प्रभावळ
राधाकृष्ण स्वामींचे वडील तुळजोपंत कुळकर्णी हे सुमारे २५०-३०० वर्षांपूर्वी कोल्हापूरकडील चिकुरडे या गांवी राहत असत. बद्रीकेदार ते रामेश्वर आणि रामेश्वर ते काशी-प्रयाग अशा तीर्थयात्रा केल्यावर तुळजोपंतांनी प्रयागहून अक्षय-वटाची एक फांदी आणून कृष्णा वेण्णा संगमा वरील तीरावर लावली आणि तिथेच ते तपाचरण करीत राहिले. शाहू महाराज प्रतिनिधीबरोबर मकरसंक्रांतीच्या पर्वकाळात संगमावर स्नानास आले, त्या वेळी संगमावरील अरण्याचे दान त्यांनी प्रतिनिधीला दिले. संगमावर प्रयागसारखे क्षेत्र व्हावे या इच्छेने प्रतिनिधींनी तेथे एक घर बांधले आणि ते तपश्चर्या करणाऱ्या तुळजोपंतांना दिले. तुळजोपंतांना त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावयास लावले. तुळजोपंतांच्या मुखी नेहमी शिवनाम असे म्हणून यांचे उपनाव ‘शिवनामे’ असे पडले. तुळजोपंतांच्या वंशात पुढे बाळकृष्ण उर्फ बापू, पत्नी आनंदीबाई या दांपत्याच्या पोटी वृध्दापकाळी श्रीमेरुलिंगाच्या कृपेने शके १७११ मध्ये एका मुलगा झाला. त्याचे नाव सदाशिव. सदाशिवाचे आईवडील त्याच्या वयाच्या अनुक्रमे १२ आणि १८ व्या वर्षी स्वर्गवासी झाले. हा सदाशिव म्हणजेच राधाकृष्ण स्वामी. त्यांचे संन्यासाश्रमांतील नांव सदानंद असे होते. ते राधाकृष्ण या नामाचे अखंड भजन करीत म्हणून त्यांचे नाव ‘राधाकृष्णस्वामी’ असे पडले. असे सांगतात की वडिलांच्या तेराव्या दिवशी सदाशिव बाळ टाळ्या वाजवून “राधाकृष्ण” नामाचे आपले भजन करीत असतांना लोकांना आढळला. वडिलांच्या मृत्युनंतर घर व शेत यांचे ब्राम्हाणांना दान करून हे माहुलीस ज्योतिपंत महाभागवत यांचे शिष्य शंकरस्वामी म्हणून होते, त्यांचेकडे आले. सहवासांत आल्यावर राधाकृष्णस्वामी शंकरस्वामींचे शिष्य बनले. शंकरस्वामींनीच त्यांना संन्यासदीक्षा दिली. त्यांची संप्रदाय परंपरा पुढीलप्रमाणे आहे. विष्णु-ब्रम्हदेव-नारद-व्यास-ज्योतिबुवा शंकर, राधाकृष्ण – शंकरस्वामींनी आश्विन शु. ११ शके १७३४ रोजी समाधी घेतली.
आपल्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणे राधाकृष्णस्वामी तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यास माहुली सोडून गेले. राधाकृष्णस्वामींच्या ‘भक्ती आणि योग’ या विषयावरील अभंगात हठयोगातील षट्चक्रांचे वर्णन आले आहे. त्यावरुन त्यांचा हठयोगाचा अभ्यास होता असे दिसते. गुर्वाज्ञेप्रमाणे तीर्थयात्रा व तपश्चर्या पूर्ण करून हे हिंडत हिंडत अखेरीस रहिमतपूरला आले. येथे हे चाळीस वर्षे राहून जगदुद्धाराचे कार्य करीत राहिले. रहिमतपुरात महामारीचा उपद्रव सुरू झाला त्या वेळी हे रागावून माहुलीस गेले होते. राधाकृष्णस्वामींचे मराठीचे शिक्षण बेताचेच होते आणि संस्कृतचा तर त्यांना गंधही नव्हता. त्यांचे आचरण अतिशय शुद्ध होते. जगदुद्धाराची तळमळ आणि भगवद्भक्ती पराकोटीला गेली होती, असे त्यांच्या चारित्रयावर दिसून येते. त्यांनी केलेल्या चमत्कारांची थोडी माहिती त्यांच्या अल्पचरित्रात आढळते. चाळीस वर्षे जगदुद्धाराचे कार्य केल्यावर त्यांनी देहत्याग करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे अश्विन वद्य ११ शके १७८१ रोजी इहलोक सोडून जाण्याचे निश्चित केले. त्या वेळी त्यांची प्रकृती फार क्षीण झाली होती. सकाळी भजन सुरू झाले. मोठ्या प्रयासाने राधाकृष्णस्वामी भजनास उभे राहिले. मोठ्या आवेशाने ‘राधाकृष्ण’ अशी आरोळी ठोकली व त्यांनी भजनास प्रारंभ केला. शरीरात त्राण उरले नव्हते. थोड्या वेळातच ते खाली पडले ते अखेरचेच! राधाकृष्णस्वामींची समाधी रहिमतपुरास आहे. राधाकृष्णस्वामींचे लौकिक चरित्र एकूण असे आहे. महाराजांचा व त्यांचा जो ऋणानुबंध आला त्याविषयी तिकडील लोकांत पुष्कळ तपास करूनही काहीच पत्ता लागला नाही. फक्त असा एक उल्लेख आढळला की दोन अज्ञात ब्राम्हण राधाकृष्णस्वामींच्या भेटीस आले होते व तसा त्यांना पूर्वदृष्टांतही झाला होता. त्या दोन व्यक्तींच्या नावांचा मुळीच पत्ता लागत नाही. असो.
राधाकृष्णस्वामींच्या चरित्राशी संबंध असणारी पण आतापर्यंत अज्ञात असलेली आणि ज्यामध्ये महाराजांचा ऋणानुबंध आलेला आहे अशी घटना पुढीलप्रमाणे आहे. राधाकृष्णस्वामी त्या वेळी माहुलीस राहत होते. त्यांचे वास्तव्य गावाबाहेरील मठात होते. हा मठ बहुधा त्यांचे गुरू शंकरस्वामी उपाख्य अखंडानंद यांचा असावा. राधाकृष्णस्वामी त्या वेळी बरेच वयातील असावेत. कारण त्यांना डोळ्यांनी नीट दिसत नव्हते. त्यांचा योगाभ्यास चांगला होता परंतु सविकल्पसमाधीच्या पुढे त्यांना जाता येत नव्हते. त्याबद्यल त्यांना नेहमी वाईट वाटे व तेथपर्यंत नेऊन घालणार कोण भेटेल म्हणून त्यांच्या जिवाला तळमळ लागली होती. त्यांना कोणाकडून तरी कळले होते की नरसिंव्हसरस्वतीस्वामी आहेत, त्यांची भेट होईल तर कार्यभाग साधेल. परंतु त्या वेळी महाराज एक सारखे फिरत होते. आळंदीत महाराज स्थिर होण्यापूर्वी वीस वर्षे अगोदर ही हकीकत घडलेली आहे. महराजांचे नांव ऐकल्यापासून त्यांची भेट कधी होईल या चिंतेत राधाकृष्णस्वामी नेहमी असत. असे होता होता भाग्योदयाचा काळ जवळ आला. महाराज फिरत फिरत एके दिवशी दादा दांडेकर यांचेसह राधाकृष्णस्वामी राहत होते त्या मठात मुक्कामास आले. मठात ज्या कोपऱ्यात महाराज उतरले होते त्याच्या समोरचेच अंगास राधाकृष्णस्वामी पलंगावर निजले होते. विष्णु नावाचा एक शिष्य राधाकृष्णस्वामींची चरणसेवा करीत होता. प्रहर रात्रीचा सुमार झाला. मठाबाहेर अगदी सामसूम झाली होती. त्या दिवशी मठात दादा दांडेकर व महाराज यांच्याशिवाय दुसरे कोणी उतारू नव्हते म्हणून अगदीच शांतता होती.
इकडे त्या गुरु-शिष्यांचा संवाद सुरू झाला. तो महाराज कोपऱ्यातून ऐकत आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही. दादा दांडेकर वयाने लहान म्हणजे फार तर 10 वर्षांचे असतील. यामुळे तो संवाद यांच्याही लक्षात पुढे राहिला नाही. संवाद होता होता त्यांच्या नेहमीच्या विषयावर वाद सुरू झाला. विष्णु म्हणाला, “आपण कृपाळू होऊन इतके शिकविले तसे निर्विकल्पाची खूण दाखवावी.” त्यावर राधाकृष्णस्वामी म्हणाले, “मी इतर गुरुंसारखा नाही. मला येते तर खरोखरच शिकविले असते. पण काय करु, मलाच मुळी येत नाही.’” अशी प्रश्नोत्तरे चालू असता नरसिंव्हसरस्वती-स्वामी महाराज भेटत नाहीत म्हणून राधाकृष्णस्वामींनी वाईट वाटून त्यांच्या डोळयांत अश्रु आले. हे दृश्य पाहून महाराज करुणावंत झाले व असा योगायोग झाला की राधाकृष्णस्वामीस झोप येऊन ते अर्धवट गुंगीतच विष्णुशी बोलू लागले. तेव्हा महाराज हळूच जागेवरून उठले व विष्णुपाशी जाऊन म्हणाले की, “मला थोडी तंबाखू द्या. तंबाखू वाचून फार अडते व नसली म्हणजे एक क्षण देखील जीव राहात नाहीसे होते.” तेव्हा विष्णु म्हणाला की, “तंबाखु जीवन नाही आपण गडबड करू नये. गुरुमहाराजांची झोपमोड होईल. मी पाहिजे तर पैसा देतो. गांवांत जाऊन विकत घ्यावी.” तेव्हा अधिकच गडबड करून महाराज म्हणाले, “तुम्ही आणावी. माझा पाय उचलत नाही. गाव दूर आहे, बरे तंबाखु मिळाली नाही तर जीव घाबरा होईल व गडबड होऊन गुरुजी जागे होतील.” शेवटी अशा पेंचात सापडून विष्णु जाण्यास तयार झाला. जाताना त्याने महाराजांस सांगितले की, “निदान मी येईपर्यंत पाय चेपीत बसावे.” तेव्हा “बरे” म्हणून महाराजांनी अर्ध-निद्रिस्त राधाकृष्ण स्वामींचे पाय चेपण्यास सुरूवात केली व विष्णु गांवांत तंबाखु आणण्यास निघून गेला. इकडे राधाकृष्णस्वामी मधूनमधून होकार देत काही बोलत होते. त्यांत महाराजांनी पुन्हा काही त्याचविषयी बोलणे काढून आपण त्यांची निर्विकल्प समाधी लावून दिली. काही वेळाने विष्णु परतला व त्याने महाराजांस तंबाखु दिली. ती घेवून लगेच अर्धी तोंडात टाकली आणि अर्धी पुन्हा उपयोगी पडेल म्हणून लंगोटीचे टोकास बांधून लगबगीने ते दादा दांडेकर यास म्हणाले, ’’चल रे दादा. आता येथे थांबून उपयोग नाही. आपल्यापासून दुसऱ्यास त्रास झाल्यावर तेथे राहण्यात काय मजा ?” असे म्हणून त्यांनी दादांना हाती धरून उठविले. विष्णुने आपण रात्रीचे जाऊ नये, बरोबर लहान पोर आहे, वगैरे सांगितले. पण महाराजांनी ऐकले नाही व लागलीच ते मठांतून बाहेर पडले.
काही वेळाने राधाकृष्णस्वामींची समाधी उतरून ते देहभानावर आले आणि आनंदातिषयाने पाय चेपणाऱ्या विष्णुस म्हणाले, “शाब्बास! आज तूच माझा गुरू झालास. धन्य तू!” विष्णुस हे कांहीच कळेना. तेव्हा स्वामींनी त्यास सांगितले, “आता पाय दाबतांना तूच मला युक्ती सांगितलीस व तिने माझी समाधी लागून मी आनंदात होतो. असे असून तू ना कबूल का होतोस ?’’ त्यावरून विष्णुने राधाकृष्णस्वामींना समग्र हकीकत सांगितली. तेव्हा त्यांना कळले की ते नससिंव्हसरस्वतीस्वामी महाराज होते आणि आपल्यावर कृपा करून त्यांनी आपली ओळख दिली नाही. हे पाहून राधाकृष्णस्वामींना फार वाईट वाटले. ते लगेच महाराजांच्या शोधार्थ निघाले. पण कित्येक वर्षे पत्ता लागला नाही. पुढे केव्हा भेट झाली वगैरेचे माहिती नाही.
श्रीकृश्ण महाराज, रहिमतपुर
श्री राधाकृष्णस्वामींच्या निर्विकल्प समाधीच्या गोष्टीतील विष्णु नामक शिष्यच पुढे विष्णु महाराज म्हणून प्रसिध्द आले. राधाकृष्ण स्वामींनी आपल्या निर्वाणीच्या अभंगात विष्णु महाराजांचा उल्लेख ‘जगदुद्धारी’ शिष्य असा केला आहे. विष्णु महाराजांचे चरित्र कोणातरी शिष्याने लिहिले असून ते अजून अप्रकाशित आहे. विष्णु महाराजांनी बरीच पद्यरचना केली असून ती अद्यापि छापली गेली नाही. त्यांचे पुष्कळ शिष्य आजही हयात असून एकाजवळ त्यांच्या अभंगांचा संग्रह आहे. राधाकृष्णस्वामींच्या कृपेने महाराज व विष्णु महाराज यांची भेट झाली होती. त्यांनी महाराजांची आरती केली असून ती आळंदीस मठात रोज म्हणतात. या आरतीइतकी सुंदर आरती मराठीत दुसरी नाही असे अतिशयोक्ती न करता म्हणता येईल. सदर आरतीच्या शेवटच्या कडव्यात महाराजांची व त्यांची भेट झाली तो प्रसंग फार बहारीच्या शब्दांत वर्णन केला आहे.
राधाकृष्णस्वामीकृपे । भेटी देसी यतिरूपे।।
निर्विकल्प कवटाळितां । होय विष्णु दृश्य लोपे।।
महाराज समाधिस्थ झाल्यावर विष्णु महाराज आळंदीस दर्शनाकरिता येऊन गेले होते. त्यांनी महाराजांवर अभंगात्मक रचना केली आहे. ते सहा अभंग खाली दिले आहेत. प्रत्येक अभंगाच्या समोर दिलेला अंक हा विष्णु महाराजांच्या अभंग सग्रहातील अभंग क्रमांक आहे.
अभंग क्र. ७०८
चला पाहूं गुरुराज नरसिंह सरस्वती ।
निजभक्तां आत्मस्थिति देत सर्वस्व ती ।।१।।
योगियांचा योगी पूर्ण अदृश्य अचल।
देही असोनि विदेहि तो नेणेंचि चंचळ ।।२।।
सर्वकाळ स्वरुपस्थ निजानंदे डोले।
अनन्यासी तारीतसे स्वानुभव बोले ।।३।।
दयानिधी अवतारे जग उद्धराया ।
उमगेना ज्याची लिला गातां शेषराया ।। ४।।
राधाकृष्णस्वामीकृपे ज्याची भेट होती।
विष्णुमूर्ति भरला तो विश्वी ओतप्रोत ।।५।।
अभंग क्रमांक ७१९
सदोदित वस्ती ज्यांची अव्दय सदनीं ।
श्री विठ्ठल विठ्ठल गर्जत वदनीं ।।१।।
तोच नरसिंह स्वामी सद्गुरु दयाळ ।
निजबोधें दवडीत दूर भवव्याळ ।।२।।
निरपेक्ष शांत पूर्ण फिरे जनीं वनीं ।
निजानंदे डोलतसे सेवित उन्मनी ।।३।।
राधाकृष्णस्वामीकृपे ज्याची गांठ पडे ।
विष्णुभक्ता ज्याचे यश वर्णाया आवडे ।।४।।
अभंग क्रमांक ७२०
नरसिंह सरस्वती । गुरुवर्य ब्रम्हामूर्ती ।।१।।
करुं तयांसी नमन । करी स्वरुपी उन्मन ।।२।।
जो कां पूर्ण जगदोद्धारी । पोचवीत निराधारी ।।३।।
तोडी निया व्दैत दावीं । विष्णु राधाकृष्ण दावी ।। ४।।
अभंग क्रमांक ७२१
अलंकापुरी इंद्रायणी तटीं । समाधि गोमटी ज्याची पहा ।।१।।
सकळांसी आम्ही सांगितलें गुह्यां । सद्गुरु बाहय अवलोका ।।२।।
पौषशुक्लपक्षी पाहोनी पोर्णिमा । विश्वात्माचा आत्मा निजी ऐक्य ।।३।।
राधाकृष्णस्वामीकृपें ध्यान येत । विष्णुभक्ता देत स्वात्मसुख ।।४।।
अभंग क्रमांक ७२७
विश्वाचे चालन ज्याचे सत्तें होत । विश्वीं ओतप्रोत भरला असे ।।१।।
तोचि नरसिंह स्वामी गुरुराज । निर्विकार आज ब्रम्हामूर्ति ।।२।।
अव्यय एकला संकल्पा वेगळा । अव्दय सकळां सुखरुप ।।३।।
राधाकृष्णुस्वामी प्रसादे भेटत । आत्माचि वटात विष्णुभक्ता ।।४।।
अभंग क्रमांक ८२८
अलंकापुर क्षेत्र पाहुनि पवित्र । व्यापक सर्वत्र तेथें वसे ।।१।।
चला चला चला भाविक हो चला । सद्गुरु अचला पाहूं डोळा ।।२।।
नरसिंह सरस्वती ज्याचे नाम । ठायींच अनाम यतिवर्य ।।३।।
पौष शुक्लपक्ष पोर्णिमा सुदीन । होय ब्रम्हींलीन अव्दय जो ।।४।।
जग तारावया पूर्ण कृपानिधी । घेत जो समाधि आळंदींत ।। ५।।
राधाकृष्णस्वामी कृपा जयावर । भेटत सत्वर विष्णुमूर्ति ।। ६।।
राधाकृष्णस्वामींच्या या ’जगदुद्धार’ शिष्याने भजनमार्गाचा पुष्कळ प्रचार केला व नवे मठ स्थापन केले शके १८२० सन १८९८ च्या प्लेगमध्ये यांनी देह ठेवला. विष्णुमहाराजांची समाधी रहिमतपुरास आहे.
श्रीसच्चिदाश्रम स्वामी, लोणार
वऱ्हाडातील मेहकर तालुक्यांत मेहकर पासून १४ मैलांवर लोणार या नांवाचे एक गांव आहे. येथे खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर, अखंड वाहणारी एक मोठी धार आहे. पुराणात लोणारचा उल्लेख ‘विरज-श्रेत्र’ या नावाने केलेला आढळतो. अखंड वाहणाऱ्या धारेला ‘गंगा-भोगावती’ असे म्हणतात. भगवान विष्णुंनी लवणासुर नावाच्या दैत्याचा संहार या ठिकाणी केला. त्यावरुन या गावाचे नांव ‘लोणार’ असे पडले आहे. हे एक अत्यंत पवित्र क्षेत्र असून या स्थळाचे वर्णन ‘विर महात्म्य’ या संस्कृत पोथीत आढळते. पुरातन काळी तेथे अठरा तीर्थ होती. त्यापैकी अनेक तीर्थांचा जीर्णाद्धार करणारे एक अधिकारी सत्पुरुष या ठिकाणी सुमारे ५७ वर्षांपूर्वी होऊन गेले. त्यांचे नांव श्रीसच्चिदाश्रम स्वामी असे आहे. या स्वामींचे चरित्र कै. यादव माधव काळे, वकील, बुलढाणा यांनी १९०३ साली प्रसिध्द केलेल्या ‘लोणारवर्णन’ नामक लहानशा पुस्तकांत आले आहे. त्यातील माहिती व कांही स्वतः गोळा केलेली माहिती यांच्या आधारावर स्वामींचे चरित्र पुढे दिले आहे. श्री सच्चिदाश्रम स्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव वासुदेव असे होते. पित्यांचे नांव शिवराम व उपनांव भट होते. हे सावंतवाडी प्रांतातील आरोसी या गावचे राहणारे. हे काश्यप गोत्री चित्पावन कोकणस्थ दशग्रंथी वैदिक ब्राम्हण होते. स्वामी धिप्पाड बांध्याचे, दीर्घदेही व आजानुबाहू होते. त्यांचे पायास एक कोंब फुटला. त्याच्या व्यथेने व प्रपंचातील त्रासाने कंटाळून स्वामी काशीस जाण्याचा विचार करून पायीच आपल्या गावाहून निघाले. शके १९७८ म्हणजे सन १८५६ मध्ये ते लोणार येथे येवून पोहचले. लोणारच्या लोकांनी त्यांना तेथील तीर्थ महात्म्य सांगितले. एक महिना त्रिकाल धारेचे स्नान केल्यास व्याधिमुक्त व्हाल असे ग्रामस्थांनी सांगितल्यावरून स्वामींनी तेथेच राहून तसे केले व ते एक महिन्यात व्याधिमुक्त झाले. त्यामुळे त्यांची लोणार क्षेत्रावर फार श्रध्दा बसली. पुढे संकल्पाप्रमाणे काशीयात्रा करून ते घरी आरोसीला पोहचले. काही दिवसांनी त्यांची पत्नी निवर्तली. त्यांना दोन मुली होत्या. एक इंदुरला गोगटे यांचे घरी व दुसरी आरोसी येथे बर्वे यांचे घरी दिली होती. स्वामींना मुलगा नव्हता. अशा रीतीने कौटुंबिक पाषातून मुक्त झाल्यावर आधीच विरक्त असलेल्या त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले व ते पुन्हा काशीस गेले. तेथे त्यांनी स्वामी विष्णुवाश्रम यांजपासून संन्यासदीक्षा घेतली. त्यांची संन्यासपट्टीची परंपरा पुढील प्रमाणे आहे. अच्युताश्रम – वासुदेवाश्रम – विश्वेश्वराश्रम – विष्णवाश्रम आणि सच्चिदाश्रम.
संन्यास स्वीकारल्यावर स्वामी लोणारला भोगावती तीर्थाचे जवळ येवून राहिले. भोगावतीचे स्नान, कुमारेश्वराची पूजा व वेदपठण यात त्यांचा सर्वकाळ जात असे. स्वामी अत्यंत निःस्पृह होते. स्वतःविषयी कोणास माहिती मिळू नये म्हणून ते फार दक्षता घेत. कधी कोणास त्यांनी आपला फोटो काढू दिला नाही, की राजकारणाबद्दल एक अक्षरही कोणाजवळ ते बोलले नाहीत. स्वामींच्या या तऱ्हेच्या वागण्यावरून यांच्याविषयी लोकांत असा समज होता की ते पेशवे राजघराण्यातील असून १८५७ सालच्या लष्करी क्रांतीची सुत्रे हलविणाऱ्या प्रमुखांपैकी ते एक होते. स्वामींकडे कित्येक वेळी रात्री अपरात्री धिप्पाड असे घोडेस्वार येत असत व त्यांचेबरोबर खलबत करून पहाटेपूर्वीच निघून जात. स्वामींच्या खांद्यावर एक मोठा घाव होता. तो शस्त्राचा असावा असे सांगतात.
महाराज वऱ्हाडांत फिरत असता लोणार येथे आल्याचे मागे सांगितलेच आहे. श्रीसच्चिदाश्रम स्वामींसारखे सत्पात्र पाहून महाराजांची कृपादृष्टी त्यांचेकडे वळली. महाराजांची आपल्या स्वभावाप्रमाणे आपण कोण आहोत हे स्वामींना कळू दिले नाही. महाराजांनी त्यांना, “तुम्ही आम्ही गुरुबंधु आहोत.” असेच सांगितले. स्वामींना योगाभ्यास शिकविण्याकरिता लोणार येथे ते जवळ जवळ एक वर्ष राहिले होते. महाराजांना राहण्याकरीता तेथे जी जागा मठ म्हणून दिली होती ती लोणारमधील जुनी मंडळी दाखवितात. आज त्या जागेवर मठाचे एकही चिन्ह नसून ग्रामस्थांची घरे मात्र त्या जागेवर उभी आहेत. महाराजांनी सांगितल्या ‘अंतरानुभव’ या ग्रंथाचा अल्पपरिचय पूर्वी करून दिला आहे. लोणारहून जाताना महाराजांनी स्वामींना आज्ञा केली होती की बारा वर्षे दक्षिणेत जावयाचे नाही. ही मुदत संपल्यावर स्वामी दक्षिणेत फिरत फिरत आळंदीस गेले. यावेळी महाराज समाधिस्त झाले होते. महाराजांच्या मठात गेल्यावर आपल्याशी गुरुबंधुचे नाते जोडून आपल्यावर कृपा करणारे खरोखर कोण होते हे स्वामींना तेव्हा कळले. त्यामुळे “अरे, आपल्याला फसविले!” असे उद्गार स्वामींच्या तोंडून साहजिकच बाहेर पडले व महाराजांनी बारा वर्षे दक्षिणेत येवू नकोस असे का सांगितले असावे याचा उलगडा झाला. स्वामींची महाराजांचे ठायी भक्ती होती. महाराज हे प्रत्यक्ष दत्तावतार आहेत अशी स्वामींची श्रध्दा होती हे अंतरानुभवांतील पूर्वी उद्धृत केलेल्या काही ओव्यांवरून दिसून येते. स्वामींची संन्यासपरांपरा जरी भिन्न होती तरी त्यांचे योगविद्येचे गुरू महाराजच होते. श्रीसच्चिदाश्रम स्वामींचे थोडया दिवसांपूर्वी कैलासवासी झालेले एक शिष्या वे. शा. सं. अनंतबाबा कुऱ्हे यांनी महाराजांना पाहिले होते. सच्चिादाश्रम स्वामी जवळ जवळ ४० वर्षे लोणारला होते. त्यांनी फारसे शिष्य केले नाहीत. चातुर्मासात लोणारला राहून बाकीच्या काळात ते तीर्थयात्रा करीत असत. स्वामी स्वतः उत्तम कवि होते. त्यांनी १५-१६ ओवीमध्ये ग्रंथ रचले आहेत. आज ते सर्व अप्रकाशित आहेत. ’विरजमाहात्म्य’ या पोथीवरून, लोणार येथील पुराणात सांगितलेली तीर्थस्थाने निश्चित करण्यात स्वामींना महाराजांचे मार्गदर्शन झाले होते.