श्री नरसिंव्हसरस्वती स्वामी महाराज

आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर जवळच गोपाळपुऱ्यात श्री नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे समाधि मंदिर आहे. पौष शु. १५ शके १८०७ मध्ये (इ.स. २० जाने.१८८६) श्री नरसिंव्हसरस्वती- स्वामी महाराजांनी येथे समाधि घेतली. ही समाधि योगशास्त्रानुसार आहे. फार प्राचीन काळापासून आळंदी हे स्थान एक प्रख्यात शैव स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सिद्धेश्वराचे शिव मंदिर असून इंद्रायणी नदीवरील सिद्ध बेटात ८४ सिद्धांची स्थाने आहेत. येथे इंद्रायणी उत्तरवाहिनी झाली असून या उत्तरवाहिनी झालेल्या इंद्रायणीच्या तीरावर श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज यांचे समाधिस्थान आहे. जेव्हा नदी उत्तरवाहिनी होते तेव्हा त्या नदीला गंगेचे पावित्र्य लाभते आणि योग परंपरा असे मानते की उत्तरवाहिनी असलेली नदी व तिच्यावरील उत्तर दिशा हे योग्यांचे मोठे पीठ असते. या परंपरेला अनुसरून श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज यांनी येथे शके १८०७ पौष शुद्ध पौर्णिमेला समाधि घेतली. हे समाधिस्थान आज श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज मंदिर या नावाने प्रख्यात असले तरी या समाधिस्थानाचे दुसरे एक असामान्य वैशिष्ट्य आहे ते हे की इंद्रायणी नदीला केव्हढाही जरी पूर आला तरी नदीच्या पाण्याचा उपसर्ग जसा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिस्थानाला होत नाही तसाच श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांच्या समाधिस्थानालाही होत नाही. खुद्द श्री ज्ञानेश्वर महाराज समाधिजवळ सुप्रसिद्ध नाथ पंथीयांची समाधिस्थाने आहेत. त्याच प्रमाणे या इंद्रायणीच्या उत्तर तीरावर अनेक सत्पुरुषांची समाधिस्थाने आहेत. या सर्व समाधिस्थानांवर वर वर जरी नजर टाकली तरी ही सर्व समाधिस्थाने इंद्रायणीच्या उत्तर दिशेला आहेत हे दिसून येईल. आणि म्हणून जेव्हा श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी समाधि घेण्याचे ठरिवले तेव्हा त्यांनी इंद्रायणीच्या उत्तर तीरावरील समाधिस्थान ठरवले व त्यानुसार समाधि घेतली. हे सर्व भारतीय योगशास्त्र परंपरेच्या दृष्टीने सुसंगत आहे. वेगळ्या भाषेत समाधिस्थान निवडण्यामागे योगशास्त्र परंपरेची भरभक्कम बैठक आहे.

श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज इ.स. १८७३ मध्ये आळंदीला आले. तत्पूर्वी त्यांनी विदर्भ मराठवाडा व महाराष्ट्र प्रदेशात भरपूर भ्रमण केले. इ.स.१८७३ मध्ये महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा आळंदी क्षेत्राची परिस्थिती आगळी वेगळी होती. इ.स. १८३२ मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्री हैबतीबुवा आरफळकर यांनी सुरू केला. त्यावेळेस त्यांना साथ देणारे श्री शिरवळकर, वासकर आणि खंडुजीबुवा होते. पुढे इ.स.१८३६ मध्ये श्री हैबतीबुवा समाधिस्थ झाले. त्यांचे समाधिस्थान, जसे विठ्ठलाच्या पायरीवर श्री नामदेवांचे स्थान आहे तसे आळंदीला श्री हैबतीबुवांचे समाधिस्थान श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या पायरीपाशी आहे. श्री हैबतीबुवांच्या कार्यामुळे श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू झाली. श्री हैबतीबुवा हे श्री महादजी शिंदेंच्या दरबारातील एक मोठे अधिकारी सरदार होते आणि जेव्हा केव्हा श्री महादजी शिंदे दर्शनासाठी येत असत तेव्हा ते आळंदीजवळ वानवाडी येथे मुक्काम करीत असत. शिंदे सरकार आणि श्री हैबतीबुवा या दोहोंमुळे वारकरी संप्रदायात पालखी प्रथेला प्रारंभ झाला. परंतु पुढे जेव्हा श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आहे तेव्हा वारकरी संप्रदायात बराच सुस्तपणा आलेला होता. आळंदीला आल्यावर श्री महाराजांचा असा नियम असे की ते श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शन करीत. त्यावेळी त्यांचे वास्तव्य मंदिराला लागून असलेल्या श्री चंक्रांकितबुवांच्या माडीवर होते. श्रीगुरुमहाराजांनी वारकरी संप्रदायात फार मोठे योगदान दिले. त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिमागे मुक्ताबाईंचा सभामंडप उभा केला. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथ त्यांनी निर्माण करून रथयात्रा व गाव प्रदक्षिणा सुरू केली. श्री ज्ञानेश्वर मंदिरात ते नेहमीच भजन करीत असत, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीवर प्रवचनही करीत. जे कोणी त्यांच्या प्रवचनाला असत ते मोठे भाग्यवान होते. आळंदीला अवघी १२ वर्षे वास्तव्य होते. परंतु या १२ वर्षांत त्यांनी जे धर्मकार्य केले त्याला तोड नाही. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांमुळे दत्त संप्रदाय व वारकरी संप्रदाय ह्यांच्यात जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित झाले. आळंदीला येण्यापूर्वी श्रीगुरु महाराजांचे वास्तव्य कांही काळ पंढरपूरला होते, ते स्थान व्यास मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्री महाराजांच्या शिष्यवर्गात कांही बडवे मंडळी होती. तसेच अंमळनेरकर महाराज हे श्री महाराजांच्या समकालीन होते. एकदा असे झाले की एका बैराग्याने रागाच्या भरात पांडुरंगाच्या पायाला इजा केली तेव्हा श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी झाडपाला लावून पांडुरंगाच्या पायाची जखम बरी केली. कारण श्री महाराजांच्या दृष्टीने पांडुरंग ही कांही मूर्ति नाही, तो साक्षात पांडुरंग आहे आणि म्हणून पांडुरंगाच्या पायाला इजा केली हे पाहून श्री महाराज फार व्यिथत झाले आणि त्यांच्या पायाची जखम बरी केली. त्यावेळी तेथे अंमळनेरकर महाराज होते. श्री महाराजांचे चरित्र मल्लप्पा औसेकर परंपरेतील एका कवीने लिहिले. औसा हे गांव उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे आणि त्या परंपरेतील मल्लप्पा नावाच्या सत्पुरुषाशी त्यांचा मोठा स्नेह होता. त्यांचे भक्त – जीवन – हे कवी होते. ते आळंदीला यात्रेला आले असताना त्यांनी श्री महाराजांची भेट घेतली व पुढे त्यांनी श्री महाराजांचे ओविबद्ध चरित्र लिहिले. या चरित्रात श्री मल्लप्पा औसेकर महाराज यांचा उल्लेख आलाच आहे पण कोणाचेही लक्ष वेधून घेईल असा महत्त्वाचा उल्लेख त्यात आला आहे तो हा की श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज पैठणला श्री एकनाथ महाराजांच्या घरी होते व त्यांनी श्री एकनाथ महाराजांनी केलेल्या ब्राह्मण भोजनात भाग घेतला होता. ही एकच बाब श्री महाराज श्री एकनाथ महाराजांच्या समकालीन होते हे स्पष्ट करणारी आहे. श्री एकनाथ महाराजांचा काळ शके १४५५ ते शके १५२१, फाल्गुन वद्य षष्ठी (इ.स. १५९९) आहे. ही एकच बाब श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांच्या प्रदीर्घ आयुष्यावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारी आहे. पुढे पेशवाईच्या अखेरीस कर्नाटकामधील गुलहौसर गावी श्री नारायणस्वामी यांनी यज्ञ केला होता. त्या यज्ञामध्येही श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज उपस्थित होते. कर्नाटकचे स्वामी हे शेवटचे पेशवे यांच्या समकालीन होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सत्पुरुष श्री गोंदवलेकर महाराज हे जेव्हा हिमालयात गेले तेव्हा त्यांना एका गुहेत ज्या व्यक्तींचे दर्शन झाले त्यापैकी एक आळंदीचे श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज होते असे त्यांच्या चरित्रात नमूद आहे. हे सर्व उल्लेख पाहता आणि समाधिच्या वेळेस श्री महाराजांनी केलेल्या योगाच्या प्रकिया पाहता श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांच्या अवतार कार्याचा प्रदीर्घ कालखंड आपोआप भक्तांसमोर दिसू लागतो.

श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे मूळ स्थान कोणते हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न कोणालाही महत्त्वाचा वाटेल यात शंका नाही. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचा प्रसिद्ध ग्रंथ ॥श्रीस्वात्मसौख्य॥ आहे. हा ग्रंथ श्री नारायण यांना करंजग्रामी सांगितला. येथे त्यांच्या ग्रंथातून विदर्भाशी असलेले त्यांचे संबंध आपोआप स्पष्ट होतात. विदर्भात श्री महाराजांचे प्रदीर्घ काळपर्यंत भ्रमण झाले होते. इ.स. १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध चालू असताना श्री महाराजांचे भ्रमण विदर्भात होत होते. आणि त्यावेळी त्यांच्या बरोबर श्री दांडेकर आदि शिष्य मंडळी होती. हे जर लक्षात घेतले तर श्री महाराजांच्या विदर्भ भ्रमणाची सुस्पष्ट कल्पना आणि जाणीव आपल्याला होते यात शंका नाही. इ.स. १८५७ च्या नंतर श्री महाराज भ्रमण करीत असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्याने अडविले आणि गाविलगडच्या किल्ल्यावर ठेवले. परंतु किल्ल्यातून श्री महाराज निसटले व अमरावतीला येऊन ते पुढे निघून गेले. ही एकच घटना विदर्भाशी श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे काय संबध होते यावर प्रकार टाकणारी आहे. श्री महाराजांच्या परंपरेतील नागपूरचे श्री अप्रबुद्ध हे पाळेकर घराण्यातील आणि श्री महाराज विदर्भात भ्रमण करीत असताना वाशिम, लोणार आणि बुलढाणा परिसरात त्यांच्या संपर्कात जे कोणी आले होते त्यापैकी पाळेकर घराणे एक होते. लोणार येथील सुप्रसिद्ध श्री सच्चिदाश्रम स्वामी यांना श्री महाराजांनी केवळ योगविद्येची दिक्षा दिली असे नव्हे, तर त्यांच्यासाठी ॥अंतरानुभव॥ नावाचा योगशास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला आहे. या ॥अंतरानुभव॥ ग्रंथाचे योगशास्त्रीय महात्म्य सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे आणि एका संन्यासाला ही योगिवद्या श्री महाराजांनी दिलेली आहे हे पाहिले तर योगशास्त्रावरील श्री महाराजांचे प्रभुत्व आणि अधिकार कोणालाही विस्मयचकित करून सोडणारा आहे. जे कोणी योगशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांच्यासमोर ॥अंतरानुभव॥ हा एकच ग्रंथ आला तरी ते सर्व योगमार्गातील साधक मंत्रमुग्ध होऊन जातील. त्यांच्या या ॥अंतरानुभव॥ ग्रंथातून पतञ्जली योगसूत्रानुसार ॥अंतरानुभव॥ ग्रंथाचे योग साधना आणि उपासनेतील स्थान आणि त्यातील नानाविध योगिक प्रकिया यांचे मूर्तिमंत दर्शन या योग मार्गातील साधकांना होते. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचा ॥अंतरानुभव॥ ग्रंथ हा मराठी भाषेमध्ये आहे आणि श्री महाराजांनी आपल्या अनेक शिष्यांना जी काही वेळोवेळी पत्रे लिहिली त्यातील बरीचशी पत्रे क्वचित अपवाद वगळता मराठी भाषेत आहेत. ॥श्रीस्वात्मसौख्य॥ हा श्री महाराजांचा ग्रंथ मराठीतच लिहिण्यात आलेला आहे. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांचे योगशास्त्रावर व संस्कृत भाषेवर असामान्य प्रभुत्व होते व त्यांची कांही पत्रे संस्कृत प्रचुरही आहेत. श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा त्याच्या आसपास पुण्याला एक फार मोठा वादविवाद सुधारणेसंबंधी झाला याचा उल्लेख श्री अप्रबुद्धांनी श्री अण्णासाहेब पटवर्धन यांच्या चरित्रात केला आहे. या वादविवाद सभेमध्ये भाग घेण्यासाठी श्री महाराज आले होते परंतु योगायोगाने श्री महाराज येण्यापूर्वीच हा वादविवाद होऊन गेला होता. ते कसेही असले तरी धर्मसुधारणा आणि संस्कृत भाषा या दोहोंमध्ये श्री महाराजांची विलक्षण गती होती व संस्कृत भाषा ही त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. त्यांनी लिहिलेले ॥श्री ज्ञानेश्वर अष्टक॥ आणि ॥ऋणमोचन स्तोत्र॥ हे संस्कृत भाषेतच आहेत. ऋणमोचन हे विदर्भातील पूर्णा नदीवरील एक तीर्थक्षेत्र आहे व तेथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा होते. या स्थानावर श्री महाराजांचे स्तोत्र आहे. हीही एक बाब लक्षणीय आहे. आपल्याकडील तीर्थक्षेत्रे व तीर्थस्थाने यामागील जो परंपरेचा धर्मोतिहास लपलेला आहे त्यांची ओळख या स्थान महात्म्यावरून होते. तसेच आळंदी स्थानाचेही आहे. या स्थानात अनेक तीर्थ आहेत आणि ती तीर्थस्थाने गेल्या युगातच नव्हे तर पुढेही प्रकट होणारी आहेत असे श्री अण्णासाहेब पटवर्धन म्हणत. आळंदी आणि ऋणमोचन ही दोन तीर्थस्थाने आणि पंढरपूर हे क्षेत्र यामागील परंपरा इतिहास आणि या स्थानाला येऊन गेलेले तपस्वी आणि साधुपुरुष यांच्या आठवणी आणि स्मृति हे भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे सोनेरी पान आहे आणि या सोनेरी पानाचे लखलखित दर्शन ॥ऋणमोचन स्तोत्र॥ रूपाने श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराज आपल्याला करून देतात.

श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी लिहिलेले ॥श्री ज्ञानेश्वर अष्टक॥ हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे स्तवन आहे. ज्ञानेश्वर हा साक्षात् विष्णु आहे असे श्री महाराज म्हणत. जेव्हा ………………….. यांनी श्री महाराजांचे चरित्र लिहिले तेव्हा – विष्णुरूप ज्ञानेश्वरापेक्षा माझे गुण गातोस, हे योग्य नाही – असे श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट बजावले. ज्ञानेश्वर हा साक्षात विष्णु आहे आणि या महाविष्णुचे स्तवन श्रीगुरु नरसिंव्हसरस्वतीस्वामी महाराजांनी ॥श्री ज्ञानेश्वर अष्टकात ॥ केले आहे. येथे साक्षात दत्तात्रेय श्री महाराजरूपाने श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णुचे स्तवन करीत आहेत. ज्ञानेश्वर हा अवतार पांडुरंग असा आहे व पांडुरंग रूपात तो आळंदीला शैव क्षेत्रात समाधिस्थ झालेला आहे. शैव क्षेत्रात विष्णु समाधि घेतो आणि श्री महाराज त्यांचे स्तवन करतात असे भारताचे धर्मोतिहासतील अलौकिक दृष्य आपल्याला येथे प्रत्ययाला येते.