श्री महाराजांचे भ्रमण

“श्रीगुरु चरित्र” आणि “आळंदीचे स्वामी” ह्या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराजांनी ज्या ज्या गावांना आपल्या चरणस्पर्शांनी व आपल्या कार्याने पूनित केले त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ते पवित्र स्थान पहावे व त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करावा असे श्री सद्गुरूंच्या इच्छेने मनात आले. त्याप्रमाणे आज सकाळी आम्ही श्रींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र कारंजा, जिल्हा वाशिम या पवित्र स्थानापासून श्रींच्या आशीर्वादाने सुरूवात केली.

श्रींचा जन्म ज्या वाड्यात झाला तो वाडा आता श्री घुडे ह्यांच्या मालकीचा आहे. त्यांचे वंशज श्री प्रकाश घुडे ह्या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्याजवळ श्रींच्या जन्मस्थानाचा कसा शोध लागला याचे सविस्तर वर्णन असलेली टंकलिखीत मूळ कागदपत्रे आहेत. मुख्य बाब म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या वेळच्या घुडे वंशातील कुटुंबप्रमुखाची त्या कागदपत्रांवर मोडीलिपीत सही आहे.

त्याच वाड्यातील पहिल्या मजल्यावर श्रींचे जन्मस्थान आहे. या जन्मस्थानाला लागूनच “नरहरीची भिंत” आहे. ह्या वास्तूची छायाचित्रे सोबत दिली आहेत.

कारंजा गावाच्या पुरातन चार वेशी आहेत. त्या वेशी दारव्हा वेस, मंगरूळ वेस, पोहा वेस आणि दिल्ली वेस नावांनी ओळखल्या जातात. श्रींची मौंज झाल्यावर ते दोन वर्षांनंतर दिल्ली वेशीतून काशीला गेले. कारंजाच्या गावाबाहेर ऋषी तलावाच्या तीरावर पुरातन महादेवाच्या मंदिर आहे. श्री महाराज काशीहून तीस वर्षांनंतर परत आल्यावर पहिल्यांदा ह्या मंदिरात आले. फार पूर्वीपासून अशी परंपरा होती की कुटुंबातील एखादा पुरुष बऱ्याच वर्षांनी आपल्या घरी परत येत असे तेव्हा तो प्रथमत: गावाबाहेरील महादेव मंदिरात येत असे व तिथे तो आपल्या कुटुंबियांना भेटत असे. परंतु ही पहिली भेट परातीत तेल ओतून त्याच्यात त्या पुरुषाची प्रतिबिंबाद्वारे पहिल्यांदा होत असे. त्याच पद्धतीने श्रींनीही ह्या गांवाबाहेरील एकमेव महादेव मंदिरात येऊन आपल्या मातापित्यांना भेट घेतली असावी.

no images were found

श्रींनी गाविलगड किल्ल्यातून आपली स्वत:सह दादा दांडेकरांसह एका तिसऱ्या इसमाची सुटका करून घेतल्यानंतर ते तिघे दोन घोड्यांनी परतवाडा मार्गे अमरावतीमधील कुंभारवाड्याच्या दत्त मंदिरात उतरले. हे दत्त मंदिर पुरातन असून येथील दत्त मूर्ति अतिशय सुंदर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे गाभाऱ्यासमोर नंदी हे वाहन आहे. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे दुसऱ्यांदा काम सुरू आहे. श्री आपल्या भ्रमण काळात लोणारला जाताना वाशिम जिल्ह्यातील रिसोड ह्या गावाबाहेरील पुरातन महादेव मंदिरात वास्तव्यास होते. हे मंदिर काळ्या पाषाणातील असून अतिशय सुंदर आहे. वरील दोन्ही स्थानांची छायाचित्रे सोबत जोडलेली आहे.

no images were found

लोणी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे सिद्ध पुरुष श्री सखाराम महाराजांचे काळ्या पाषाणातील अतिशय सुंदर समाधि मंदिर आहे. श्री सखाराम महाराजांनी आपल्या वयाच्या ९२ व्या वर्षी लोणारचे सच्चिदाश्रम स्वामींकडून सन्यासदीक्षा घेतली. श्री सच्चिदाश्रम स्वामींना श्रींनी योगाभ्यास शिकवला. त्यासाठी श्रींनी लोणारला जवळपास एक वर्षपर्यंत वास्तव्य केले होते. लोणीच्या श्री सखाराम महाराजांच्या वंशातील (जोशी) लोकांची अशी मान्यता आहे की श्रींची आणि श्री सखाराम महाराजांची ओळख असावी आणि त्यांच्यात निश्चितच भेटी होत असाव्यात, त्यातच ते लोणी क्षेत्रीही येऊन गेले असावेत असा त्यांना विश्वास वाटतो. येथील छायाचित्रे सोबत दिलेली आहेत.

no images were found

लोणार:- श्रींनी लोणार येथे एक वर्ष राहून ज्या श्री सच्चिदाश्रम स्वामींना योगाभ्यास शिकवला त्यांची समाधि येथे आहे. श्री सच्चिदाश्रम स्वामींनी योगानुभूतीचा “अंतरानुभव” हा छोटेखानी ग्रंथ याच ठिकाणी लिहिला आहे.

वेणी:- लोणारपासून १५-१६ कि.मी. अंतरावर वेणी हे छोटंसं गांव आहे. ह्या ठिकाणचे श्री वामन अप्पा किंबहुने हे श्री सच्चिदाश्रम स्वामींचे शिष्य होते. त्यांच्या घरी आमंत्रणावरून श्री व श्री सच्चिदाश्रम स्वामी भोजनास गेले होते. ती जागा आता श्री वामन अप्पा किंबहुने ह्यांचे नातु श्री प्रल्हाद महाराजांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री व श्री सच्चिदाश्रम स्वामी किंबहुने यांच्याकडे भोजनास जाण्यापूर्वी गावाबाहेरील पुरातन महादेव मंदिरात थोड्यावेळाकरता थांबले होते. उपरोक्त दोन्ही स्थानांची काही छायाचित्रे सोबत दिली आहेत.

no images were found

मलकापूर येथे श्रींनी श्री रानडे यांच्या वाड्यात मुक्काम केला होता त्या काळांत त्यांनी श्री रानडे यांना ह्याच वाड्यात आपल्या पादुका दिल्या होत्या. त्या पादुका आता नागपूरचे धंतोलीस्थित श्रीमती रानडे ह्यांच्याकडे असून त्या नित्य पुजेत आहेत. रानडेंचा वाडा आता श्री पाटील यांच्या मालकीचा आहे. संबंधित छायाचित्रे सोबत दिलेली आहेत.

no images were found

तरसोद:- भुसावळ जवळील नशीराबाद गांवाजवळ तरसोद हे गांव आहे. ह्या गावाच्या वेशीवर एक सुंदर प्राचीन गणेश मंदिर आहे. त्या ठिकाणी श्रीसद्गुरु नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज हे स्वत: त्यांच्या भ्रमण काळांत येत असत ह्याचा स्पष्ट लेखी उल्लेख येथे केलेला आहे.

जळगांव:- जळगांवच्या जुन्या श्रीराम मंदिराचे पहिले महाराज श्रीसंत अप्पा महाराज यांचे गुरू श्री महाराज होते. तसा स्पष्ट लेखी उल्लेख येथे आहे. विशेष बाब म्हणजे ह्या मंदिराकडून आळंदीच्या उत्सवासाठी रथ देण्यात आलेला आहे. ह्या मंदिरात श्रींचे मोठे छायाचित्र आहे. संबंधित स्थानांची छायाचित्र सोबत जोडलेली आहेत.

no images were found

उत्राण:- उत्राण येथील श्री विठ्ठलाच्या पुरातन मंदिरात श्रींचा मुक्काम होता. मंदिराच्या विश्वस्तांनीही याबद्दल उल्लेख केला आहे. या स्थानाचे छायाचित्र सोबत दिली आहेत

no images were found

बेटावद:- येथील श्री देशमुख ह्यांच्या घरी श्री दिवाकर केशव सोनार हे श्रींच्या सेवेसाठी राहात असून त्या ठिकाणी श्रींच्या चरणांचे ठसे घेऊन संगमरवरी दगडावर पादुका तयार केलेल्या असून त्या श्री सोनार ह्यांच्या नित्य पूजनात आहेत.

शिरपूर:- शिरपूर येथे जुन्या श्री श्रीराम मंदिरातील एका खोलीत मुक्काम करीत असत. ह्या जागेत आयुष्य-वर्धनासाठी श्रींनी एकदा पोटातील आपल्या आतड्या बाहेर करून स्वच्छ करण्याची योगिक क्रिया केली होती. शिरपूरच्या भक्तांनी श्रींनी येथून जाऊ नये म्हणून श्रींना याच खोलीत कोंडले होते. ह्याबाबत आळंदीचे स्वामी मध्ये सविस्तर उल्लेख आलेला आहेच. हे मंदिर श्रीभक्त भोंगे परिवाराचे असून ह्या मंदिराला आषाढी एकादशीला दिंडीची प्रथा घालून दिली. तसेच भागवतावर प्रवचन करण्याची देणगी दिली. त्याप्रमाणे भोंगे परिवार वंशपरंपरेने भागवतावर प्रवचन करीत असतात. ह्या मंदिरात महाराजांची पुण्यतिथी मोठ्याप्रमाणावर व मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते व त्यानिमित्ताने अन्नदानही केले जाते.

शिरपूर येथे श्री जोशी यांच्या घराण्यातील श्री गणेश बळवंत जोशी (श्री दादामहाराज जोशी) यांना श्रींनी अनुग्रह दिला व त्यांचा स्वत:चा चांदीचा टाकही किमान १५० वर्षांपूर्वी दिलेला असून तो त्यांच्या नित्य पूजनात आहे. येथे श्रींच्या फोटोचेही नित्य पूजन केले जाते. जोशी घराण्यात नेमाने गुरुपौर्णिमा व श्रींचा पुण्यतिथी उत्सव करण्यात येतो.

शिरपूर मुक्कमी श्री येथील श्री बाळकृष्ण पंडित ह्यांच्याकडे नेहमी येत व घरातील खांबाला टेकून बसत. त्या खांबाची पूजा करण्यास श्रींनी श्री पंडितांना सांगितले होते. हे घर आता श्री स्वर्गे ह्यांच्या मालकीचे असून ते देखील अत्यंत भाविक असून त्या खांबाची नित्य पूजा करतात.

शिरपूर येथे जे श्री गाडगीळांचे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी कचरा पडलेला असायचा. त्या ठिकाणी श्रींनी श्री गाडगीळांना दत्त मंदिर बांधण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ते बांधल्याही गेले. श्रींचे छायाचित्रही ह्या मंदिरात दर्शनी भागात लावले आहे.

थाळनेर:- शिरपूरपासून १२-१५ किलोमीटर अंतरावर थाळनेर गांव आहे. गांव पुरातन असून त्या ठिकाणी श्री भावे परिवाराचे एक जुने गणेश मंदिर आहे. सध्या श्री मोरेश्वर भावे हे मंदिराची संपूर्ण व्यवस्था पाहतात. श्री मोरेश्वर भावे यांचे पणजोबा – श्री महिपती भावे यांना श्रींनी तापी नदीकाठी अनुग्रह दिली व त्यानंतर लगेचच श्री अदृश्य झाले. त्या प्रसंगानंतर गणेश मंदिर बरेच भरभराटीस आले. ह्या मंदिरात दर्शनी भागातच श्रींचे छायाचित्र आहे.

no images were found

धुळे:- खानदेशातील आपल्या भ्रमण काळांत महाराजांचा बऱ्याच लोकांशी संबंध आला त्यातील एक भक्त श्री भाऊसाहेब गणपुले. त्यांचे पूर्ण नाव श्री बाळाजी वामन गणपुले. ते श्री पद्मनाभस्वामींचे गुरुबंधु होते. “श्री आळंदीचे स्वामी” या चरित्रात प्रभावळ ह्या प्रकरणात उल्लेख आहे. धुळ्यात त्यांचे दत्त मंदिर आहे. ह्या दत्त मंदिरात श्री पद्मनाभस्वामी काही काळ पुजारी राहिले होते.

धुळ्यात श्रीमती वेणुबाई पुरंदरे ह्यांच्या मालकीचे श्रीराम मंदिर आहे. ह्या मंदिरात श्री पद्मनाभस्वामी ३६ वर्षे राहून श्रीरामाचे पुजारी होते. ह्याच मंदिरात श्री पद्मनाभस्वामींना श्रींकडून अनुग्रह मिळाला व तेव्हापासून ते दत्तोपासना करू लागले. ह्याच मंदिरातील वास्तव्यात श्रींनी स्वामींच्या योगाभ्यासाची घडी बरोबर बसवून देऊन त्यांचे शरीर प्रकृतिस्थ केले.

no images were found

धुळे:- धुळ्यात नारायण नांवाचे एक ब्रह्मचारी, ज्यांचे सन्यासाश्रमातील नांव योगानंदस्वामी असे होते. त्यांनी एक राम मंदिर बांधण्यास सुरूवात केली होती. श्रींनी त्यांना श्री पद्मनाभस्वामी उर्फ श्री नारायणबुवा यांना नवीन मंदिरात राहण्यास जागा देण्यास दोनदा सांगितले होते पण त्यांनी श्रींना त्याबाबत दोन्ही वेळेस दाद दिली नाही. त्यावेळी श्रींनी त्यांना “तुम्हीच बुवासाहेबांच्या जागेत राहावयास जा” असे सांगितले. कालांतराने श्री योगानंदस्वामी सन १९०६ मध्ये समाधिस्थ झाले परंतु त्यांच्या समाधिकरिता कोठे जागाच मिळेना. शेवटी श्री बुवासाहेबांच्या समाधि मंदिराच्या आवारातच त्यांना जागा दिली व त्यांची समाधिही बांधली गेली.

श्री ज्यांना आपले हृदय मानत त्या सद्गुरु श्री पद्मनाभस्वामी महाराजांचे समाधि मंदिर धुळ्याला आहे हे सर्वश्रुत आहेच. ही जागा श्रींनी आधीच सुनियोजित केली होती. ह्याबाबत त्यांनी ब्रह्मर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांना समाधि मंदिराच्या आवारात असलेल्या परसबागेतील औदुंबर वृक्षाखालील पारावर बसले असताना सांगितले होते. श्री पद्मनाभस्वामी समाधिस्थ झाल्यावर याच जागेवर श्री अण्णासाहेबांनी स्वत:च्या देखरेखीखाली श्री बुवासाहेबांचे समाधि मंदिर बांधले व धुळ्याचे हवामान लक्षात घेऊन त्यांनी लाकडी मंदिराची बांधणी केली.

श्रींनी श्री पद्मनाभस्वामींना पादुका, श्रीगुरुचरित्राची शीळाप्रत आणि छाटी प्रसाद म्हणून दिली होती. प्रसादरूपाने छाटी मिळाल्याने बुवासाहेब ती नित्य वापरीत होते. आपण जे श्री बोवासाहेबांचे छायाचित्र पाहतो त्यात ती प्रसादरूप छाटी आपल्याला दिसते. श्रींच्या पादुका आणि श्रीगुरुचरित्राची शीळाप्रत आजही समाधि मंदिरात नित्य पूजनात आहेत.

no images were found

शिरपूर :- खानदेशात भ्रमण करताना श्री काही वेळा फकीर वेशातही फिरत असत. त्या वेळी श्रींनी आपल्या शिरपूर मुक्कामात श्री बाळकृष्ण पंडितांना आपल्याजवळील मोठा लोखंडी चिमटा दिला होता. तो आजही त्यांच्या परिवारात नित्य पूजनात आहे. श्री बाळकृष्ण पंडितांचा उल्लेख “श्री आळंदीचे स्वामी” ह्या चरित्रात आलेला आहेच.

no images were found

निजामपूर:- धुळ्याहून निजामपूरला जाताना साक्रीच्या अलीकडे शेवाळी गांवापासून उजव्या अंगाला एक फाटा जातो. साधारण १५-१६ कि.मी. अंतरावर निजामपूर गांव आहे. या गांवातील श्री निजामपूरकर यांच्या श्री विठ्ठल मंदिरात श्रींनी एक चातुर्मास मुक्काम केला होता. तिथे श्री रोज वीणा घेऊन भजन करीत असत.

पिंपळनेर:- धुळे जिल्ह्यातील साक्रीपासून नाशिक रस्त्याला २२ कि.मी. अंतरावर पिंपळनेर हे गांव आहे. “श्री आळंदीचे स्वामी” ह्या पुस्तकात श्रींच्या खानदेशातील भ्रमणाबाबत ज्या ज्या गांवांचा उल्लेख केला आहे त्यात पिंपळनेर हे एक महत्त्वाचे गांव. ह्या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिरात श्रींचा एक महिना मुक्काम होता. ह्या मंदिराचा संपूर्ण कारभार श्री योगेश देशपांडे हे पाहतात.

तसेच या गांवात श्री वैद्य यांचे जुने गणेश मंदिर असून येथील गणेश मूर्ति ही साधारणत: ५०० वर्षे जुनी आहे. आपल्या पिंपळनेर मुक्कामी श्री ह्या मंदिरातही येत असत.

no images were found

बेटावद:- या जुन्या गांवात श्री रावजी शुक्ल नामक श्रीभक्त राहात होते. त्यांच्या राहत्या घरातच श्री दत्त मंदिर आहे. खानदेशातील आपल्या भ्रमण काळात श्रींनी याच मंदिरात मुक्काम केला होता. श्रींनी त्यावेळी श्री रावजी शुक्ल यांना आपल्या काष्ठाच्या पादुका प्रसादरूपाने दिल्या होत्या. श्री शुक्ल परिवाराने कालांतराने ही जागा त्यांचे जवळचे नातेवाईक श्री रामचंद्र गोविंद जोशी यांच्या नावाने केली. श्री जोशी या मंदिरातच राहातात व ते गेली ७३ वर्षे श्रीदत्त सेवेत असून श्रींनी दिलेल्या पादुका त्यांच्या नित्य पूजनात आहेत.

no images were found

त्र्यंबकेश्वर :-

श्रीगुरुचरित्रातील १३ व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे श्रींनी कारंजाला आपल्या माता-पित्यांची भेट घेतली. त्यानंतर आपल्या शिष्यांसह त्यांनी जगदोद्धारार्थ दक्षीण दिशेकडे प्रस्थान केले आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री आले, जेथे गौतमऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने गौतमी किंवा गोदावरीला चराचराचा उद्धार करण्यासाठी ह्या क्षेत्री आणले. येथे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग येथे आहे. भगवान शंकराचे हे अतिशय सुंदर मंदिर, तसेच येथे कुशावर्त तीर्थस्थानही आहे.

पंचवटी:-

नाशिक या तीर्थक्षेत्री पंचवटी ह्या भागात फार जुन्या काळापासून काळाराम मंदिर आहे. हे मंदिर गोदावरीच्या तटावर असून श्रीरामांच्या वनवास काळातील वास्तव्याच्या जागीच असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. याच मंदिरात श्रींचे पट्टशिष्य श्री पद्मनाभस्वामी हे त्यांच्या सुरूवातीच्या काळात पुजारी म्हणून काम करीत होते. श्रींची व त्यांची पहिली भेट याच मंदिरात झाली होती.

“श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रातील प्रभावळ ह्या प्रकरणात श्री यशवंतराव महाराज देव मामलेदार यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा मोठा अधिकार होता व तशी त्यांची कीर्तीही होती. श्री देव मामलेदार सन १८८७ मार्गशीर्ष एकादशीला समाधिस्थ झाले. त्यांची समाधि गोदावरीच्या घाटावर रामकुंडाजवळ आहे.

no images were found

मंजरथ (मंजरिका):-

अहमदनगर पासून साधारणत: १२०-१२५ कि.मी. अंतरावर गोदातटी मंजरथ हे एक छोटेसे गांव आहे. ह्या गांवाचे नांव श्रीगुरुचरित्राप्रमाणे मंजरिका असे आहे. या गांवाला दक्षिण प्रयाग संबोधले जाते. या ठिकाणी गोदावरी, सिंधुफणा आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. तसेच ह्या ठिकाणाला गोदावरीचे हृदयस्थान मानले जाते. या गांवाला कांही पौराणिक कथांची पार्श्वभूमी आहे.

मंजरिका या शब्दाचा अर्थ मांजर असा आहे. श्रीगुरुचरित्राच्या १३ व्या अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे श्रींची माधवारण्य मुनींची जी भेट झाली ती ह्याच गोदातटीच्या मंजरिका ह्या गांवी झाली. माधवारण्य मुनीं नरसिंव्हाची नित्य मानस पूजा करीत असत. त्यांची व श्रींची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तेव्हा त्या भेटीत श्रींनी त्यांना नरसिंव्हाच्या रूपात दर्शन दिले होते.

श्री माधवारण्यांच्या नित्य पूजेतील श्री नरसिंव्हाची मूर्ति आज त्यांचे वंशज श्री कल्याण देवीदासराव बोठे यांच्या नित्य पूजेत आहे.

मंजरथमध्ये एक पुरातन हेमाडपंथी श्रीलक्ष्मी-त्रिविक्रमाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामाला एक महत्त्वपूर्ण इतिहास आहे.

या गोदातटी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.

मंजरथच्या इतिहासाबद्दलची जी थोडीफार माहिती उपलब्ध झाली ती यासोबत जोडलेली आहेच.

no images were found

अंबाजोगाई :-

परळी वैजनाथपासून २४ कि.मी. अंतरावर असलेल्या अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसलेले अंबाजोगई हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. ह्या तीर्थक्षेत्राला फार प्राचीन इतिहास आहे. श्रीगरुचरित्रात सोळाव्या अध्यायातील आठव्या ते अकराव्या ओव्यांमध्ये ह्या स्थानाचा उल्लेख असून ह्या ठिकाणी श्रींनी गुप्तपणे वास केलेला आहे. श्रीगुरुचरित्रात अंबाजोगाई तीर्थक्षेत्राचा उल्लेख आरोग्यभवानी असा आलेला आहे.

अंबाजोगाई हे श्री योगेश्वरी किंवा अंबाभवानीचे माहेर मानले जाते आणि तिच्या वैजेश्वराशी विवाहासंदर्भात पौराणिक कथा या ठिकाणी प्रचलित आहे.

अंबाजोगाई तीर्थक्षेत्राचे महत्त्व केवळ श्री योगेश्वरी देवी किंवा अंबाभवानीमुळेच आहे असे नाही तर ह्या ठिकाणी ९ व्या शतकातील आद्यकवि श्री मुकंदराज ह्यांचे समाधि मंदिर अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्यांची ही कर्मभूमीच होती. ह्या शिवाय या पवित्र क्षेत्री सर्वज्ञ दत्तभक्त संत श्री दासोपंत यांचे निवासस्थान – दत्त संस्थान – ज्या ठिकाणी श्री दासोपंतांनी विविध भाषेती विपूल ग्रंथनिर्मिती केली, उपासनास्थान (प्राचीन श्री नरसिंव्हाचे मंदिर) आणि समाधि मंदिर आहे. तसेच इथल्या डोंगरांच्या कुशीत प्राचीन नागनाथ मंदिरही आहे. ह्या व्यतिरिक्त रेणुका मातेच्या पुरातन मंदिराजवळच श्री योगेश्वरी देवीचे मूळ मंदिरस्थानही ह्या ठिकाणी आहे. येथील प्राचीन मंदिरे हेमाडपंथी आहे.

परळी वैजनाथ :-

परळी वैजनाथ हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक एक आहे. श्रींगुरुचरित्राच्या १६ व्या अध्यायाप्रमाणे श्रींनी परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई ठिकाणी गुप्तपणे वास्तव्य केले होते.

no images were found

बासर :-

नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद गांवापासून केवळ १९ कि.मी. अंतरावर असलेले हे तेलंगणा प्रदेशातील गांव. आंध्र व तेलंगणा प्रदेशात बासरचे महत्त्व येथे असलेल्या श्रीज्ञानसरस्वतीच्या मंदिरामुळे. या ठिकाणी प्रथा अशी आहे की लहान मुलाला / मुलीला पहिल्यांदा शाळेत घालण्यापूर्वी त्याला वसंत पचंमीच्या दिवशी ह्या श्रीज्ञानसरस्वती मंदिरात आणून येथील ब्राह्मणांकडून त्या मुलाची / मुलीची विधीपूर्वक अक्षराभ्यासाची सुरूवात केली जाते व सरस्वती पूजन केले जाते.

या गांवाचे दुसरे महत्त्व म्हणजे श्रींचे या ठिकाणी अनुष्ठान स्थळ आहे. ह्याच ठिकाणी श्रीगुरुचरित्रात १३ व १४ व्या अध्यायात उल्लेखिलेल्या पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला श्रींच्या शिष्यांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करून श्रींसमोर आणले आणि त्याच वेळी त्या ठिकाणी सायंदेवही श्रींच्या दर्शनार्थ आले. पुढील प्रसंग आपणासर्वांना माहित आहेच. तरीही श्रींच्या अनुष्ठानस्थळी त्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन करणारा जो फलक लावला आहे त्याचे एक छायाचित्र यासोबत जोडलेले आहे.

no images were found

ब्रह्मेश्वर :-

बासर पासून साधारणत: ३७ कि.मी. अंतरावर गोदातटी असेलेले हे ब्रह्मेश्वर. हेमाडपंथी रचना असलेले येथील मुख्य प्राचीन मंदिर श्री हरिहराचे आहे.

श्रीगुरुचरित्रात १३ व १४ या स्थानाचा उल्लेख येथील एका ब्राह्मणाची पोटशुळाची व्याधी श्रींनी दूर केली असा आहे

no images were found

पंढरपूर :-

संतांचे माहेर घर, विठुरायाची नगरी पंढरपूर. येथे श्रींनी आळंदीत येण्यापूर्वी या नगरीच्या भीमा तटावरील श्री व्यास नारायण मंदिराच्या परिसरात वास्तव्य केले. श्रींनी पांडुरंगाच्या मूर्तिला वज्रलेप करून लक्ष भोजन घातले. वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.

श्री व्यास नारायण मंदिराची व त्या परिसराची छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

no images were found

नरसोबाची वाडी :-

मिरजपासून १७-१८ कि.मी. वर कृष्णातटावर असलेले हे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी ह्या नावानेही ओळखले जाते. ह्या ठिकाणी श्रीदत्तात्रेयाच्या मनोहर पादुकांचे मंदिर आहे. तसेच या ठिकाणी श्रीगुरुचरित्रात उल्लेख केलेली शुक्ल तीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्धवरद तीर्थ, अमर तीर्थ, कोटी तीर्थ, शक्ति तीर्थ आणि प्रयाग तीर्थ अशी अष्टतीर्थे आहेत. श्रींनी हे क्षेत्र सोडण्यापूर्वी चौसष्ट योगीनींना आश्वस्त करून त्यांच्यासाठी श्रीदत्तात्रेयांच्या मनोहर पादुका, अन्नपूर्णा आणि जाह्नवी मूर्तिंची स्थापना केली. याबाबत सविस्तर उल्लेख श्रीगुरुचरित्रात आलेला आहेच.

या पवित्रस्थळी माघ पौर्णिमा ते माघ वद्य पंचमीपर्यंत गोपालकाल्याचा उत्सव असतो. ह्या उत्सवात रोज रात्री १२ वाजता पहिल्यांदा मनोहर पादुकांची यथासांग महापूजा, धूपार्ती आणि त्यानंतर पालखी असा संपूर्ण सोहळा सकाळी ४ वाजेपर्यंत चालतो. या पाच दिवसांत श्रींचे या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २४ तास वास्तव्य असते. हा उत्सव शेकडो वर्षांपासून सुरू आहे.

येथे विशेष अशी माहिती मिळाली की येथील मनोहर पादुकांची स्थापना श्रींनी हे तीर्थक्षेत्र सोडण्यापूर्वी अश्विन वद्य द्वादशी (गुरुद्वादशी) रोजी केली. ही तिथी श्री श्रीपाद वल्लभ यांच्या निजानंद गमनाची आहे. श्रींनी श्री श्रीपाद वल्लभ यांच्या मनोहर पादुकांची स्थापना स्वत: आलास गावच्या श्री बहिराम भट नांवाच्या साधारण ८० वर्षांच्या पुराहिताकडून करवून घेतली. ह्याबाबतची सविस्तर माहिती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या आदेशानुसार श्री शंकरस्वामी – श्री गुळवणी महाराजांचे ज्येष्ठ बंधुंनी आपल्या “गुरु प्रसाद” या ग्रंथात दिलेली आहे.

येथे श्रीदत्तात्रेयाच्या मनोहर पादुका मंदिराच्या परिसरातच सुरूवातीलाच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे शिष्य श्री रामचंद्रयोगी यांची संजीवन समाधि आहे. श्रींची भेट होईपर्यंत त्यांनी याच ठिकाणी तपश्चर्या / साधना केली. तसेच श्रींचे शिष्य श्री नारायणस्वामींची समाधि मंदिर आहे. ते सदेह वैकुंठाला गेले. श्री नारायणस्वामींचे शिष्य श्री कृष्णानंदस्वामींचेही त्या ठिकाणी समाधि मंदिर आहे. श्री नारायण-स्वामींचे दुसरे शिष्य श्री गोपाळस्वामी यांचीही येथे संजीवन समाधि आहे. तसेच श्री मौनीबाबांचेही समाधि मंदिर आहे. विशेषत: येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याचीही जागा याच परिसरात आहे. श्रीदत्तात्रेयाच्या मनोहर पादुका मंदिराच्या बाजुलाच दरवर्षी रथसप्तमी ते माघपौर्णिमेपर्यंत श्रीकृष्णावेणीचा दरवर्षी मोठा उत्सव असतो. अमरेश्वर :- अमरेश्वर हे कृष्णा नदीच्या पूर्व तीरावर असून तिथे अमरेश्वराचे मंदिर आहे. त्याच प्रमाणे ह्या शिवलिंगाच्या मागच्या भागाला लागूनच चौसष्ट योगीनींच्या प्रतिकात्मक आठ मूर्तिंचे मंदिर आहे. ह्याबाबतचा सविस्तर उल्लेख श्रीगुरुचरित्रातील १८ व्या अध्यायात आलेला आहेच. या मंदिरातच एका बाजुला श्री वासुदेवानंद सरस्वतीस्वामींचे पीठ आहे. ते त्यांचे पट्टशिष्य श्री नरसिंहसरस्वती दिक्षित महाराजांनी स्थापन केलेले आहे.

श्रीगुरुचरित्रातील १८ व्या अध्यायात भिक्षुक ब्राह्मण श्री कुलकर्णी यांच्या घरी श्री भीक्षेसाठी आले असता जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून त्यांच्या कुळाचा उद्धार केल्याबाबतची सविस्तर घटना आलेली आहे. त्या कुलकर्ण्यांची ११ वी पिढी आजही त्या जागी असून त्या जागेची नित्य पूजा करतात आणि येणाऱ्या भक्तांना आत्मियतेने सर्व माहिती सांगतात.

शिरोळ :-

नरसोबाच्या वाडीपासून ५ कि.मी. अंतरावरचे हे गांव. येथे श्री भोजनपात्र दत्तमंदिर आहे. याबाबतची सविस्तर माहिती देणारा फलक या मंदिराच्या दर्शनी भागात लावला आहे. त्याचे छायाचित्र सोबत जोडलेले आहे.

no images were found

भिल्लवडी :-

सांगलीपासून साधारण १८ कि.मी. अंतरावरील कृष्णामाईच्या काठी असलेले आणि श्री चरणांनी पुनीत झालेले हे गांव. येथे कृष्णेच्या पूर्व तटावर श्रीभुवनेश्वरीचे फार प्राचीन पण सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळच श्रीदत्तगुरुंच्या मूळ पादुकांचे फार पुरातन मंदिर आहे. आपल्या वास्तव्य काळात श्री पहिल्यांदा ह्या मंदिरात थांबत आणि नंतर पुढे श्रीभुवनेश्वरीच्या दर्शनासाठी जात असत अशी येथे धारणा आहे. सध्या ह्या मंदिरात गेल्या ३४ वर्षांपासून ८७ वर्षीय सत्पुरुष श्री हंसाळे श्री दत्तात्रेयांच्या पादुकांची मनोभावे अखंड सेवा करीत आहेत.

करवीरपूरचा (कोल्हापूरचा) एका मतिमंद ब्राह्मण आपल्या मतिमंदपणाला उद्वेगून भिल्लवडीच्या श्रीभुवनेश्वरी देवीच्या मंदिरात आला आणि देवीला ज्ञानप्राप्तीसाठी आपली जिव्हाही कापून प्रार्थना केली. परंतु तिने त्याला स्वप्नात दृष्टांत देऊन स्वत:च्या उद्धारार्थ कृष्णेच्या पश्चिम तटावर औदुंबरतळी असलेल्या श्रींना भेटायला सांगितले आणि त्याप्रमाणे तो श्रींच्या दर्शनार्थ गेला असता श्रींनी त्याचा उद्धार केल्याची घटना श्रीगुरुचरित्राच्या १७व्या अध्यायात सविस्तरपणे दिलेली आहे.

औदुंबर :-

भिल्लवडीपासून ५-६ कि.मी. अंतरावर कृष्णामाईच्या पश्चिम तटावर असलेले हे गांव. श्री गुप्तरूपाने एक चातुर्मास औदुंबरला वास्तव्याला होते. या ठिकाणी श्रीदत्तगुरुचे मंदिर असून तेथे विमल पादुकांही आहेत.

no images were found

कोल्हापूर :-

श्री दत्तभीक्षा लिंगस्थान :-

या प्राचीन व ऐतिहाकि गांवात श्री दत्तभीक्षा लिंगस्थान आहे. हया स्थानी आजही माध्यान्ही श्रीदत्तगुरु भीक्षेसाठी येतात अशी भाविकांमध्ये श्रध्दा असून येथे नित्य श्रीदत्तगुरूंची भक्तीभावाने आरती व पुजा केली जाते.

no images were found

कोल्हापूर :-

प्रयाग (दक्षिण काशी) :-

कोल्हापुर शहरापासून साधारण १० कि.मी. अंतरावर असलेले हे पवित्र तीर्थक्षेत्र. याच ठिकाणी शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती या पाच नद्यांचा मनोहर संगम आहे. या तीर्थक्षेत्राचे महत्त्व व वर्णन श्रीगुरुचरित्राच्या १५ व्या व १९ व्या अध्यायात आलेले आहे.

श्रीक्षेत्र कात्यायनी :-

नवदुर्गांपैकी एक श्री कात्यायनी देवीचे मंदिर या ठिकाणी आहे. हे स्थान श्री नारायणस्वामींची तपोभूमी म्हणून ओळखले जाते.

no images were found

नरसिंहपूर :-

श्रीगुरुचरित्राच्या १५ व्या अध्यायात श्रींनी आपल्या शिष्यांना ज्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करून येण्यास सांगितले त्यापैकी कृष्णानदीच्या काठी असेलेल्या कोल्हग्राम (नरसिंहपूर, जि.सांगली) तीर्थक्षेत्राच्या नरसिंहदेवाचा उल्लेख केलेला आहे. येथील श्री नरसिंव्हाच्या मूर्तिचे छायाचित्र सोबत जोडलेले आहे. त्यात श्री नरसिंव्हाची प्रभावळ स्पष्टपणे दिसते. या क्षेत्राची विस्तृत माहिती देणारा फलक या मंदिरात लावलेला आहे. त्याचे छायाचित्र भक्तांना या क्षेत्राचा परिचय व्हावा यासाठी सोबत जोडलेला आहे.

रहिमतपूर :-

सातारा जिल्ह्यातील हे गांव. “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रातील “प्रभावळ” मध्ये रहिमतपूरचे श्री राधाकृष्णस्वामी यांचा थोडक्यात चरित्रात्मक उल्लेख आला आहे. त्यांना निर्विकल्प समाधीची तळमळ लागून होती. त्यांची आणि श्रींची पहिली भेट साताऱ्याजवळील कृष्णा-वेण्णा संगमावरील श्रीमाहुली तीर्थक्षेत्री झाली. त्या ठिकाणी श्रींनी त्यांना निर्विकल्प समाधी लावून दिली. श्री व त्यांची भेट पुढे रहिमतपूरला होत असे. पुढे श्री राधाकृष्णस्वामींनी अश्विन वद्य ११ शक १७८१ रोजी रहिमतपूर येथे श्रीलक्ष्मी-नाराण मंदिरातील मूर्तिंसमोरच समाधी घेतली. त्यांचे शिष्य श्री विष्णुमहाराज यांचा “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रातील “प्रभावळ” मध्ये उल्लेख आलेला आहे. आपल्या मठांमध्ये नित्य म्हटल्या जाणारी श्रींची सुंदर आरती श्री विष्णुमहाराजांनीच रचलेली आहे. त्यांनी श्रींवर काही अभंगही रचलेले आहेत. त्यांनी मार्गशीर्ष शु.११ (श्रीगीता जयंती) शुक्रवार शके १८२० (सन १८९८) रोजी त्यांचे सद्गुरु श्री राधाकृष्ण-स्वामींच्या समाधीजवळच समाधी घेतली.

no images were found

लिंब :- साताऱ्यापासून १४-१५ कि.मी. अंतरावर कृष्णेच्या काठी वसलेलं हे ऐतिहासिक गांव. “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रात या क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. या गांवचे श्री रामचंद्र प्रभाकर फाटक हे श्रींचे भक्त होते. लौकिकदृष्ट्या त्यांना श्रींचा मंत्रोपदेश नसला तरी ते त्यांचे शिष्य होते. श्रींची त्यांच्यावर कृपा होती. श्री या गांवी येत असत. त्यावेळी त्यांचा मुक्काम येथील लक्ष्मीनारायण मंदिरात किंवा विठ्ठल मंदिरात होत असला तरी पुडीसाठी ते श्री फाटक यांच्याकडे जात असत. श्रींनी त्यांना पूजेसाठी काष्ठाच्या पादुका दिल्या होत्या त्या त्यांच्या वंशाजवळ अजूनही आहेत.

माहुली :- रहिमतपूरचे श्री राधाकृष्णस्वामी आणि श्रींची पहिली भेट साताऱ्यापासून ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या कृष्णा-वेण्णा संगमावरील या श्रीमाहुली तीर्थक्षेत्री झाली. त्या ठिकाणी श्रींनी त्यांना निर्विकल्प समाधि लावून दिली. या गांवी श्री राधाकृष्णस्वामी हे श्री शंकरस्वामींचे शिष्य झाले व त्यांना श्री शंकरस्वामींनी संन्यास दीक्षा दिली. या गांवी श्री विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिराच्या श्री विठ्ठल-रखुमाईंच्या पायाशी श्री राधाकृष्णस्वामींचे शिष्य श्री विष्णुमहाराज (श्रींच्या आरतीचे रचयिते) यांचे थोरले बंधु श्री कृष्णस्वामी यांची समाधी आहे.

no images were found

श्रीक्षेत्र अक्कलकोट :- श्री स्वामी समर्थांच्या प्रदीर्घ वास्तव्याने आणि अनेक लीलांनी पावन झालेले हे पवित्र तीर्थक्षेत्र. “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रात श्री व स्वामींच्या भेटीबाबत सविस्तर वर्णन आलेले आहे. श्री ह्या क्षेत्री तीन महिने वास्तव्य करून होते अशी धारणा आहे.

no images were found

श्रीक्षेत्र गाणगापूर:-

निर्गुण मठ (श्री दत्त मंदिर) :- श्रींची कर्मभूमी. श्रींच्या अनेक अतर्क्य लीलांनी पुनित झालेले हे तीर्थक्षेत्र. या मठात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत.

आजचा दिवस श्रीभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा. आजच्या दिवशीच श्रींनी आपले अवतार कार्य संपवून गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह (श्रीसिद्धमुनी, श्री सायंदेव, श्री नंदीनाम व श्री नरहरीकवि) श्रीशैलकडे प्रस्थान केले.

“शिशिर ऋतु माघमासीं | असितपक्ष प्रतिपदेसी |

शुक्रवारीं पुण्यदिवसीं | श्रीगुरु बैसले निजानंदी ||३७|| अ.५१”

“श्रीगुरु म्हणती शिष्यांसी | जातों आम्ही निज मठासी |

पावतां खूण तुम्हांसी | प्रसादपुष्पें पाठवितों ||३८|| अ.५१”

श्री कल्लेश्वर मंदिर :- श्री क्षेत्र गाणगापुरच्या पूर्वेला अष्टतीर्थांपैकी मन्मथ तीर्थाच्या जवळ असलेले हे श्री कल्लेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश, श्रीदुर्गापार्वती, नवग्रह आणि शमीवृक्षातून प्रकट झालेले शनैश्वर इ. देवतांची मंदिरे आहेत.

श्रीगुरुचरित्रातल्या ४९ व्या अध्यायात या श्री कल्लेश्वराचे महत्त्व सांगितलेले आहे.

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं |

जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७||”

no images were found

श्रीक्षेत्र गाणगापूर:-

संगमेश्वर :- श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात या पवित्र स्थानांतील तीर्थांचे महात्म्य सांगितले आहे. या ठिकाणी अमरजा व भीमा नदीचा संगम आहे. या संगमाच्या पश्चिमेला श्री संगमेश्वर (श्रीशंकराचे) मंदिर आहे. श्री येथे नित्य अनुष्ठानासाठी येत असत. “कल्पवृक्षातें पूजोनि | मग जावे शंकरभुवनीं | संगमेश्वर असे त्रिनयनी | पूजा करावी मनोभावें ||३९|| जैसा पर्वती मल्लिकार्जुन | तैसा संगमीं रुद्र आपण || भक्तिपूर्वक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||

अष्टतीर्थ स्थाने

भूमीवर असंख्य पवित्र तीर्थस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर क्षेत्रीच का वास्तव्य केले याबाबत श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात सविस्तर उल्लेख असून येथील अष्टतीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. ती अष्टतीर्थें पुढीलप्रमाणे आहेत.

१. षट्कुळ तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील औदुंबरवृक्षासमोर असलेले हे षट्कुळ तीर्थ. हे प्रयाग तीर्थासमान आहे.

२. श्री नरसिंह तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील कल्पवृक्षासमोर असलेले हे श्री नरसिंह तीर्थ.

३. भागीरथी तीर्थ

काशीप्रमाणेच येथे काही अंतरावर असलेल्या मणिकर्णिका कुंडातून निघालेले पाणी भीमा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशीसमान आहे.

४. पापविनाशी तीर्थ

“ऐसे प्रख्यात तीर्थ देखा | नाम पापविनाशी ऐका | जे करिती स्नान भक्तिपूर्वका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||

५. कोटीतीर्थ

“सोम-सूर्यग्रहाणासी | अथवा संक्रतिपर्वणीसी | अमापौर्णिमा प्रतिपदेसी | स्नान तेथें करावे ||८८|| सवत्सेसी धेनु देखा | सालंकृत करोनि ऐका | दान द्यावें व्दिजा निका | एकेक दान कोटिसरसे ||८९||

६. रुद्रपादतीर्थ

हे तीर्थस्थान गया तीर्थासारखे आहे. रुद्रपादाची पूजा केल्याने कोटी जन्मांची पापे जातात.

७. चक्रतीर्थ

येथे स्नान केल्याने पाप्याला ज्ञान होते व व्दारका तीर्थासारखे पुण्य मिळते येथे अस्थि चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचे मंदिर आहे.

८. मन्मथ तीर्थ

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७|| मन्मथ तीर्थीं स्नान करावे | क्ललेश्वरातें पूजावें | प्रजावृध्दी होय बरवें | अष्टैश्वर्यें पाविजे ||९८||” अष्टतीर्थ स्थानांची छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

विश्रांती कट्टा :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात एका शुद्र शेतकऱ्याच्या भक्तीने संतोष पावून श्रींनी त्याच्यावर कृपा केल्याबाबतची सविस्तर घटना सांगितली आहे.

नागेशी :-

श्रीगुरुचरित्राच्या १३ व १४ व्या अध्यायात श्रींच्या व ज्या सायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भेटीचा व श्रींनी यवनापासून त्याला दिलेल्या अभयाबाबतचा उल्लेख आलेला आहे तो ब्राह्मण श्रींनी दिलेल्या आश्वासनानुसार २५ वर्षांनंतर गाणगापुरात श्रींच्या दर्शनार्थ आला ते श्रींची सेवा करण्याच्या निर्धाराने. त्या भक्ताचे अंत:करण पाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीक्षा घेतली. त्याबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सविस्तर आलेली आहे. ती घटना ज्या स्थानी घडली ते स्थान म्हणजे नागेशी.

सती कट्टा :-

माहूरच्या एका धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला त्याच्या विवाहानंतर चार वर्षांनी क्षय व्याधी झाली. ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनार्थ गाणगापूरला येताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. (यासंबंधाने श्रीगुरुचरित्रात ३०, ३१ व ३२ सविस्तर वर्णन आलेले आहे.) धर्माचरणाप्रमाणे तिने सती जाण्याची ज्या स्थानी सर्व तयारी केली ती ही जागा.

कुमसी :-

श्रीगुरुचरित्राच्या २३ व २४ व्या अध्यायात कुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्या त्रिविक्रम भारती तपस्वीबाबतची घटना वर्णन केलेली आहे. श्रींनी कुमसी गांवी त्रिविक्रम भारतींना ज्या स्थानी विश्वरूप दर्शन दिले त्या स्थानाची छायाचित्रे सोबत दिलेली आहेत. हे स्थान गाणगापूरपासून ३७ कि.मी. अंतरावर भीमा नदी तटावर आहे.

श्रीक्षेत्र गाणगापूर:-

हिप्परगी (मंदेवाल) :- श्गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील हे एक छोटेसे गांव आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले. या स्थानाचे छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

no images were found

श्रीक्षेत्र गाणगापूर:-

तंतुकेश्वर मंदिर :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात तंतुकाबाबतची (विणकर) घटना आली आहे. श्रींनी एका भक्त तंतुकाला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्ययात्रा घडविल्याबाबतची ही घटना आहे. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिराला पुढे तंतुकश्वराचे मंदिर असे नांव पडले. मंदिराचे छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

गाणगापूरची गांव वेस :-

श्री नरसोबाच्या वाडीतील आपले १२ वर्षांचे वास्तव्य संपवून गाणगापूरला आले. प्रथमत: ते संगमावर राहिले. पण वांझ म्हशीला दुभती केल्याच्या चमत्कारामुळे ते प्रसिध्दीस आले. त्यामुळे गाणगापूरचा यवन राजा त्यांचा भक्त झाला. त्यानेच श्रींना आग्रह करून त्यांना वाजत गाजत ज्या वेशीतून गाणगापूर नगरांत आणले ती ही वेस. याबाबतचा उल्लेख श्रीगुरुचरित्राच्या २३ व्या अध्यायात आलेला आहे. वेशीचे छायाचित्रे सोबत जोडले आहे.

श्रींचे पुष्परूपाने पुनरागमन :-

या पंचक्रोशीत श्रीभक्तांमध्ये माघ कृष्ण चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

माघ कृष्ण प्रतिपदा (गुरुप्रतिपदा), शुक्रवार या पुण्य दिवशी श्रींनी गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह श्रीशैलकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रींनी दु:खित भक्तांना, लौकिकार्थाने येथून जात असलो तरी आपला नित्य वास गाणगापूरीच असेल आणि भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी त्याना माझे दर्शन घडेल, असे आश्वास दिले होते.

पाताळगंगेत पुष्पासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना आश्वासित केले की आपण निजानंदी पोहचल्याची खूण म्हणून चार शेवंतीची पुष्पें पाठवितो ती प्रसाद म्हणून स्वीकारावी त्यांची अखंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शेवंतीची चार फुलं गंगेतून वाहात आली. तो दिवस म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीचा होता.

आजच्या दिवशी श्रींच्या पुष्परूपी पुनरागमनाप्रित्यर्थ येथे दु.१२.३० वाजता श्रींचा पालखी सोहळा असतो. पंचक्रोशीतील हजारो श्रीभक्त या रोमांचकारी पालखी सोहळ्याला श्रींच्या दर्शनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात.

ही पालखी अष्टतीर्थांपैकी एक रुद्रपाद तीर्थापर्यंत वाजत-गाजत येते. या तीर्थांत श्रींच्या पादुकांना तीर्थस्नान असते. श्रीभक्तही या ठिकाणी आजच्या दिवशी या पवित्र तीर्थांत स्नान करून पुण्य मिळवतात. सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असली तरी अतिशय शांतपणे हा सोहळा संपन्न होतो.

या भारलेल्या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. या रोमांचकारी प्रसंगाचे छायाचित्रण श्रीभक्तांसाठी सोबत जोडलेले आहे.

no images were found

कडगंची :-

येथे श्रीदत्तात्रेयाचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर आहे. या मंदिराच्या मागच्याच बाजुला श्रींचे शिष्य श्री सायंदेवस्वामींचे घर असून त्यांचे वंशज येथे राहतात. श्रीगुरुचरित्राचे लिखित प्रकटीकरण श्रींचे प्रिय शिष्य श्री सायंदेवस्वामींच्या पाचव्या पिढीतील श्री गंगाधर सरस्वती यांनी या ठिकाणी केले. श्रींच्या चरित्राची पहिली मूळप्रत सायंदेवांचे वंशज श्री कुलकर्णी (साखरे) यांच्याकडे बरीच जीर्णावस्थेत असली तरी आजही जपून ठेवण्यात आलेली आहे. ही मूळप्रत श्रीभक्तांना दर्शनासाठी श्री सायंदेवस्वामींच्या घरातील देवघरात ठेवण्यात आलेली आहे. त्याचे छायाचित्र सोबत जोडलेले आहे.

बीदर :-

श्रींनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात एका भक्त रजकाला त्याच्या मनीची राजवैभव उपभोगण्याची, वासना पूर्ण होण्याबाबत वर दिलेला होता आणि पुर्नभेटीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे कालांतराने तो रजक पुढल्या जन्मी बीदरला यवनांचा राजा झाला. स्फोटकाच्या व्याधीने ग्रासलेला यवन राजा ब्राह्मणांबद्दल विशेष आदर असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे व्याधी निवारणार्थ पापविनाशी तीर्थावर स्नानास गेला असता तेथील एका संन्यासाने त्याला गाणगापूरला श्रींच्या भेटीस पाठविले. श्रींनी त्याला त्याच्या पूर्व जन्माची आठवण करून दिली आणि पहिल्या भेटीतच त्याची व्याधी दूर केली. तेव्हा त्या यवन राजाने श्रींना आग्रह करून बीदरला बोलाविले. त्या राजाने श्रींच्या आगमनाप्रित्यर्थ सारे नगर सजविले आणि बीदर नगराबाहेर असलेल्या पापविनाशी तीर्थावरून श्रींना वाजत गाजत आपल्या राजवाड्यात आणले आणि पायघड्यांवरून श्रींना अंत:पुरात नेऊन सिंहासनावर बसविले. तत्पूर्वी श्रींना बीदरमध्ये वास्तव्यास असलेल्या श्री सायंदेवाच्या ज्येष्ठ मुलाने – नागनाथाने – श्रींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांची षोडशेपचारें त्यांची पूजा, आरती केली व सहस्रभोजन घातले. बीदरच्या प्रवासात श्रींसोबत श्री सायंदेवांसह चार शिष्यही होते.

ह्या राजाचा राजवाडा आता बराच भग्न अवस्थेत आहे. परंतु त्याच्या पुढच्या पिढीने बांधलेला राजवाडा जुना झाला असला तरीही पुरातत्व विभागांतर्गत तो उत्तम अवस्थेत आहे.

पापविनाश तीर्थ आणि राजमहालाची छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

no images were found

श्रीक्षेत्र श्रीशैलम् :-

बीदरच्या राजाची घटना श्रीगुरचरित्राच्या ५० व्या अध्यायात आलेली आहे. ५१ व्या अध्यायात बीदरच्या राजाच्या भेटीनंतर श्रींचा महिमा / ख्याती सर्वदूर पसरली. त्यामुळे श्रींच्या मनात विचार आला की राजा व त्यासोबत इतर यवन सतत आपल्या भेटीसाठी यापुढे गाणगापुरांत येतील व त्यामुळे येथील ब्राह्मणांना त्रास होईल. म्हणून त्यांनी श्रीशैल यात्रेच्या निमित्याने त्यांनी गाणगापूर सोडण्याचे ठरविले. त्याप्रमाणे माघ, गुरुप्रतिपदा, शुक्रवार या पुण्य तिथीला ठरविल्याप्रमाणे श्री गाणगापूर सोडून श्रीशैल यात्रेला निघाले. त्यांच्यासोबत त्यांनी चार शिष्यांनाही घेतले. श्रीशैल पर्वताच्या पायथ्याशी कृष्णा नदीकाठी आले. पैलतीरावर श्री मल्लिकार्जुनाला भेटण्यासाठी पाताळगंगेतून पुष्पासनावर बसले व आपल्या चार शिष्यांचा निरोप घेऊन त्यांना आश्वासित केले की लौकिकार्थाने जरी आम्ही जात असली तरी आमचा सदैव वास गाणगापुरातच राहील आणि पुढे असेही सांगितले की मी निजानंदी पोहचताच प्रसाद म्हणून शेवंतीची चार पुष्पे पाठवीन ती आपण स्वीकारावी व त्यांचे नित्य पूजन करावे त्यामुळे लक्ष्मीचा नित्य वास तुमच्या घरी राहील. गायन करणाऱ्यांवर माझी विशेष प्रीती राहील. श्री निजानंदी जाताना त्यांच्या शिष्यांची मन:स्थिती कशी असेल असा विचार जरी मनात आला तरी मन हेलावते.

ही अल्पशी सेवा श्रींचे चरणी समर्पित असो.

no images were found

श्रीक्षेत्र आळंदी :-

येथील श्रींच्या समाधी मंदिरात अभिषेक केल्यानंतर श्रींचे श्रीदत्तरूपातील दर्शनाचे छायाचित्र सोबत जोडले आहे.

श्रींचे श्रीदत्तरूपातील दर्शन

श्रींचे श्रीदत्तरूपातील दर्शन

श्रीक्षेत्र आळंदी :-

पंढरपूरच्या आपल्या वास्तव्यानंतर श्री भ्रमण करीत करीत सासवडमार्गे श्रीक्षेत्र आळंदीत शके १७९५ (इ.स.१८७३) मध्ये आले. सासवडहून येताना आळंदीचे श्री नामदेव रानवडे हे त्यांच्यासोबत होते. श्री चाकणमार्गाने आळंदीला येताना “थोरल्या पादुकां” जवळ थोड्या वेळ थांबले. त्यानंतर आळंदीत ते प्रथमत: पद्मावती देवी मंदिराच्या जवळ राहावयास होते. आळंदीवासीयांना श्रींचा महिमा कळल्यावर श्री बाळाबुवा चक्रांकितांसह इतर काही मंडळींनी श्रींना गांवात आणले. श्री सुरूवातीला गोपाळपुऱ्यातील श्री माणकेश्वर यांच्या वाड्यात राहिल्यानंतर ते श्री बाळाबुवा चक्रांकितांच्या माडीवर राहावयास आले, ज्याला श्रींचे आळंदीतले मूळ स्थान समजले जाते. ठिकाणी श्री १२ वर्षेपर्यंत राहिले व ज्या दिवशी त्यांना १२ वर्षे पूर्ण झाली त्या दिवशी ते आज गोपाळपुऱ्यात जेथे त्यांची समाधी आहे तेथे आले.

आळंदीतील वास्तव्यात श्री खंडोबाचे मंदिर, धाकट्या पादुका वगैरे ठिकाणी जात असत. श्री आळंदीचे स्वामी ह्या चरित्र ग्रंथात श्रींच्या वास्तव्यातील त्यांच्या जगदुध्दाराच्या कार्याचा व प्रमुख घटनांचा सविस्तर उल्लेख आलेला आहे.

no images were found

पुणे :-

ओंकारेश्वर

“श्री आळंदीचे स्वामी” या चरित्र ग्रंथात “प्रभावळ” या प्रकरणात उच्च कोटीस पोहचलेले आधुनिक संत ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन ह्यांचे थोडक्यात चरित्र दिलेले आहे. त्यावरून त्यांचे आणि श्रींचे किती निकटचे संबंध होते हे लक्षात येतेच शिवाय त्यांनी केलेल्या सांप्रदायिक कार्याचाही परिचय होतो.

श्री अण्णासाहेब यांच्या मातोश्रीं गणेशभक्त असल्याने त्या कसबापेठेतील गुंडाचा गणपती मंदिरात दर्शनास जात असत. त्यांनी गणेशाला नवस केला होता व त्याचाच कृपाप्रसाद म्हणूनच श्री अण्णासाहेबांचा जन्म झाला. श्री अण्णासाहेबांचा वाडा शनिवार पेठेत आजही आहे. त्यांचे वंशज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. श्री अण्णासाहेबांचा जन्म वैशाख वद्य चतुर्थी, मंगळवार शके १७६९ व वैकुंठवास माघ शु. एकादशी, शुक्रवार शके १८३८ मध्ये झाला. त्यांचे समाधी मंदिर ओकारेश्वरावर मुळामुठा नदीच्या पात्रात आहे. येथे नित्यनियमाने दरवर्षी माघ शु. एकादशीस श्री अण्णासाहेबांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा होत असतो आणि नित्यनियमाने दर संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष आवर्तने केली जातात.

“श्री आळंदीचे स्वामी” या चरित्र ग्रंथात “प्रभावळ” या प्रकरणात श्रीमंती सरदार तात्यासाहेब रायरीकर, पुणे यांचाही थोडक्यात परिचय देण्यात आलेला आहे. श्री नरहरस्वामी नावाच्या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काही विशेष अनुष्ठाने केली. पुढे श्री नरहरस्वामी समाधिस्थ झाल्यावर योगायोगाने श्रींची भेट झाली. श्रींवर त्यांची भक्ती हळूहळू वाढू लागली. श्रीं अनेकदा त्यांच्या घरी त्यांच्या घरी येऊन राहत असत. आपल्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी श्रींजवळ संन्यास घेण्याची इच्छा दर्शवली त्याप्रमाणे श्रींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली होती. त्यांची समाधि श्री नरहरस्वामी समाधीमंदिराच्या जवळच आहे. परंतु त्या जागेजवळ काही दशकांपूर्वी पूल बांधण्यात आल्यामुळे तिथे आता श्री तात्यासाहेबांचे समाधी मंदिर अस्तित्वात नाही. मुळामुठा नदीकाठी असलेला त्यांचा राहता वाडा १९६१ सालच्या पानशेत धरण फुटल्यावर आलेल्या पुरात वाहून गेला. आता त्याजागेवर मोठ्या इमारती उभ्या आहेत. त्यांचे वंशज या इमारतीतील एका सदनिकेत राहतात.

श्रींची पुणेस्थित योगी श्री जंगलीमहाराज ह्यांच्याशी भेट होत असे. श्री जंगलीमहाराजांचे समाधी मंदिर डेक्कनजवळ आहे.

श्रींची पुण्यास असलेले सत्पुरुष श्री काळबुवा यांची भेट होत असे. ते श्री दत्तात्रेय भक्त होते. ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन हे नेहमी श्री काळबुवांच्या दर्शनासाठी जात असत. श्री आळंदीचे स्वामी चरित्रग्रंथात त्यांच्याबाबत थोडक्यात परिचय देण्यात आला आहे. त्यांचे समाधि मंदिर ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरातच आहे.

no images were found

देहू :-

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान.

श्री आपल्या आळंदीच्या १२ वर्षांच्या वास्तव्यात असतांना यात्रेच्या निमित्त्याने आणि फाल्गुन महिन्यात श्री तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीला देहुला नियमित दर्शनाला जात असत.

श्री तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्य श्री दरवर्षी आळंदीच्या मठातून देहुला पायी वारी निघत असे. काही कारणांमुळे ही वारी खंडित झाली होती परंतु ह्या वर्षी भक्तमंडळी श्री तुकाराम बीजेला ही पायी वारी पुन्हा सुरू करीत आहेत.

no images were found

पुणे :-

भक्तांच्या प्रवासातील शेवटच्या टप्प्यात, श्रींच्या शैलगमनानंतर त्यांनी त्यांच्या चार प्रिय शिष्यांसाठी पाठवलेल्या प्रसाद पुष्पांतील एका पुष्पाचे दर्शन घेण्याचा योग आज पुण्यात आला. त्या पुष्पातील एक पुष्प प्रसाद म्हणून श्रींचे प्रिय शिष्य श्री नंदिनामा यांना मिळाले. श्री नंदिनामांचा श्रीगुरु चरित्रातील ४५ व्या अध्यायात सविस्तर वर्णन केलेले आहे. ते कुष्ठव्याधी निवारणार्थ श्रींकडे गाणगापूरला आले होते आणि श्रीकृपेने त्या व्याधीचा एक छोटा अंश त्यांचे मन शंकित असल्यामुळे शिल्लक राहिले आणि ते पूर्णपणे जाण्यासाठी आपल्यावर स्तुतीपर कवित्व करण्यासाठी श्रींनी त्यांना सांगितले. परंतु लिहिता वाचता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर श्रींनी त्यांच्या जीभेवर कृपादृष्टीने विभुतीचे प्रोक्षण करताच त्यांना ज्ञान प्राप्त झाले. नंतर त्यांनी श्रींच्या सन्निध्दच राहून श्रींवर स्तुतीपर कवने केली. त्यातील काही कवने आजही श्रींच्या पालखीच्या वेळी गायिली जातात.

अशा या श्री नंदिनामा कवींच्या वंशाकडे (१४व्या पिढीत) पुण्यात ते पुष्प श्रींच्या आज्ञेप्रमाणे अजूनही जतन करून ठेवले असून त्याचे नित्य पूजन होत असते.

no images were found

वाशिम :-

“श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रात श्रींचा वाशिम येथील श्री प्रल्हाद अण्णा लोथे गिरोलीकर यांच्याशी आलेल्या संबंधाचा सविस्तर उल्लेख आहे. श्रींच्या सूचनेप्रमाणे श्री प्रल्हाद अण्णा लोथे यांनी भागवतावर प्रवचने करण्यास सुरूवात केली व पुढे त्यांचा त्यात मोठा नावलौकीक झाला. कालांतराने श्री प्रल्हाद अण्णा लोथे यांनी आळंदीला जाऊन श्रींकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यानंतर ते श्री सच्चिदानंदस्वामी महाराज म्हणून परिचित झाले. त्यांनी पुढे गिरोली येथे समाधी घेतली. त्यांचे छायाचित्र वाशिम आणि मेहकर येथील बालाजी मंदिरात दर्शनी भागात लावलेले आहे. त्यांचे वाशिम येथील बालाजी मंदिरातील छायाचित्र सोबत जोडलेले आहे. आज वाशिम येथे त्यांच्या निवासस्थानी कोणीही राहात नसून त्यांच्या घराच्या जागेवर नवीन वास्तु उभी आहे.

रेवसा

अमरावती पासून ९-१० कि.मी. अतरावर हे एक छोटेसे गांव आहे. “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रात श्री या गांवी एका जुन्या मठात मुक्कामाला होते असा उल्लेख आहे. या गावांत एकमेव जुना मठ आहे. तो श्री संतब्रह्मचारी यांचा असून त्यांचा काळ हा ३०० – ४०० वर्षांपूर्वीचा समजला जातो. श्री येथे जवळपास दोन महिने वास्तव्यास होते. ह्या मठाच्या जवळच पुरात शिव मंदिरही आहे. त्यांची छायाचित्रे सोबत जोडलेली आहेत.

ऋणमोचन

हे गांव अमरावतीपासून २४-२५ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठी आहे. “श्री आळंदीचे स्वामी” या श्रींच्या चरित्रात श्री या गांवी काही काळ वास्तव्यास होते व याच ठिकाणी त्यांनी ऋणमोचन स्तोत्र रचले होते असा उल्लेख आहे. ह्या ठिकाणी पुरातन पण छोटेसे शिव मंदिर आहे. छायाचित्र सोबत जोडलेले आहे.

ऋणमोचन स्तोत्र श्रींच्या चरित्रात प्रसिध्द केलेले आहे व संकेतस्थ्ळावरही उपलब्ध् करून दिलेले आहे.

no images were found