श्री अण्णासाहेब पटवर्धन
आळंदी देवस्थानातर्फे ॥श्रीस्वात्मसौख्य॥ हा ग्रंथ भाष्यासह श्री अप्रबुद्धांनी प्रसिद्ध केला. यावेळी श्री बुवामहाराज (श्री गोडबोलेबुवा महाराज) हे प्रमुख मठाधीश होते. श्री बुवामहाराज आणि अप्रबुद्ध हे दोघेही श्री अण्णासाहेबांच्या तालिमित लहानाचे मोठे झाले, साधना मार्गावर चालू लागले आणि अण्णासाहेबांनी दाखवून दिलेल्या पद्धतीनुसार त्यांनी श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांची जन्मभर उपासना केली. या उपासनेचे प्रमुख अंग अथर्वशीर्ष असे. अथर्वशीर्षाचे किती तरी पाठ त्यांनी केले असे म्हणण्यापेक्षा अथर्वशीर्षाने कोणतेही कार्य, कोणताही संकल्प हे दोघेही करीत. कारण अथर्वशीर्षहे गणेश उपनिषद आहे आणि वेदांमध्ये त्याचे गायन ऋषिमुनींनी प्राचीन काळापासून केलेले आहे.
या सर्व ऋषिमुनींनी या ब्रह्मणस्पती सूक्ताचा जो वैदिक घोष युगानुयुगे केला त्याचे एक रम्यरूप श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज आणि श्री अण्णासाहेब यांच्या रूपाने कलियुगात प्रकट झाले. या ब्रह्मणस्पती सूक्ताचा मूर्तिमंत अविष्कार आणि गणेशाची साधना ही श्री अण्णासाहेबांनी अखंडपणे केली.
श्री अण्णासाहेबांचे घराणे पटवर्धनांचे. पटवर्धन हे परम गणेशभक्त होते आणि हीच गणेश उपासना श्री अण्णासाहेबांचे वडील आणि मातोश्री यांना लाभली होती. त्यांची आई या गणेशाच्या सेवेत अखंड असे आणि योग साधना करीत. त्यांचे वडील हे श्रीमंत जहागीरदार होते आणि पालखीतून जात असताना त्यांना तळ्याच्या गणपतीपाशी गणेशाची प्राप्ती झाली. त्यांचे वडील आणि श्री अण्णासाहेब यांनी गणेशाची समंत्रक उपासना अखंडपणे चालू ठेवली.
श्री अप्रबुद्धांनी तर असे नमूद करून ठेवले आहे की श्री अण्णासाहेबांच्या घरी तर गणेश हा वेगवेगळ्या रूपाने येत असे व तसा तो आलेलाही आहे. अशीच एक तंत्र उपासनेतील पण चीन-मंगोलियाशी संबंधित असलेली एक गणेशमूर्ति त्यांच्या वडिलांना प्राप्त झाली असताना आळंदीचे महाराज (श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज) अकस्मात आले आणि त्यांनी सांगितले की ती मूर्ति अंगणामध्ये तुळशीवृंदावनात स्थापन करा, देवघरात ठेवू नका. त्याप्रमाणे ती मूर्ति आजही श्री अण्णासाहेबांच्या घरी तुळशीवृंदावनात आहे. श्री महाराजांनी सांगितले व श्री अण्णासाहेबांनी केले असे हे व्रत श्री अण्णासाहेबांनी अखंडपणे चालू ठेवले होते.
गणेशाची उपासना आणि अथर्वशीर्षाचा पाठ हा ब्रह्मविद्येचा प्रारंभ आहे. गणेश पाठाने ब्रह्मविद्येला प्रारंभ होतो पण तो पाठ कधीही संपत नाही. त्याला शेवट नाही त्याला अंतही नाही. फारफार तर त्याला विसर्जन आहे. घराण्याने दिलेली आईवडिलांनी जोपासलेली व श्री अण्णासाहेबांनी श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे उद्घोषित केली. ही समंत्रक उपासना आणि गणेश हा त्यांच्या जीवनाचा अखंड सोबती होता.
गणेश हा दातार आहे, तो मंगलमूर्ति आहे, सर्व विघ्ने हरण करणारा आहे म्हणून गणेशाचे स्तवन, गणेशाचे पठण, गणेशाच्या गुणांचे गायन, गणेशाला वंदन ही तर श्री अण्णासाहेबांची तपस्या आहे आणि या तपस्येचे मूर्तिमंत रूप श्री गजाननाने विग्रहरूप धारण करून श्री अण्णासाहेबांच्या ओंकारेश्र्वरी समाधिपाशी आपल्याला आजही आढळते.
श्री अण्णासाहेब पटवर्धन हे गाणपत्य होते व आहेत, ज्ञानदातार व ज्ञान उद्धारक आहेत आणि ब्रह्मणस्पती सूक्ताचे अहोरात्र समंत्रक उच्चार करणारे व पठण करणारे असे वैदिक ऋषि आहेत. या गाणपत्याने जो गणेशयाग मांडला त्या यागाच्या काठावर गणेश प्रकट झाला आणि त्याच्या पायाशी श्री अण्णासाहेब श्रीगुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने विसावले.