचि ज्ञान संभाषण ॥
उभयत्रासी जाणून । विज्ञानरुपें ॥१६॥
विज्ञान रुपाचा देखणा । देखिल्याविण आणिला ध्याना ॥
तरी या संप्रदाय खुणा । काय व्यर्थ होती ॥१७॥
व्यर्थ कांहीच न कीजे । सकळ ब्रह्मरुप जाणिजे ॥
अवकाशमाजी देखिजे । घनस्वरुप ॥१८॥
अवकाशामाजी घन । तें घटांतरील चिन्ह ॥
विश्व व्यापूनी अभिन्न । भिन्न नाहीं ॥१९॥
भिन्न भावितां भासे सर्प । परि रज्जूचा आरोप ॥
यदर्थी काय साक्षेप । करावाची लागे ॥२०॥

साक्षेप न करतांच कांहीं । सहजासहज वृत्ति पाही ॥
बोलिलों तें कांही बाही । श्रवण कीजे ॥२१॥
श्रवण श्रवणांतच आहे । डोळीयांत कण न साहे ॥
ऐसा माझा शब्द आहे । कल्पनातीत ॥२२॥
कल्पना ते काय वेगळी । विकल्प बुद्धीची काजळी ॥
लेखन पीठावरी विटाळी । घालणेंचि लागे ॥२३॥
की कागदावरी खळ । देऊनी कीजे निर्मळ ॥
मग वेदांत सुशील । लेखन कीजे ॥२४॥
कल्पना तल्लक्षण तम । तेथें चंद्रकांति उत्तम ॥
तरी ते काय अधम । म्हणावी बापा ॥२५॥
कारण कार्याचाचि योग । परी विरक्ताचें सोंग ॥
प्रपंच तोचि कुयोग । जाणिजे तेथे ॥२६॥
अद्वैतानंद दर्शन । मी तूं पणाचें भाषण ॥
विश्वीं आपुला आपण । झालें पाहिजे ॥२७॥
विश्व काय आपणा वेगळें । पाहतां भरली दोन्ही बुबुळे ॥
आतां संसाराचें मळें । तापला कोण ॥२८॥
तापत्रयासी तापले । अर्थान्वयासी उमजले ॥
मग सकळ दोष गेले । सत्संगें पैं ॥२९॥
तरी सत्संग कैसा व्हावा । उपाधिविरहित असावा ॥
कोणासी पैं नसावा । उबग जयाचा ॥३०॥

कोणी जेव्हां असेल । तेव्हां त्यासी उबग होईल ॥
मीतूंपणाचा तुटेल । संबंध जेव्हां ॥३१॥
तरी मी तूंपणा काय आहे । ममतारुपें न साहे ॥
मायामोहें नाश होये । योगाभ्यासीं ॥३२॥
माया निर्मोह करावी । उबगलेपणेंची असावी ॥
आज्ञा वंदिता धरावी । प्रीतीसूत्रें ॥३३॥
प्रीतिपात्र आज्ञाभंग । करोनि हो पाहे निः संग ॥
संग करितां आकाशमार्ग । पाहणें लागें ॥३४॥
अवकाशाचे पोकळी । एक जन्मली पुतळी ॥
तिचे स्वरुपाची नव्हाळी । देखिली डोळां ॥३५॥
ते प्रत्यक्ष डोळा दिसे । कीं आकाश ओतिलें असे ॥
नभमंडळीं नीलिमा भासे । सत्तामात्रें ॥३६॥
सत्तामात्रेंचि पाहणें । अनुभवमात्रेंचि बोलणें ॥
शब्दमात्रें विश्वासणें । ऐसी दशा ॥३७॥
दशा झाली स्फुरदरुप । ऐसा सदगुरुप्रताप ॥
सिद्ध सायोज्याचा ओप । प्रगट दीप लाविला ॥३८॥
प्रगट लाविली दीपमाळा । तेणें प्रकाश झाला सकळा ॥
ब्रह्मांड व्यापुनी घननीळा । वेगळा कैसा ॥३९॥
वेगळेपणाचि नाहीं । वेगळे करावें ते काई ॥
सर्व भूतांच्या ठायीं । माझा मीच एक ॥४०॥

मी म्हणतां अहंपण । अहंपणें वाढवी मान ॥
स्वरुपीं मानाभिमान । मिथ्यापण पैं दिसे ॥४१॥
जेथें सर्व मिथ्या झालें । विश्व अवघेंचि ग्रासिलें ॥
शेखीं उर्वरित राहिलें । तेंचि स्वरुप ॥४२॥
ब्रह्मांडाचा कुलस्तंभ । स्वरुपसुखाचा कोंभ ॥
जागृत होऊनि स्वयंभ । उभा ठाके ॥४३॥
त्याचा तो सहज स्वभाव । तेथें कायसी उठाठेव ॥
संकल्पविकल्पाचा गांव । वसविला तेणें ॥४४॥
संकल्पविकल्पाची वस्ती । हेचि बुद्धीची उपरती ॥
एवं तेथेंचि सुमती । विश्रांती पावे ॥४५॥
विश्रांतिसुखाचें स्थळ । तें शुद्ध सत्त्व केवळ ॥
वस्तुमात्र निर्मळ । देखणें लागे ॥४६॥
एक वस्तु एक देखणा । त्याची कायसी विवंचना ॥
आतां द्वैताची भावना । दिसों पाहे ॥४७॥
द्वैत नसतां कायसी मात । अद्वैत शास्त्र वदती संत ॥
तरी ययाची प्रचीत । पाहणें लागे ॥४८॥
वस्तु वस्तुत्वें सोज्वळ । देखणा करी प्रतिपाळ ॥
अद्यापि संशयाचा मळ । गेलाचि नाहीं ॥४९॥
संशय तो द्वैतदर्शन । यांत कायसा अनुमान ॥
अद्वैताचें विवरण । करावें काई ॥५०॥

अद्वैत वाक्यासी बोलावें । तेव्हां निः संदेह कैसें व्हावें ॥
आत्मनिष्ठेंचें करावे । कर्तृत्व काई ॥५१॥
आत्मनिष्ठ तो स्वानंद । यदर्थी स्वात्मसौख्यबोध ॥
तेनें निरसे अहंद्वंद्व । वस्तु संनिध सर्वस्वे ॥५२॥
आत्मा आत्मत्वीं मुसावे । तेणें आनंदा आनंद पावे ॥
मग निजवृत्तीचे ठेवे । आपेआप उमटती ॥५३॥
निजवृत्तीसी आकार कैचा । तैसा निराकार साचा ॥
जाणीव मात्र सर्वाचा । ऐक्यभावो ॥५४॥
जेथें जाणीव मुळींच नाहीं । तेथे शब्द बोलों कांहीं ॥
सदगुरुसत्तेचे प्रवाही । पडलों पाही यदर्थ ॥५५॥
सदगुरुसत्ता ज्ञानसिंधु । ओंकारमात्र कृतार्थ बोधु ॥
ओंकाराचा लागला छंदु । ओंकार बिंदु ते तुर्या ॥५६॥
ते तुर्या मातृजननी । अंबा रेणुका भवानी ॥
तियेचा वरदपुत्र होऊनी । सौख्यासनीं बैसलों ॥५७॥
सदगुरुपादुकेचें ध्यान । मातृकालयीं करी स्त्रान ॥
मूळ ओंकारदर्शन । त्रिगुणशून्य तत्साक्षी ॥५८॥
अपक्क अमृत फळ देखिलें । जें पक्कतेसी नाहीं आलें ॥
तें पक्क झालिया भलें । स्वादिष्ट बोलें बोलती ॥५९॥
एक तुर्या द्विधा झाली । उभयनेत्रीं प्रसवली ॥
एवढी जगाची माउली । त्रैलोक्य व्याली क्षणार्धे ॥६०॥

जेथें त्रैलोक्य व्यापिलें । तेथें आपपर कोठें उरलें ॥
आप आपणां उमजले । मग काय राहिले पैं ॥६१॥
समुद्रीं तोयबिंदु पडे । तो समुद्रचि होऊनि वाढे ॥
सीमा नुल्लंघुनी चढे । समद्र रुढे समुद्रीं ॥६२॥
हें ज्ञानाचें ज्ञानकांड । केवळ विवेकाचा पिंड ॥
संपूर्ण शोधोनि ब्रह्मांड । बिंदु प्रचंड दाविला ॥६३॥
बिंदुसी बिंदुत्व कैंचे । कौशल्य महामायेचें ॥
शुद्ध पीठ ईश्वराचें । परात्पर जें ॥६४॥
ईशत्व आपुलें स्वरुप । तुटला द्वैताचा विक्षेप ॥
परोपकारार्थ संक्षेप । बोलावाचि लागे ॥६५॥
परोपकार म्हणजे काय । पुन्हा द्वैताचा उपाय ॥
नाना प्रतिबिंबाची सोय । धरिली आम्ही ॥६६॥
प्रतिबिंब तोचि ईश्वर । आत्मसत्तेचें माहेर ॥
तरी तयासी उपचार । काय न करावा ॥६७॥
सर्वी सर्वत्र आपण । तेथे कायसें दुसरेंपण ॥
संसाररुपें कृपण । असिया झाला ॥६८॥
तरी काय संसार आहे । सर्व मिथ्या भास नोहे ॥
कतकरेणुका जळीं राहे । तैसा पाहे संसार ॥६९॥
हे तव जळाची शुद्धता । कतकरेणुकाची वार्ता ॥
प्रत्यक्ष भासताहे समता । तेथें कथा कायसी ॥७०॥

कथा तोचि सत्कीर्तन । स्वरुपस्थिति अनुष्ठान ॥
एवं अन्य प्रतिपादन । न सुचे कोणा ॥७१॥
न सुचे कोणाची बोलणें । अंतरिक्ष घातलें ठाणें ॥
जेथें मुमुक्षांची मनें । लागलीच होती ॥७२॥
मुमुक्षु निजभक्तीचें अंग । मानवरुपें घेतलें सोंग ।
परि हा अनादिसिद्ध योग । घडला आम्हां ॥७३॥
अनादिसिद्धाचें बोलणें । ते ऐकावें जीवेप्राणें ॥
शब्दमात्र विश्वास धरणें । आपुले हदयीं ॥७४॥
पूर्वी काय विश्वास नव्हता । आता सुचली हे वार्ता ॥
सज्जनाचिये मनोरथा । पूर्ण कीजे ॥७५॥
पूर्णता आत्मचिंतन । जेणें होय समाधान ॥
स्वरुपसुखाची खूण । बोलिजेल आता ॥७६॥
स्वरुपसुखाचा कल्लोळ । पाहतां गळे अंतर्मळ ॥
स्वयंज्योति निर्मळ । देखिजे डोळा ॥७७॥
जे आकाशाची गवसणी । मेरुमस्तकीं रत्नवाणी ॥
कीं विश्वाची विश्वजननी । व्यंजनरुपें ॥७८॥
व्यंजनमात्र स्वरुपभास । तोचि जाणिजे चिदाभास ॥
पाहि या सकळ प्रत्ययास । आणिजेल आता ॥७९॥
प्रत्यय प्रथमेचें कारण । द्वितीया शुद्धांश लक्षण ॥
तृतीया मनाचें मन । चतुर्थीरुप ॥८०॥

पंचमीं सकळ ऐक्यता । स्वरुपस्थिती सत्ता ॥
एवं चतुर्थीचे माथा । पाहणें बरवें ॥८१॥
चतुर्थी महाकारण । तोचि प्रत्यगात्मा जाण ॥
ईशत्वाची खूण । त्यालागी शोभे ॥८२॥
तो काय होये दुसरा । विकल्पबुद्धीचा आसरा ॥
साक्षित्वाचिये मंदिरा । देखणें घडे ॥८३॥
घडे तें न घडे सहज । न घडतां घडलें काज ॥
स्वधर्मी तो धर्मराज । देखिला दृष्टीं ॥८४॥
दृष्टीमाजि दृष्टि नाहीं । आपुला आपण सर्वा ठायीं ॥
अंतरात्मा मीच हदयीं । जगाचिया ॥८५॥
यासी जग कैसें म्हणावें । ब्रह्मरुप ओळखावे ॥
तरी साहित्य बोलावें । मुक्तवाचा ॥८६॥
तें तो वाचेहुनि निरुतें । आणि वेदांताहोनि परतें ॥
सहजासहज भासतें । तें स्वरुप ॥८७॥
सहजानंद पूर्ण बोध । विद्यावाद न करी द्वंद्व ॥
स्वरुप लक्षितां विनोद । होय अभेद सर्वथा ॥८८॥
अभेदाचा भेद झाला । जीव गर्भध्यानासी आला ॥
तेणें सर्वस्वें प्रकटला । अव्याकृती ॥८९॥
अव्याकृतीचें मृळ । गगनोदरीं लागले फळ ॥
तेथें अस्त उदय खेळ । वृथा झाला ॥९०॥

वृथा झालासा देखिला । पण दुसरा कोण आला ॥
विहंगममार्गे जो उडाला । तोचि पडला भूतळीं ॥९१॥
भूतळवटीं विहंगम । तेथे पिपीलिकेचें काम ॥
काममार्गे मीनधर्म । वाढवूं लागे ॥९२॥
पिपीलिका मीन विहंगम । कर्म उपासना ज्ञानोत्तम ॥
त्रिपथसाक्षित्वाचा नेम । कार्यत्रयासारिखा ॥९३॥
कार्यत्रय रहित जे का । त्याची वदती जे माळिका ॥
वस्तुमात्रें निजसखा । दाखवूं जातां ॥९४॥
आतां काय दाखवाल । देखणें तें तुम्हीच व्हाल ॥
सर्वी सर्वत्र धराल । ऐक्यता जेव्हां ॥९५॥
ऐक्यता नव्हे विभक्त । संप्रदाय वागवी मत ॥
सुखदुःखाचा घटितार्थ । वोढवे जेव्हां ॥९६॥
सुखदुःखवासी निराळा । सदैव भोगी उन्मनी कळा ॥
योगसुखाचा सोहळा । निर्मळ कळा सत्रावी ॥८७॥
त्या सत्रावीचें क्षीर । हा विरक्ताचाचि अधिकार ॥
घेतां मानवी पामर । पिशाच्च होती ॥९८॥
पिशाच्च होऊनि भागले । स्वहितासी मुकले ॥
वेडे वेडेचार केले । तेहि मिथ्या ॥९९॥
वेडे वेडेचार करणें । हीं अधर्माचीं लक्षणें ॥
कुष्टपिष्ट राहटणें । न धरी मार्ग ॥१००॥

मार्ग सांगतां होये कष्टी । पाहतां अनेक ग्रंथ कोटी ॥
स्वरुपानुभवाच्या गोष्टी । अगम्य त्याला ॥१०१॥
अगम्य म्हणतां गभ्य झालें । ज्ञानोत्कर्षे करोनि भुललें ॥
मग बडबडूं लागले । कांहीचे बाही ॥१०२॥
बडबड वृथा कां करावी । मौन मुद्राची धरावी ॥
सोऽहं शब्दाची जपावी । पवनमाळा ॥१०३॥
पवनमाळा सोऽहं शब्द । हा तव धादांत भेद ॥
सिद्ध होणीचा प्रसाद । पावला आम्हां ॥१०४॥
जेथे स्मरण आणि विस्मरण । नसे धारणा आणि ध्यान ॥
अथवा स्वरुपाची खूण । दृश्य जेथे ॥१०५॥
दृश्याशीच ठाव नाहीं । द्रष्टा करावा तो काई ॥
दर्शनाचेचि संदेहीं । कासिया पडावें ॥१०६॥
हे त्रिपुटी महामाळ । अदृश्य वस्तु ब्रह्मांड गोळ ॥
झणीं होईल विटाळ । आम्हांलागी ॥१०७॥
जरी भय असें धरावें । तरी निः संदेह कैसे व्हावें ॥
गुरुकार्यासी आचरावें । लागेल आम्हां ॥१०८॥
गुरु काय आम्हा वेगळा । सर्व प्रकारें जिव्हाळा ॥
होणार ते त्याची लीळा । तोचि जाणे ॥१०९॥
तोचि जाणे परी नेणें । नेणिवेशी साक्ष होणें ॥
हीं सिद्धाची लक्षणें । जाणती सिद्ध ॥११०॥

येर ते अवघे पामर । पामररुपे व्यवहार ॥
परी हा सकळ संसार । कर्ता तो मी ॥१११॥
संसार तो माझेंचि व्यसन । व्यसन नसतां कर्तेपण ॥
कर्ता तोचि भगवान् । भगवदरुपें ॥११२॥
भगवदरुप म्हणजे काय ॥ पुन्हा द्वैताचा उपाय ॥
उपाय न करितां अपाय । कासिया झाला ॥११३॥
अपायाची जे कल्पना । ज्याची त्यासी बद्धक जाणा ॥
बद्धमुक्ततेच्या खुणा । जाणती संत ॥११४॥
संत कोणासी म्हणावें । निवांत सकळ वैभवें ॥
अपूर्ण पूर्ण स्वभावें । उपाधिरहित ॥११५॥
उपाधिरहित जें कर्म । तोचि जाणिजे स्वधर्म ॥
स्वधर्माचें निजवर्म । जाणता तो मी ॥११६॥
स्वधर्म कासयासि व्हावा । परधर्म आचरावा ॥
तेथें ज्ञानाचा ओलावा । सहजीसहज ॥११७॥
सहजी सहज घडे । तें कल्पांतीहि न मोडे ॥
मोडून टाकटां जडे । मागुती पुन्हा ॥११८॥
पुन्हा मागुती संग्रह । करितां होये विग्रह ॥
विग्रहादिकांचा द्रोह । न करावा कीं ॥११९॥
द्रोह करितां विलक्षण । हें अपूर्णाचे भाषण ॥
पूर्णत्वाचें समाधान । बोलों आतां ॥१२०॥

बोलणें तेंचि अबोल । अबोल बोल तो सखोल ॥
सखोलाचे जी अमोल । झालें पाहिजे ॥१२१॥
अमोल मोल तो अनुभव । यया व्यतिरिक्त सर्व वाव ॥
ब्रह्मसुखाचा गौरव । ज्ञप्तिमात्रें ॥१२२॥
ज्ञप्तिमात्राचें जें सुख । त्यासी स्तविती ब्रह्मादिक ॥
वेदशास्त्रासी हरिख । वक्तृत्वाचा ॥१२३॥
जें जें वक्तृत्व बोलावें । ज्ञान अबाधित व्हावें ॥
एकनिष्ठेंने करावें । सदगुरुस्तवन ॥१२४॥
सदगुरुस्तवन परमशुद्ध । हाचि पूर्णत्वाचा बोध ॥
माझा मजलागीं आनंद । झाला स्वामी ॥१२५॥
आनंदाचाचि उद्गार । ज्ञानकांडाचा विचार ॥
बोल बोलतां मधुर । अमृतवाणी ॥१२६॥
अमृतश्राव श्रवणीं पडे । नेत्रद्वाराची कवाडें ॥
उघडोनि पैलीकडे । जाऊं आतां ॥१२७॥
जाणें काय दूर आहे । ध्यानमात्रें समीप लाहे ॥
स्वसंवेद्य वस्तू पाहे । आपुले दृष्टीं ॥१२८॥
आपुले दृष्टीचें देखणें । दृष्टीविरहित वर्तणें ॥
सालंकृत विराजमाने । तेचि वस्तू ॥१२९॥
वस्तुलाभचि सकळ । विस्तारिला प्रांजळ ॥
आनंदकंदाचें मूळ । मूळारंभीं ॥१३०॥

ताटस्थ ब्रह्म जाणिजे । पंचम मुद्रा ॥१३१॥
पंचममुद्रा अलक्ष्य । लक्ष्यातीत असोनि साक्ष ॥
ऐसा कैसा परमदक्ष । अपूर्व लीला ॥१३२॥
लीलाचरित्र देखणा । तेचि त्याची संभावना ॥
जेथें अन्यत्र कल्पना । न चले कांहीं ॥१३३॥
न चले शब्दाचें कारण । शुद्ध लक्षांश देखणें ॥
आपणासगट विस्मरण । स्मरणीं राहे ॥१३४॥
स्मरण चतुर्थ देहीं असे । पंचम तें कैवल्य भासे ॥
ज्याचे छंदे झाले पिसे । महायोगी ॥१३५॥
बाल उन्मत्त पिशाच्चवत । ज्यांना ध्यान सभराभरित ॥
देहीं असोनि देहातीत । प्रत्यगरुपें ॥१३६॥
प्रत्यग होऊनि तन्निष्ठ । कदाकाळीं नव्हती कष्ट ॥
ज्याची वासना धर्मिष्ठ । सर्वभूतीं ॥१३७॥
सर्व देहीं भावना एक । स्वप्नीहि न देखती लोक ॥
ऐसा विश्वास निष्टंक । ऐक्यत्वाचा ॥१३८॥
ऐक्यता जाणूनि स्वरुप । एक बाण एक चाप ॥
जैसा रामचंद्र दीप । भानववंशीं ॥१३९॥
भानववंशीं रामचंद्र । तरोनि गेला भवसमुद्र ॥
रावण लंकेचा नरेंद्र । सुखी केला ॥१४०॥

देवोनि निजसौख्य पदवी । कृतार्थ करुनी भक्ति लावी ॥
त्रैलोक्यामाजी गोसावी । तोचि एक ॥१४१॥
राम राम राम । दोचि अक्षरांचें काम ॥
हा रसनेचा निजधर्म । वदलों आतां ॥१४२॥
कृष्णस्वरुप डोळां पाहूं । पाहोनिया उगेचि राहूं ॥
साक्षित्वाचा नेम ठेवूं । नेमिला जैसा ॥१४३॥
जैसा तैसा तरी आठवा । आठवा वाचूनि भेटवा ॥
भेटवाल तरी साठवा । आपुले हदयीं ॥१४४॥
हदय अत्यंत कोमळ । अनन्यभावार्थे निर्मळ ॥
जेथें संशयाचा मळ । साहवेना ॥१४५॥
न साहवे संशय वार्ता । तेथें कायसी चातुर्यता ॥
दर्शनमात्रें दुर्लभता । सत्ता ऐसी ॥१४६॥
ऐसी सत्ता जया अंगीं । तोचि झाला महायोगी ॥
सोळा सहस्त्र स्त्रिया । भोगी निर्विकल्पें ॥१४७॥
भोग भोगोनि वेगळा । ब्रह्मचर्याचा पुतळा ॥
कर्मे करोनि होय भोळा । अकर्तेपणें ॥१४८॥
अकर्तेपण जेव्हां झालें । तेव्हां कर्तृत्व बुडाले ॥
कारण कार्य बुडालें । सहजवृत्ती ॥१४९॥
सहजवृत्तीचा कोंभ । वाढों लागला स्वयंभ ॥
अवकाशामाजीं स्तंभ । यदृच्छेचा ॥१५०॥

इच्छा न करितांच कांहीं । स्तंभ वाढला लवलाहीं ॥
विषमबुद्धी कदापि नाहीं । मनोधर्मे ॥१५१॥
मनोधर्मे गुरुचरण । आश्रय आमुचा नारायण ॥
नारायणासी बंधन । कवणे काजा ॥१५२॥
आतां होई बा मोकळा । इच्छेसारखी लाधली कळा ॥
अभिमान टाकोनि वेगळा । सौख्य भोगी ॥१५३॥
मागे कठिण योग केला । त्याचा अंगिकार सर्व झाला ॥
काय निमित्तास्तव भ्याला । हेंचि न कळे ॥१५४॥
संसार तोचि गृहचार । रमा झाली विरक्त फार ॥
मातृसेवेचा प्रकार । सांगोनि गेलों ॥१५५॥
ते काय बा चूक पडली । दिवस असतां रात्र झाली ॥
बुद्धि विषमत्त्व पावली । येणेंचि गुणें ॥१५‍६॥
बुद्धीची करोनी उपरती । धरी स्वदेहाची स्थिती ॥
संसार हा पुनरावृत्ती । भोगणें लागे ॥१५७॥
जरी न करी म्हणसी । वंध्यापुत्र व्याली जैसी ॥
ऐसें विचारुनी मानसीं । मुख्य काशी संनिध ॥१५८॥
संनिध असुनी तीर्थमाता । ते धिक्कारुनी सर्वथा ॥
अपत्याचिये मनोरथा । पुरविलेंची नाही ॥१५९॥
रंगनाथासारिखे बाळ । त्याचा मानिसी कां विटाळ ॥
हा तव कुबुद्धीचा मळ । टाकिलाची नाही ॥१६०॥

नारायणाचें स्वरुप । उलट अक्षरीं केशव जप ॥
उत्तम कुळीं कुलदीपक । प्रकटले कैसे ॥१६१॥
त्यांचे करिताचि पाळण । रमा पावे समाधान ॥
मातृहदयीं तीक्ष्ण बाण । उपडोनि सांडी ॥१६२॥
तेणें होईल परम सुख । आश्चर्य मानिती सकळ लोक ॥
जे जे उत्तम सांसारिक । पुण्यश्लोक मानिती ॥१६३॥
पुण्यश्लोक तेचि सधन । ज्यासी बाणली निजखूण ॥
तेंचि ज्ञानाचें साधन । निबंध न होईजे ॥१६४॥
ज्ञानकांडामाजि सहज । आठविलासी माझा मज ॥
गुरुवेगळी हे लाज । कवणासी आहे ॥१६५॥
लज्जा सांडुनी वेगळी । गुरुचरण पादुका कवळी ॥
मग चिंतेची काजळी । शुद्धता पावे ॥१६६॥
गुरु अवज्ञा करावी । तरी मुक्तता कैं व्हावी ॥
गुह्य गोष्टी विचारावी । सुशील विद्या ॥१६७॥
सुशील विद्या गुह्यवर्म । याचा नेमिला आहे नेम ॥
आता शापमोचन धर्म । सांगतों बरवा ॥१६८॥
त्रिपद गायत्री ब्राह्मणा । चतुष्पाद ओंकार जाणा ॥
प्रत्यगात्मा आणोनि ध्याना । शापमोचन पैं कीजे ॥१६९॥
शापमोचने मुक्तता । नाठवे तयासी बद्धता ॥
मग संसार ग्रहण चिंता । कासिया व्हावी ॥१७०॥

ग्रहण न करितां ग्रहण । नेत्रीं घालोनिया अंजन ॥
जैसें पायाळ दावीं धन । तैसे सज्जन बोलती ॥१७१॥
सज्जनाची स्फूर्ति ऐसी । बाधक नव्हेचि कवणासी ॥
परमार्थ वसिजे मानसीं । एकत्वासी साधक ॥१७२॥
साधक आणि सिद्ध पुरुष । एके स्थळीं रहिवास ॥
अपूर्ण पूर्णत्वाचा भास । निवेदीन आतां ॥१७३॥
पूर्ण तो अलिप्त स्वभावें । जैसें कमलपत्र बरवें ॥
जळीं असतां तोय न शिवे । पत्रालागीं ॥१७४॥
तेचि जीवनीं दर्दूर । वास करिती निरंतर ॥
रेंदा भक्षोनी बडिवार । बोलती शब्द ॥१७५॥
तैसें संसारबंधन । एक कळा भोगिती जाण ॥
सकळ कळांमाजी प्रवीण । वरद लक्षण साजिरा ॥१७६॥
ऐसा साजिरा सुयोगी । जो परमपदालागी भोगी ॥
त्रिविध तापाची धगधगी । ज्यासी वाऊगी स्पर्शेना ॥१७७॥
स्पर्श न होतां अलिप्त । योगमार्गे असोनि गुप्त ॥
गुप्त तेची प्रकट मात । श्रीगुरुसमर्थ म्हणोनी ॥१७८॥
सकळ घटांमाजि एक । पुरुष स्त्रिया नपूंसक ॥
मीच आहे परी प्रत्येक । वेगळा दिसे ॥१७९॥
एकही घट शून्य नाहीं । प्रकट घट तो माझा पाहीं ॥
माझी प्रचीत त्याचे ठायीं । जडली असे ॥१८०॥

अधरद्वार अमरवस्ती । संतसञ्जना सुखोत्पत्ती ॥
जेथें नसती त्रयमूर्ती । तेथें विश्रांति पावलों ॥१८१॥
पाहतां पाहतांचि जाण । विसरोनी गेलें मी तूं पण ॥
समुद्रामाजि वर्षेल घन । विभक्तपण तैं कैचें ॥१८२॥
समुद्री बिंदु निवडितां । न दिसे ईश्वराची सत्ता ॥
तेथें मानवाची वार्ता । कायसी सांगो ॥१८३॥
तरी आतां काय कीजे । आपे आपणासी देखिजे ॥
धुंडाळितां स्वयंभ साजे ॥ आपेआप ॥१८४॥
आपण असे तरी सांपडे । आपण पाहे आपणाकडे ॥
एवं स्वस्वरुपीं जडे । चैतन्यमुद्रा ॥१८५॥
कीं लवणाची पुतळी । समुद्रशोधनास्तव गेली ॥
जातांचि तदूप झाली । उदकप्राये ॥१८६॥
उदकप्राय झालें अंग । द्वैत निरसोनि अभंग ॥
तेथें स्तवनादिक योग । कायसा शोभे ॥१८७॥
माळा घेऊनी काष्ठाची । प्रतिमा मांडली दगडाची ॥
तीर्थे हिंडतां पृथ्वीची । जळ तें एक ॥१८८॥
स्मरण टाकिलें हरिचें । पाप निरसिलें जन्माचें ॥
आपुला आपण स्वयंभ नाचे । अपूर्व त्याचे वैभव ॥१८९॥
राजहंस चरण चाली । वृक्षीं वायसे बैसली ॥
काय साम्यतेसी पावली । उत्तम पक्षियाची ॥१९०॥

धरणीधराची साम्यता । इतर व्यालें करुं जातां ॥
सहस्त्रवदने भगवंता । आराधिले स्तुतिवादें ॥१९१॥
तुरंग श्यामकर्ण श्रेष्ठ । अश्व वागविताती भाट ॥
समर्थं क्षुल्लकासी संघट्ट । समतुल्यता कैसेनी ॥१९२॥
माहेश्वर भक्त पूर्ण । कीं स्मशानभूत सुप्रसन्न ॥
करोनि वागवी अभिमान । समान माहेश्वराचें ॥१९३॥
अमृतातुल्य तक्रपान । सुष्ट दुष्ट तत्समान ॥
औदार्य आणि कृपण । समानरुपें न होतीं ॥१९४॥
वज्रतुल्य खङ्गधारु । शासन पर्वतातें न शके करुं ॥
अंतकाळाचा आहारु । मशकातें नव्हेची ॥१९५॥
ब्रह्मादिस्तंबपर्यत । ऐक्यता होय निश्चित ॥
येर तें पाखांड मत । होय निश्चित सर्वस्वें ॥१९६॥
गृहीं टाकोनि मिष्टान्न । भिक्षा मागती तेंचि धन्य ॥
शिळा मृद्दारु पूजन । देवतार्चन विधीचें ॥१९७॥
हा तव ब्रह्मचर्य योग । अन्य करितात तें सोंग ॥
साग करुनी भोगिती भोग । होय वियोग सर्वथा ॥१९८॥
वियोगे नव्हे स्वरुपस्थिती । हेचि ब्राह्मणा निजवृत्ती ॥
सत्य, क्षमा, दया, शांती । योगयुक्ती परिसिजे ॥१९९॥
योगाभ्यासें विरक्त झाला । देव स्वदेहींच पाहिला ॥
सदगुरुप्रसाद लाधला । मुक्त केला निर्लज्ज ॥२००॥

एक लज्जा टाकितां दुरी । त्रैलोक्य चरणसेवा करी ॥
यातायातीचे अवसरीं । निरंतरी निजसौख्य ॥२०१॥
आतां असो चातुर्यता । स्वसौख्यबोध अपूर्व वार्ता ॥
जेणें लाहिजे निजस्वार्था । शुद्ध परमार्था ग्राहक ॥२०२॥
शुद्ध परमार्थ ग्रहण । करितां होय समाधान ॥
एवं सिद्धाचें लक्षण । तत्त्ववेत्ते जाणती ॥२०३॥
तत्त्ववेत्ता तो दुर्लभ । दर्शनमात्रें होय लाभ ॥
एकांशाचें मूळस्तंभ । अंतर्गर्म निवेदी ॥२०४॥
निवेदन करी सकळासी । प्रतीती दावी निजभक्तासी ॥
लक्ष लाविलें चिदाभासी । विश्व दृष्टीसी नातळे ॥२०५॥
विश्वीं विश्वंभरची भरला । आपणावेगळा कोण आला ॥
स्वसौख्यबोधें पूर्ण झाला । विलास केला स्वानंदे ॥२०६॥
धन्य धन्य तो स्वानंद । ब्रह्मनिष्ठ ब्रह्मानंद ॥
आत्मानंद हा प्रसिद्ध । होईल आतां ॥२०७॥
अद्वैतानंद सोहळा । विद्यानंद देखिला डोळा ॥
विषयानंद द्वारपाळा । इष्टत्व कीजे ॥२०८॥
हा तव प्रसादिक वरदी । कदापि नातळे उपाधि ॥
ब्रह्म साक्षात्कार निधि । उभा ठेला ॥२०९॥
स्वरुपस्थिति मोकळी । तिचें पोटीं जन्मली बाळी ॥
तुर्या नांवाची पुतळी । प्रसन्न मातें ॥२१०॥

सावध करोनि सत्वर । भाष्य वदविलें मनोहर ॥
तेणें जनासी उपकार । चमत्कार दाविला ॥२११॥
ज्ञानकांडाचें रहस्य । हेंचि वेदीं वेदभाष्य ॥
आणि सिद्धाचें भविष्य । येणोंचि शब्दे ॥२१२॥
शब्द मात्र विचारतां । ज्ञानासी नाही दुर्लभता ॥
जेणें मुक्ति सायुज्यता । परम शुद्धता पैं लाभे ॥२१३॥
कर्म उपासना ज्ञान । त्रिकांडीं वेदान्त पठण ॥
अलक्ष लक्षितां बंधन । निर्मुक्त व्हावें ॥२१४॥
निर्मुक्त होऊनी प्रसिद्ध । शब्द तोचि अनादिसिद्ध ॥
दत्तात्रयगुरुप्रसाद । उपदेश वरद लाधला ॥२१५॥
त्या प्रसादाचा महिमा । सकळ व्युत्पत्ति आली आम्हां ॥
अनंत शास्त्रें मनोरमा । ध्यानासी आली ॥२१६॥
अनंत वेद अनंत शास्त्रें । स्वतः बोललों मूळ सूत्रें ॥
ब्रह्मस्वरुप विश्ववक्त्रें । देखितां झालों ॥२१७॥
ब्रह्मस्वरुपीं जडली वृत्ती । अवघी प्रतिबिंबें भासती ॥
भासती परी ऐक्यस्थिती । स्वस्वरुपींच जाणा ॥२१८॥
स्वस्वरुपीं पूर्ण भाव । हेंचि कृपेचें वैभव ॥
शुद्ध कवित्व लाघव । ब्रह्मादि देव वंदिती ॥२१९॥
तरी ते काय कविता । त्यासी पाहिजे वित्पन्नता ॥
हे तव सदगुरुची सत्ता । वरद वार्ता बोलिलों ॥२२०॥

वरद वाक्याचा विश्वास । आतां पूर्णतेचा कळस ॥
श्रोते जनीं सावकाश । ग्रंथ ध्यानासी आणिजे ॥२२१॥
पांच शतक पंचदश ओवी । त्रिकांडाची बरवी ॥
जैसा प्रकाशकर्ता रवी । आकाशमार्गे ॥२२२॥
आकाशमार्गे चालणें । तेव्हांच भासती हीं चिन्हें ॥
शब्दविषयादि बोलणें । जेथीचें तेथें ॥२२३॥
शब्द विषय आकाशाचा । बोलतां बोलिलों त्रिवाचा ॥
आतां पंचम मठाचा । भावार्थ सांगों ॥२२४॥
पंचमाम्नाय सुभेरु मठ । काशी संप्रदाय जो श्रेष्ठ ॥
जनक याज्ञवल्क्या प्रकट । शुकवामदेवादि ॥२२५॥
हे तव महामुक्त प्राणी । सनकसनंदन नारदमुनी ॥
ब्रह्मनिष्ठ चातुर्य खाणी । संतोष वाणी सुशब्दे ॥२२६॥
क्षेत्र कैलास सनाथ । मानस सरोवर तीर्थ ॥
ऐसें स्थान श्रीसदगुरुनाथ । देवी माया जाणिजे ॥२२७॥
अनंत स्वरुपें ब्रह्मचारी । स स्वयं वेदपठण करी ॥
सत्य ज्ञान वाक्य विचारी । आत्मोद्धाराकारणें ॥२२८॥
पंचमाम्नाय समाप्त । वदता झालों प्रकट गुप्त ॥
विषमभाव धरी आप्त । सत्य सत्यार्थ हे वाचा ॥२२९॥
हा ग्रंथ करी पठन । त्यासी पूर्ण समाधान ॥
त्रिकांडीचें होय ज्ञान । चतुर्थ सदन पैं पावे ॥२३०॥

दास्य करिती त्रिकाळ । निपुत्रिकासी पुत्रफळ ॥
विष्णुपत्नी हे निश्वळ । सहवास वांछी जयाचा ॥२३१॥
विवाहकार्य ज्याचे पोटीं । तारुण्यमदें परमकष्टी ॥
सौंदर्य लावण्याची पेटी । शक्ति निकटी साधका ॥२३२॥
विद्या पाहिजे अपार । ग्रंथ वाचिजे मनोहर ॥
अर्गळेमाजि पडले नर । मुक्त सत्वर पैं होती ॥२३३॥
अधिकार इच्छा होय ज्याला । ग्रंथ श्रवणें प्राप्त त्याला ॥
महदरोगें जो पीडिला । रोग गेला तत्काळ ॥२३४॥
कर्तृत्वें करोनि गांजिलें । अंध कूपामाजि जे पडिले ॥
त्यांचे सर्व दोष गेले । मुक्त झाले तत्समयीं ॥२३५॥
ब्रह्मराक्षस पिशाच्चबाधा । द्वैतबुद्धीचे विरोधा ॥
अपहार द्रव्याचे संमंधा । पासोनि मुक्त पैं होती ॥२३६॥
राज्य भ्रष्ट झालें ज्याचें । पठन करोन ग्रंथाचे ॥
पुनः ऐश्वर्य तयाचें । रिपुकुळाचें भय हरे ॥२३७॥
शिष्य कुतर्के करोनी । गुरुसी निंदी अभिमानी ॥
आज्ञा भंगोनी दुर्व्यसनी । अधः पतनीं तो जाय ॥२३८॥
भ्रतार छलना करोनी । स्त्री होय व्यभिचारिणी ॥
स्नानसंध्या नाक धरोनी । शासन जनीं तियेतें ॥२३९॥
जे प्रेमळ विरक्त भक्त । त्यांचे पुरती मनोरथ ॥
धन्य धन्य जगविख्यात । गुरुसमर्थ तोषवी ॥२४०॥

जे जे कामना इच्छिजे । ते ते सदगुरुकृपा कीजे ॥
ज्ञान अबाधित होईजे । सिद्ध पुरुषासारिखे ॥२४१॥
वरद दत्तात्रेयाचा । कृष्णचैतन्य स्वामीचा ॥
बोध व्यंकटरमणाचा । रामचंद्राचा हस्तक ॥२४२॥
पूर्ण झाला करंजग्रामीं । विदर्भ देशामाजी स्वामी ॥
नरसिंव्हसरस्वती यति नामी । नारायणासी बोलिला ॥२४३॥
निरंजनाचा प्रताप । सिद्धि पावला संकल्प ॥
विकल्प कल्पनेचा जल्प । कदाकाळीं न व्हावा ॥२४४॥
आत्मसौख्य पूर्ण बोध । अबोल बोलणें प्रसिद्ध ॥
गुरुचरणासंनिध । कृष्णानंद बैसला ॥२४५॥
इति श्रीनरसिंव्हसरस्वतीस्वामीमहाराजकृते श्रीस्वात्मसौख्ये ग्रंथे ज्ञानकांडं संपूर्णमस्तु ॥
श्रीसदगुरुनरसिंव्हसरस्वतीस्वामीमहाराज चरणारविंदार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।