श्री अण्णासाहेब पटवर्धनांची आरती व स्तोत्रे
॥श्री॥ जयदेवा योगेश्वरा । विनायका गुरुवरा ॥
आरती ओवाळीतो । प्रेमाच्या माहेरा ॥धृ॰॥
लोपला वेदमार्ग । लया ब्राह्मण्य गेलें ॥
सोडुनी स्वाभिमान । परबुद्धि झाले जन ॥१॥
हीन दीन दशा आली । दुजी आशाच नुरली ॥
देवाच्या कृपेंवीण । दैवहीनां नुमजें तें ॥२॥
जाणुनी पुण्यग्रामीं । महाराष्ट्र पुण्यभूमी ॥
ब्राह्मण्य मूर्तिमंत । दावियेलें आचरोनी ॥३॥
गायत्रीमंत्रराज । व्यक्त दाखवीलें बीज ॥
जीव हा विश्वकाय । स्वयं ब्रह्मचि केवळ ॥४॥
परमात्मा गुरुमूर्ति । नरसिंहसरस्वती ॥
सच्छिष्य रहाटीनें । प्रार्थिलें जन्मवरीं ॥५॥
सकळां अंतर्यामीं । पूर्ण प्रगट व्हावें ॥
हीनती सर्व जावीं । इहपर मुक्तीसी द्यावें ॥६॥