श्री गुरु पद्मनाभस्वामी महाराज
श्रीगुरु चरित्राच्या ४ थ्या अध्यायात ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिन्ही दत्तात्रेयरूपाने प्रकट झाले असा हा सर्व कथाभाग आला आहे. त्यामधील ब्रह्मदेव आणि शिव हे आपापल्या लोकाला गेले आणि विष्णु मात्र दत्तात्रेय-रूपाने अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिले. विष्णु हे दत्तात्रेयाच्या त्रयमूर्तिरूपातील असे मध्यवर्ती रूप आहे की जो कोणी दत्तात्रेयाचे दर्शन घेतो त्याला दत्तात्रेयाच्या विष्णुरूपाचे दर्शन होते. हा भगवान दत्तात्रेय विष्णु विठ्ठलरूपाने पंढरपूरी, ज्ञानेश्वररूपाने आळंदीला आणि नरसिंव्हसरस्वती रूपाने इंद्रायणी तीरावर आला. आळंदी हे सिद्धेश्वराचे क्षेत्र आहे आणि या शैव क्षेत्रामध्ये विष्णूची ही दोन रूपे श्री ज्ञानेश्वर आणि श्री नरसिंव्हसरस्वती योग समाधिस्थ रूपामध्ये विराजमान आहेत. ज्ञानदेवांनी जेव्हा संजीवन समाधि घेतली तेव्हा तिथे साक्षात् विठ्ठल-रुक्मिणी आले होते असे नामदेव महाराज म्हणतात आणि या ज्ञानदेवाला समाधि देऊन भगवान विठ्ठल आळंदीमध्ये विराजमान झाले. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधि मागे विठ्ठल रखुमाई मूर्ति आजही आहे आणि विठ्ठलाच्या साक्षीने ज्ञानदेव महाराज मच्छिन्द्रनाथाप्रमाणे अव्यय समाधि सुखात निवृत्तीनाथाकडून विराजमान झाले. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधिचे साक्षीदार साक्षात भगवंत श्री विठ्ठल-रुक्मिणी आहे आणि म्हणून श्री ज्ञानदेवांप्रमाणे योग समाधि घेण्याचा निर्णय श्री नरसिंव्हसरस्वती महाराजांनी घेतल्यानंतर आळंदीला गोपाळपुऱ्यात त्यांनी विठ्ठल मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि ज्ञानदेवांप्रमाणे विठ्ठलासमक्ष तिथे समाधिस्थ झाले. श्री ज्ञानेश्वर आणि श्री नरसिंव्हसरस्वती हे विष्णुरूपात आहेत आणि त्या विष्णुरूपाचे अखंड दर्शन भाविक भक्तांना व्हावे म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी या दोहोंच्याही समाधिस्थानापाशी येऊन तिष्ठत उभे राहिले आहेत. श्री ज्ञानदेवांचे आणि श्री नरसिंव्हसरस्वतींचे हे समाधिस्थ रूप योग्यांना दिव्यमार्ग दाखिवणारे, ज्ञानवंतांना वैभव सुखात रममाण करणारे आणि भक्तांच्या आनंदासाठी कल्लोळरूपाला तो मांगल्यमय अविष्कार आहे.
जेथे देव आहे तेथे भक्त आहे. देव भक्ताला सोडत नाही आणि भक्त देवावाचून राहू शकत नाही. पांडुरंगाच्या संकीर्तनात अहोरात्र रममाण असणारे श्री नामदेव महाराज पंढरपूरी श्री विठ्ठलाच्या पायरीरूपात कायम वास्तव्य करून आहेत. आळंदीला श्री हैबतीबुवां आरफळकर श्री ज्ञानदेव महाराजांच्या मंदिर पायरीवर वास करून आहेत. तर श्री अण्णासाहेब पटवर्धन श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांच्या समाधि मंदिरात, श्री नामदेव आणि श्री हैबतीबुवां प्रमाणेच, पायरीवर वास करून आपल्या आराध्य सद्गुरुच्या उपासनेत अखंड मग्न आहेत. श्री नामदेव, श्री हैबतीबुवा आणि श्री अण्णासाहेब पटवर्धन हे तीन भक्त विठ्ठल, ज्ञानेश्वर आणि नरसिंव्हसरस्वती हे तीन देव. या तीन देवांच्या समोर हे तीन भक्त ज्या पद्धतीने अहोरात्र आराधना/उपासनेत एकरूप झालेले दिसतात तशाप्रकारचे दर्शन भारतवर्षाच्या धर्मेतिहासातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात आपल्याला आढळत नाही. श्री नामदेव, श्री हैबतीबुवा आणि श्री अण्णासाहेब यांचे वास्तव्य हे कुठेही होऊ शकत होते पण ते पायरीरूपात आहेत याचा उलगडा सुद्धा स्वत: श्रीज्ञानदेवांनीच आपल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात केला आहे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात ॥देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हे तीनही भक्त चारही मुक्तिंचा आस्वाद घेत आहेत आणि चौथी जी सायुज्य मुक्ति आहे त्या रूपाने आपल्या उपास्य देवतेशी ते एकरूप आहेत. येथे देव भक्त झाला आणि भक्त हा देव झाला आणि म्हणून या तिघांनीही देवाला जे मागणे मागितले ते हे की तुझ्या दारात तुझ्या मंदिराच्या पायरीवर आम्हाला जागा दे आणि भगवंताने त्यांची ती मागणी पूर्ण केली. लौकिक दृष्टीने श्री अण्णासाहेबांचे सर्व आयुष्य पुण्यात गेले आणि त्यांच्या निर्याणानंतर त्यांचे समाधिस्थानही पुण्यात निर्माण झाले. परंतु हा लौकिकाचा भाग झाला. श्री अण्णासाहेबांचे वास्तव्य शनिवार पेठेत त्यांच्या वाड्यात असे. त्यावेळेस ते सर्व तऱ्हेचे लौकिक व्यवहार करीत असत. पण त्यांचे खरे मन रमत असे ते श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांमध्ये. श्री महाराजांची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांच्या जीवनाचा आनंदोत्सव सुरू झाला. श्री महाराजांनी त्यांना सर्व दिले. एवढेच नाही तर आपण कोण आहोत हेही सांगितले. श्री अण्णासाहेबांशी बोलता बोलता श्री महाराज म्हणाले होते की माझा जन्म कारंजाच्या काळे घराण्यात झाला. स्वत: श्री अण्णासाहेबांना वऱ्हाडात येण्याचा योग आला नव्हता पण त्यांना पक्के माहित होते, नव्हे त्यांची खात्री होती की श्री महाराजांचे अवतारस्थान वऱ्हाडातील कारंजा हे गांव आहे. ज्यावेळी श्री अण्णासाहेब हा विचार करीत होते त्यावेळी कारंजाची प्रसिद्धी फार वेगळी होती. ज्या स्थानावर श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज प्रकट झाले ते स्थान काळे घराण्याकडून घुडे घराण्याकडे आले होते. पण या वाड्यात दत्तात्रेयाचा अवतार झाला ही आठवण जवळ जवळ सर्व विसरले होते. लोक विसरले असले तरी अवताराच्या खाणाखुणा त्या स्थानावर विविधरूपाने कधी कधी प्रकट होत असत. आरतीचा नाद ऐकू येत, घंटेचा नाद ऐकू येत, शंखाचा नाद ऐकू येत असे प्रकार चालत. लोकांना त्यांचे कार्यही माहित नव्हते. लोक असे समजून चालले होते की हे स्थान असेलच तर भगवान विष्णुच्या नरसिंव्ह अवताराशी संबंधित असेल. पण हे स्थान श्री नरसिंव्हसरस्वती स्वामींच्या अवताराचे होते.
श्री अण्णासाहेबांकडे बरेचसे लोक येत. पुण्याला श्री लोकमान्य टिळकांची व्याख्याने चालू असल्यामुळे ती ऐकण्यासाठी श्री दादासाहेब खापर्डे आणि कारंजाची काही मंडळी पुण्याला येत असत. श्री टिळकांची व्याख्याने ऐकता ऐकता श्री अण्णासाहेबांच्या भेटीचा योग येत असे. अशीच एकदा भेट झाली असताना श्री अण्णासाहेबांनी सहजपणे त्यांची चौकशी केली की आपण कोठून आला आहात तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही वऱ्हाडातील कारंजा गांवाहून आलो आहोत. ते नांव ऐकताच श्री अण्णासाहेबांची वृत्ती प्रफुल्लित झाली व आनंदातिशयाने ते त्यांना म्हणाले, अहो हे आमचे श्रीगुरु महाराजांचे पूर्व अवतारातील स्थान. तिथे स्मारक आहे का हे कृपया मला सांगाल? आपल्या श्रीगुरु महाराजांचा अवतार ज्या स्थानी झाला ते स्थान मला खुद्द श्री नरसिंव्हसरस्वतीस्वामींनीच सांगितले आणि अण्णासाहेबांनी त्यांना भेटीला आलेल्या श्री दादासाहेब खापर्डे यांना बापुसाहेब घुडेंजवळ चौकशी करण्यास सांगितले. हा प्रसंग अतिशय बोलका आहे आणि इतिहासाचे मौन उलगडून दाखवणारा आहे. ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी श्रीगुरु महाराजांना समाधि घेऊन कांही वर्षे लोटली होती. पण श्री स्वामी महाराजांनी स्वयंमुखातून आपले जन्मगांव सांगितले ते कारंजा हे होते. श्री अण्णासाहेबांची अशी इच्छा होती की त्या स्थानावर काही स्मारक करावे, त्याच बरोबर श्रीगुरुचरित्राचे संशोधन करून श्रीगुरुचरित्राची पोथी समाजाला द्यावी. पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी नव्हत्या. ह्या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडून करवून घ्यायच्या होत्या त्यांची योजना भगवान श्री नरसिंव्हसरस्वती महाराजांनी करून ठेवलेली होती. पण एवढे मात्र खरे की श्री महाराजांनी श्री अण्णासाहेबांना सांगितलेली ही माहिती श्री अण्णासाहेबांनी प्राणापलीकडे जतन केलेली दिसते. आणि करंजग्रामी, विदर्भदेशी नारायणाला ॥ श्रीस्वात्मसौख्य ॥ रूपाने श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती यतिने केलेला उपदेश, हे सर्व लौकिक प्रसंग केवळ आळंदी आणि आळंदी परंपरेतील भक्तवर्गातच आढळतात.
इ.स. १८६० मध्ये श्री पद्मनाभ स्वामी उर्फ बुवासाहेब यांची श्री महाराजांची भेट झाली आणि तेव्हापासून श्री बुवासाहेब श्री महाराजांच्या परिवारात आले. श्री बुवासाहेबांचा जन्म इ.स. १८२७ साली झाला. श्री बुवामहाराज व श्री महाराज यांच्यातील प्रेमाला, वात्सल्याला उपमा नाही. बुवामहाराज हे माझे हृदय आहे असे श्री महाराज म्हणत आणि श्री बुवासाहेबांना जे श्री महाराजांनी सांगितले, जे जे योगाचे धडे दिले त्याची पूर्वपरंपरा आजही श्री बुवासाहेब आणि श्री महाराज सोडले तर कोणालाही माहिती नाही. मात्र श्री अण्णासाहेब पटवर्धनांना याची अंधुक कल्पना होती.
श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी हे श्री महाराजांच्या अतिजवळ असत. श्री महाराजांच्या अवतार कार्यात अनेक सत्पुरुष, संत महात्मे आणि योगी आलेले दिसून येतात. आळंदीला बारा वर्षांच्या वास्तव्यात तर श्री महाराजांनी परमार्थाचा बाजारच मांडला होता. तिथे कोणीही यावं आणि परमार्थाला लागणाऱ्या वस्तु घेऊन जाव्यात. पण श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी हे दोघेही श्री महाराजांच्या मंदिराचे द्वारपाल आहेत. कमी बोलणे, संयमित बोलणे, योग्य ते सांगणे, अखंड तप आणि योगात मग्न असणे हे त्यांचे आयुष्य होते. श्री पद्मनाभस्वामींना श्री महाराज आपले हृदय मानित. भगवान श्री विष्णुने आपल्या छातीवर लांछन धारण केले आहे पण श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती अवताराचे हे वैशिष्ट्य आहे की या अवताराने आपल्या भक्तालाच हृदय केले आहे आणि सांगितले की नारायण हे माझे हृदय आहे. श्री पद्मनाभस्वामींचे वास्तव्य धुळ्याला असे. तेथे त्यांचे समाधि मंदिर आहे. धुळ्याला श्री महाराज तीन-चार वेळा आलेले आहेत. श्री अण्णासाहेब पटवर्धनही नित्यनियमाने धुळ्याला येत असत. श्री महाराज, श्री पद्मनाभस्वामी आणि श्री अण्णासाहेब असा हा क्रम आहे. श्री महाराजांच्या समाधि महोत्सवात आणि श्री पद्मनाभस्वामींच्या समाधि महोत्सवात प्रसाद घेण्यासाठी श्री अण्णासाहेब आळंदीप्रमाणे धुळ्याला येत. त्यांची अशी दृढ धारणा होती की धुळे हे मोठी शक्तिकेंद्र आहे आणि भविष्यात ते प्रकट होणार आहे. श्री पद्मनाभस्वामींच्या रूपाने श्री नरसिंव्हसरस्वती- स्वामी महाराजांनी जी लीला केली ती साधीसुधी नव्हती. आपण कोण आहोत, आपले स्वरूप कोणते, आपल्या अवताराचे प्रयोजन काय हे श्री महाराजांनी श्री बुवासाहेब आणि श्री अण्णासाहेब या दोघांनाही सांगितले होते. श्री महाराजांविषयी हे दोघेही जण निश्चित आणि ठाम होते. त्यांची आराधना आणि उपासना प्रारब्धाने दिलेल्या फरकाने जेवढी दिली तेवढी होतच असे परंतु पुढच्या पिढीसाठी श्री महाराजांच्या अवतार कार्याचा परिचय आणि ओळख करून देण्याची दक्षता या दोघांनीही आयुष्यभर घेतलेली दिसते. आळंदी आणि धुळेही दोन केंद्रे यादृष्टीने लक्षणीय आहेत. या दोन्ही ठिकाणी गुरुशिष्य ॥आपल्याला आपण दाखवुनी खुणा॥ अशा रूपाने अखंड क्रीडा करीत आहेत.
श्री अण्णासाहेब, श्री बुवासाहेब आणि श्री महाराज यांच्या लौकिक नात्याचा इतिहास आळंदी आणि धुळ्याचा मठ आपल्याला सांगत आहे. श्री महाराजांनी श्री अण्णासाहेबांना लहानाचे मोठे केले. बोट धरून त्यांना मार्ग दाखिवला. योगाचे धडे दिले, तपस्येचे स्वरूप सांगितले आणि सांगता सांगता श्री महाराजांनी अदभूत लीला केली. तशी ती लीला थोड्याफार प्रमाणात परंपरेतील काही निवडक लोकांना अवगत आहे. श्री महाराजांनी श्री पद्मनाभस्वामींना सांगितले की तू नारायण आहेस आणि मी जे तुला सांगतो त्यामध्ये फक्त तू आणि तूच एकमेव असा आहेस की त्यात काही नवीन माहिती सादर करू शकतोस. ५१५ ओव्यांतून आणि तीन कांडांतून संपूर्ण ॥श्रीस्वात्मसौख्य॥ श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांनी नारायणाला सांगितले. ते करंजग्रामी सांगितले. केव्हा सांगितल आणि कधी सांगितले हा इतिहास काळाने आपल्या पोटात लपवून ठेवला आहे. पण एवढे खरे की श्री नरसिंव्हसरस्वती यतिंनी नारायणाला तो सांगितला आणि तो सांगत असताना हे सर्व मला दत्तात्रेयाकडून प्राप्त झाले आहे. मी पंचमाम्नाय सुमेरू मठाचा, श्री शंकराच्या स्वानंद वंशातील आहे. अंबा रेणुका ही माझी आई आहे. असा एक एक पदर आपल्या अवतार कार्याचा ते बोलू लागले आणि बोलता बोलता नाराणाच्या लक्षात आले की श्री नरसिंव्हसरस्वती यति हा ज्ञान देणारा दक्षीणामूर्ति गुरु साक्षात् दत्तात्रेय आहे. मात्र या दत्तात्रेयाच्या पायापाशी नारायणाने एवढेच मागणे मागितले की आपल्याला दत्तात्रेयाच्या पायापाशी अखंड वास लाभो. श्री अण्णासाहेब, श्री हैबतीबुवा आणि श्री नामदेव हे पायरीवर विसावले तर श्री पद्मनाभस्वामी उर्फ बुवासाहेब हे दत्तात्रेयाच्या पायाशी स्थिर झाले. याची उत्त्म खुण धुळ्याला त्यांच्या समाधि मागे उभा राहून नाराणाला आपल्या कवेत घेणारा दत्तात्रेय आजही दिसतो व भक्तांना सुखावतो.
धुळ्याचे श्री पद्मनाभस्वामी नारायण होते आणि हा नारायण पुन्हा पुन्हा या पृथ्वीवर येत असतो आणि जेव्हा केव्हा येत असतो तेव्हा त्याची श्री स्वामींशी हटकून भेट होत असते. ही एकच बाब लौकिक आणि इहलोकांपुरती मयर्दित नसून भगवंताने जशा आपल्या अनंतविध विभुती उघडून सांगितल्या त्याप्रमाणे या विभुती होत्या. श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी हे श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी अवताराच्या विभुती आहेत. श्री नरसिंव्हसरस्वती महाराज हे सागर आहेत. श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी त्या सागरावरील लाटा आहेत. श्री नरसिंव्हसरस्वती हा सूर्य आहे. श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी हे त्याची प्रकाशमान किरणे आहेत. श्री नरिसंव्हसरस्वती हे सोने आहेत. श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी हे त्या सोन्याला दिलेले नामरूपात्मक अलंकार आहेत. नावाने आणि रूपाने, स्थानाने आणि काळाने वरवर भिन्न दिसणारे हे दोघेही एकच एक आहेत आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात तप करणारे महान तपस्वी आहेत. श्री अण्णासाहेब आणि श्री पद्मनाभस्वामी यांचे तप हे स्वयंभू दत्तात्रेय अवताराचे मंगल आणि पवित्र असे रूप आहे.